

मडगाव: २०२७च्या विधानसभा निवडणुकीत ‘एसटी’ समुदायाला राजकीय आरक्षण मिळाले तर जे चार मतदारसंघ राखीव होतील त्यात सांगे मतदारसंघ अग्रक्रमावर असून या बदलत्या परिस्थितीत होणारी निवडणूक लढविण्यासाठी या मतदारसंघातून तीन ‘एसटी’ नेते सज्ज झाले असून त्यांनी आपल्या कामालाही सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सांगेतील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
सांगे मतदारसंघातून यापूर्वी ‘एसटी’ समाजाचे प्रतिनिधित्व करणारे प्रसाद गावकर हे २०१७ साली जिंकून आले हाेते. मात्र, मागच्या निवडणुकीत त्यांना भाजपचे सुभाष फळदेसाई यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०२७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण पुन्हा एकदा सज्ज झालेलो आहे, असे गावकर यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक लढवणारच!
प्रसाद गावकर म्हणाले, २०१७ साली हा मतदारसंघ राखीव नसतानाही मी जिंकून आलो होतो. त्यावेळी मी अनेक याेजना सांगेसाठी राबविल्या. यावेळी जर हा मतदारसंघ ‘एसटी’साठी राखीव झाला तर सांगेचे मतदार मला पुन्हा एकदा निवडून आणतील याची खात्री आहे. ते कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार, असे त्यांना विचारले असता, हा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यात येईल. मात्र, २०२७ ची निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीत लढवेन, असे त्यांनी सांगितले.
लोकसंपर्क वाढविण्यावर भर
काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सत्यवान गावकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गावकर हे यापूर्वी माजी आमदार प्रसाद गावकर यांचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यामुळे सांगेच्या स्थानिक राजकारणाशी ते संपूर्णपणे परिचित आहेत. मायनिंग इंजिनियरिंगमध्ये ‘बीटेक’ ही पदवी मिळविलेले गावकर यांनी सांगे मतदारसंघात आपल्या कामाला सुरवात केली असून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ते आपला लोकसंपर्क वाढवित आहेत.
सहज जिंकून येईन!
सांगे मतदारसंघ ‘एसटी’साठी राखीव झाल्यास भाजपची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी रिवणचे माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी प्रयत्न सुरू केले असून सध्या ‘एसटीं’ना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी ज्या जागृती सभा घेतल्या गेल्या त्यात केपेकर हे पूर्णपणे सक्रिय होते. जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून केपेकर यांनी आपले नेतृत्वगुण लाेकांसमोर आणले होते. भाजपची उमेदवारी आपल्याला मिळाल्यास आपण सहज जिंकून येऊ शकेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.