Goa Politics: खरी कुजबुज; आरजी ‘हाता’ला साथ देणार?

Khari Kujbuj Political Satire: तोडा, फोडा, जोडा आणि राजकारण करा या नीतीवर सर्व राजकीय पक्षांची वाटचाल सुरू असल्याचे कोणीच नाकारणार नाही.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

आरजी ‘हाता’ला साथ देणार?

विरोधी पक्षांना दिलेल्‍या हमीनुसार, आरजीचे अध्‍यक्ष मनोज परब येत्‍या आठवड्यात युतीच्‍या चर्चेसाठी विरोधकांशी पत्रव्‍यवहार करणार आहेत. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई विरोधकांना एकत्र आणण्‍यासाठी प्रयत्‍न करीत असले, तरी काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍याकडून त्‍यांना सकारात्‍मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. पण काँग्रेसचे अमित पाटकर व युरी आलेमाव हे दोन्‍ही नेते आरजीला सोबत घेण्‍यासाठी मात्र तयार असल्‍याचे प्रदेश काँग्रेसच्‍या विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्‍या पराभवात आरजीचा मोठा हात होता. हे ओळखूनच पाटकर आणि युरी आरजीला सोबत घेण्‍याबाबत विचार करीत नसतील ना? ∙∙∙

दोन समाजांत फूट

तोडा, फोडा, जोडा आणि राजकारण करा या नीतीवर सर्व राजकीय पक्षांची वाटचाल सुरू असल्याचे कोणीच नाकारणार नाही. फुटून जे पक्षात आले किंवा सत्ताधाऱ्यांशी मांडीला मांडी लावून बसले आहेत ते काही त्यांच्या मर्जीने आलेले नाहीत, त्याला कायद्याच्या चौकटीचा धाकही कारणीभूत आहे. जी नेते फुटले आहेत, त्यातील अनेकजण अगोदरच तुपात होते आणि जे नव्हते ते सुपातून तुपात आले आहेत, एवढाच काय तो फरक. परंतु सध्या राज्यात दोन समाजांत उभी फूट पडली आहे, आपला वापर केवळ मतांसाठी होत आहे हे या समाजाला कधी उमगणार हे माहीत नाही. त्यात भंडारी समाज व अनुसूचित जमातीचा समावेश आहे. दोन्ही समाजात सध्या एकमेकांवर आरोप करणारे गट अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. या दोन्ही समाजाची ताकद एवढी आहे की दोन्ही एकत्र आले, तर राज्याच्या सत्तेवर ते जाऊन बसू शकतात. विशेष बाब म्हणजे समाजातील काही नेत्यांनाच नेते म्हणून मिरवण्याची हौस असल्यावर आणि सत्ताधाऱ्यांकडून मिळणाऱ्या काही लांगूलचालनावर खूश व्हायचे म्हटल्यावर समाजाचे काय भले होणार आहे, हे समाजाला कळणार कधी हा प्रश्न आहे. दोन्ही समाजात अजूनही आवश्यक असणारी प्रगल्भता आलेली नाही. त्यामुळेच काहीजण फायदा उठवतात हे समाजानेच जाणून घ्यावे. ∙∙∙

काब्रालांची तयारी...

मागचे तीन टर्म कुडचडेतून आमदार म्‍हणून निवडून आलेले नीलेश काब्राल हे आता चौथ्‍या टर्मसाठी सिद्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काल त्‍यांनी आपल्‍या समर्थकांच्‍या आणि हितचिंतकांच्‍या सोबतीने आपला वाढदिवसही साजरा केला. हल्‍लीच अवेडे-पारोडा लायन्‍स क्‍लबच्‍या एका कार्यक्रमात त्‍यांनी आपण चौथ्‍यांदा कुडचडेतून निवडणूक लढविण्‍यास सज्‍ज झालो आहे हे स्‍पष्‍ट केले होते. त्‍यांनी म्‍हटले, लायन्‍समध्‍ये पदावर असलेला पदाधिकारी एका वर्षात निवृत्त होण्‍याची प्रथा आहे, पण राजकारणात तसे होत नाही. कुडचडेतील लोक जर माझ्‍याबरोबर असतील, तर चौथ्‍यांदाच का आठव्‍यांदासुद्धा मी जिंकून येऊ शकतो, असे त्‍यांनी सांगितले. मात्र, २०२७ ची निवडणूक आपण कोणत्‍या पक्षातून लढविणार हे मात्र त्‍यांनी गूढच ठेवले. कुडचडेचे राजकीय वारे वेगळ्‍या दिशेने वाहू लागले आहेत असे आता म्‍हणायचे का? ∙∙∙

सुपारी आणि नारळ!

गोवा कला राखण मांड यांनी पणजीतून आपल्‍या सुपारी आंदोलनाला सुरुवात केली आणि कला अकादमीत जाऊन तत्‍कालीन कला व संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे यांना सुपारी देण्‍याचा प्रयत्‍न केला. अर्थातच गावडेंनी ही सुपारी स्‍वीकारली नाही. त्‍यानंतर लवकरच गावडे यांनी प्रेरणादिन कार्यक्रमात मुख्‍यमंत्र्यांच्‍या आदिवासी कल्‍याण खात्‍यावर तोंडसुख घेतले आणि मुख्‍यमंत्र्यांनी गावडेंच्‍या हाती नारळ दिला. काल मडगावातही असेच झाले. मडगाव रवींद्र भवनचे नाट्यगृह कधी सुरू होणार याची विचारणा करण्‍यासाठी हे आंदोलक मडगावला आले होते. त्‍यांनी रवींद्र भवनचे अध्‍यक्ष राजेंद्र तालक यांना सुपारी देण्‍याचा प्रयत्‍न केला आणि तालक यांनीही ही सुपारी स्‍वीकारली नाही. रवींद्र भवनच्‍या सभागृहाची जी अवस्‍था झाली आहे, त्‍याला कारणीभूत सार्वजनिक बांधकाम खाते असे सांगण्‍याचा त्‍यांनी प्रयत्‍न केला. सार्वजनिक बांधकाम खातेही मुख्‍यमंत्रीच सांभाळतात याचा तालक यांना विसर पडला की काय? ∙∙∙

