

वाळपई: सत्तरी तालुका हा कृषिप्रधान प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र, बदलत्या काळात अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. तरीदेखील काही शेतकरी आपल्या कष्टाने शेतीला जिवंत ठेवत आहेत. गुळेली येथील ७० वर्षीय शेतकरी महिला उज्ज्वला यशवंत देसाई या त्यापैकीच एक प्रेरणादायी उदाहरण आहेत.
वयाच्या सत्तरीत असूनही उज्ज्वला देसाई यांनी यंदा सुमारे १,००० चौ.मी. जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने सफेद रताळ्याचे पीक घेतले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या रताळ्यांना बाजारात मोठी मागणी असल्याने त्यांच्या मेहनतीला सोन्याचे फळ मिळाले आहे.
पूर्वी देसाई कमी प्रमाणात रताळ्याचे पीक घेत असत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातून काही रोपे आणली आणि त्यानंतर त्यांनी या पिकाची लागवड सुरू ठेवली. पहिल्या दोन वर्षांत चांगले उत्पादन मिळाल्यानंतर यंदा त्यांनी कोणत्याही रासायनिक खतांशिवाय पूर्ण सेंद्रिय शेती केली.
ऑगस्ट महिन्यात जमिनीची मशागत करून वेल लावण्यात आले आणि अवघ्या तीन महिन्यांत पीक तयार झाल. काल आणि आज मिळून त्यांनी सुमारे २०० किलो सफेद रताळ्याचं उत्पादन काढण्यास सुरुवात केली आहे. अजूनही शेतात मोठ्या प्रमाणात पीक शिल्लक असून, मागणीप्रमाणे टप्प्याटप्प्याने ते काढण्यात येणार आहे, असे देसाई सांगतात.
रताळे हे पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न आहे. उज्ज्वला देसाई सांगतात, रताळे पचन सुधारते, ऊर्जा वाढवते, त्वचेचा तेज वाढवते आणि डायबेटिस तसेच रक्तदाबासाठी फायदेशीर ठरते. यात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असल्याने हृदय निरोगी राहते.
त्या पुढे म्हणाल्या की, उकडलेले किंवा भाजलेले रताळं आठवड्यातून दोन-तीन वेळा खाल्ले तर शरीराला विशेष फायदा होतो. सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या रताळ्याची चव बाजारातील इतर रताळ्यांपेक्षा गोडसर आणि वेगळी असते, त्यामुळे ग्राहक त्याकडे आकर्षित होतात.
शेतीदरम्यान उज्ज्वला देसाई स्थानिक महिलांना कामाची संधी देतात तसेच त्यांना शेतीविषयी मार्गदर्शनही करतात. कोणालाही रताळ्याची वेल हवी असल्यास माझ्याकडून घेऊन जावी आणि स्वतःच्या शेतात लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे ‘स्वयंपूर्ण गोवा’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना बळ मिळत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
उज्ज्वला देसाई म्हणाल्या, वय झाले तरी शेतीवरील प्रेम कमी झाले नाही. शरीरात ताकद आहे तोपर्यंत मी शेती करत राहणार. यंदा रताळ्याचं पीक घेतल्याने समाधान मिळाले. या शेतातून काही स्थानिक महिलांना रोजगारही मिळाला, हे अधिक आनंददायी आहे. त्या पुढे म्हणाल्या, रताळ्याचे पीक वर्षभर घेता येते आणि त्यासाठी फारशी मेहनत लागत नाही. तीन महिन्यांत पीक तयार होते, आणि उत्पादन चांगले आल्यास आर्थिक लाभही मोठा होतो. महिलांनीही शेतीकडे वळले पाहिजे; महिला सक्षम आणि स्वावलंबी असेल, तर कोणतेही काम करू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.