पणजी : गोव्यात काँग्रेस आमदारांचं बंड हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्याशी भाजपचा कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकरण गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिलं आहे. तसंच फोडायचंच असेल तर मिशन लोटस अर्धवट सोडणार नाही. सर्व आमदार भाजपमध्ये घेऊ, असं म्हणत गोव्यातील सध्याच्या घडामोडींमध्ये भाजपचा कोणताही हात नसल्याचाही दावा केला आहे.
दरम्यान भाजप कार्यकर्त्यांसह दिलायला लोबोंचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र गोवा हे खूप छोटं राज्य आहे. राजकीय विरोधक असले तरीही प्रत्येकाचं दुसऱ्या पक्षातील लोकांशी चांगलं नातं असतं असं म्हणत तानावडेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली आहे. माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विरोधी पक्षात असूनही आपला चांगला मित्र आहे हे सांगायलाही तानावडे विसरले नाहीत.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काँग्रेसच्या आमदारांची झालेल्या बैठकीवर तानावडेंना पत्रकारांनी विचारणा केली. यावर तानावडेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री हा कुठल्या पक्षाचा नसतो. तो सर्वांचा असतो. त्यामुळे तो कुणालाही भेटू शकतो. तसंच याला फ्रेंडशीप मीटिंग म्हणायची गरज नाही असंही तानावडेंनी स्पष्ट केलं. ज्यादिवशी काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यादिवशी भाजपचं कार्यालय बंद होतं, त्यामुळे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले असावेत असंही तानावडेंनी म्हटलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला याची काहीही कल्पना नाही असं म्हणत गोव्यात ऑपरेशन लोटस केलं नसल्याचा दावा तानावडेंनी केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.