‘आलिया भोगासी असावे सादर’

म्हापशातील सरकारी कार्यालयांची स्थिती सध्या कचरा कुंड्याप्रमाणे झाली असल्याच्या तक्रारी आहेत, परंतु या तक्रारींकडे कोणी गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते. विशेष बाब म्हणजे सरकारी कार्यालयात सफाई कर्मचारी आहेत, पण ते कार्यालयांची सफाई किती मनाने करतात हे तेथील सफाई पाहिल्यानंतर कळते. अनेक कार्यालयात पाऊल टाकायचे म्हटले तरी नको होते, पण कामानिमित्त त्या कार्यालयात जावेच लागते. जर कार्यालये चांगली आणि स्वच्छ असतील, तर काम करण्यासही हुरूप येतो. मनही प्रसन्न राहते आणि कर्मचारीही मनापासून कामात व्यस्त राहतात. सरकारच अस्वच्छ आणि अपुऱ्या सुविधा देऊन या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेणार असेल, तर त्यांचा कामे पूर्ण करण्याकडे किती कल असू शकतो याची कल्पनाही करवत नाही. काही सरकारी कार्यालयांचा भाग मोडलेल्या खुर्च्या, टेबल व इतर साहित्यांनी भरलेले आहेत, पण तेही काढले जात नाही. त्याशिवाय काही कार्यालयांमध्ये डासांचा प्रादूर्भावही दिसतो, जणू हे डास याच कार्यालयाचे प्रतिनिधित्व करतात असा भास त्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना निश्चित होत असेल. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना संत तुकारामांच्या ‘आलिया भोगासी असावे सादर’ या ओळी नक्कीच आठवत असतील.∙∙∙

स्वप्नांच्या घोड्यावर...

परवा फोंडा येथे घेतलेल्या ‘जनता दरबारा’त गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी फोंड्यात तीन मंत्री असूनसुद्धा फोंड्यातील समस्या कमी होत नाही असे सांगून आगामी निवडणुकीत तीनही मंत्र्यांना घरी पाठवा, असे आव्हान केले. आता फोंड्याचे मतदार हे त्यांचे आव्हान किती गांभीर्याने घेतात हे सांगणे कठीण असले तरी काही इच्छुक उमेदवारांना आताच आपण मंत्री झाल्यासारखे वाटायला लागले आहे एवढे मात्र नक्की. विजयांच्या या आव्हानाची आज फोंड्यात दिवसभर चर्चा सुरू होती. तर दुसऱ्या बाजूला इच्छुक उमेदवारांना स्वप्नांच्या घोड्यावर स्वार झाल्यासारखे वाटत होते. आता हे त्यांचे ‘सपने’ प्रत्यक्षात उतरतात का ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरतात हे मात्र बघावे लागेल. हे आम्ही नाही फोंड्यातील लोकच असे बोलायला लागले आहेत. आता बोला. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; गावडेकडील शिल्लक हत्ती....

अपघात रोखण्यासाठी खड्डे!

राज्यातील रस्त्यांवर सध्या केवळ खड्डेच खड्डे दिसत असल्यामुळे आता सरकारने अपघात रोखण्यासाठी ही ‘खड्ड्यांची नवीन योजना’ आणली की काय, अशी चर्चा लोक करू लागले आहेत. खड्ड्यांमुळे गाडीचा वेग आपोआपच कमी करावा लागतो, परिणामी अपघात होणार नाहीत,अशी एक वेगळीच शक्कल सरकारने लढवून ही अनोखी योजना आमच्या माथी मारली आहे, अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळतेय. मात्र, या ‘अनोख्या योजने’चा परिणाम म्हणून तरी रस्त्यांचे डांबरीकरण होईल का, हे आता येणारा काळच ठरवेल. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: भरत परब हे मनोज परबांचे वडील असल्याचा खोटा दावा, बनावट व्हिडिओविरोधात RGP कडून तक्रार दाखल

ती सोलर फेरीबोटीची पुनरावृत्ती होणार नाही ना?

आपले नदी परिवहन खाते वेगवेगळे प्रयोग करण्यात माहीर असल्याची टीका सतत होत आहे. या प्रयोगांवर सरकारचे कोट्यवधी रुपयांचे मात्र वाया जात असतात. मोठा गाजावाजा करून व अनेक कोटी खर्चून आणलेली सोलर फेरीबोट अजून काही मार्गस्थ होत नाही. कारण येथील सुविधा व जलमार्ग तिला सुयोग्य नाहीत, पण असे अनेक अनुभव आल्यावरसुध्दा सरकार शहाणे होत नाही अशी टीका सरकारने घेतलेल्या वॉटर टॅक्सी निर्णयावरून होत आहे. काहीजण तर नेमके कोणाचे हितरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असा आरोप करू लागले आहेत. कारण या टॅक्सीसाठी जे जलमार्ग प्रस्तावित केले आहेत ते व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरणार का अशी विचारणा केली जात आहे. या सेवेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या व नंतर ते मार्ग किफायतशीर ठरले नाहीत, तर तो खर्च वाया जाणार नाही का हा प्रश्न उरतोच. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com