Goa Politics: खरी कुजबुज; गावडेकडील शिल्लक हत्ती....

Khari Kujbuj Political Satire: राज्य सरकार मोठ्या तोऱ्याने म्हणते, ‘आम्ही आता गुणवत्तेवर आधारित नोकऱ्या देतो!” आणि त्यासाठी राज्य कर्मचारी भरती आयोग कार्यान्वितही केला आहे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

गावडेकडील शिल्लक हत्ती....

गोविंद गावडे भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्रियोळात त्यांचा एकमेव भाजप मेळावा झाला. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढविले. मुख्यमंत्र्यांमुळे आपल्याला दहा हत्तीचे बळ मिळाले असल्याचे त्‍यांनी जाहीर केले आणि त्याच उत्साहाच्या भरात थेट ढवळीकर बंधूंवर तुटून पडले. गावडेंच्या उद्धटपणाची दिल्ली दरबारी पोहोचलेली तीन उदाहरणे दामू नाईक माध्यमांना देतात, त्यातील हे एक. सुरवातीला लागोपाठ निवडणुका हरत असलेल्या गावडेंना मागील दोन निवडणुकात भाजपने हत्तीचे बळ दिल्यानेच ते जिंकले, असा दावा भाजपवाले करतात, तर दुसऱ्या बाजूला, गावडे यांनी आपले हत्तीचे बळ डॉ. सावंताच्या मागे उभे केल्याने ते मुख्यमंत्री झाले, असा दावा ‘प्रियोळ प्रगती मंच’वाले करतात. मुख्यमंत्र्यांनी गावडे यांच्‍याकडे पाठ फिरविली म्हणजे आता ते दहा हत्ती गेले. शिवाय, गोविंद गावडेंच्या मागे उभा राहणारा ‘उटा’चा हत्ती सरकारने तात्पुरता गायब केला. कालच्‍या प्रकाश वेळीप यांच्‍या पत्रकार परिषदेनंतर तसेच वाटले. आता या वजाबाकीनंतर गावडेंकडे अजून किती हत्तींचे बळ शिल्लक आहे, याचा शोध भाजपची ‘थिंक टॅँक’ घेत आहे.∙∙∙

सिल्वेरा यांचा गौप्यस्फोट

राज्य सरकार मोठ्या तोऱ्याने म्हणते, ‘आम्ही आता गुणवत्तेवर आधारित नोकऱ्या देतो!” आणि त्यासाठी राज्य कर्मचारी भरती आयोग कार्यान्वितही केला आहे. पण दुसरीकडे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वरा बिनधास्त सांगतात – “हो, मी शिफारस पत्रे दिली आहेत!” मग प्रश्न असा — शिफारशीचे वजन भारी की गुणवत्तेचा गवगवा फक्त जाहिरातीपुरता? एकीकडे परीक्षा, मुलाखती, मेरिट लिस्ट... आणि दुसरीकडे ‘हा माझा माणूस आहे’ ची चिठ्ठी पुरेशी? सरकार म्हणतं – "पारदर्शकता आमचा पाया!" जनता म्हणते – "त्याच पायावर तुमचं सगळं स्वार्थाचं घर बांधलेले दिसते!" थोडक्यात, नोकरी मिळवायची असेल तर अभ्यासापेक्षा ओळख उपयोगी – हेच आजही खरे!∙∙∙

विजय विथ जना!

काणकोणमध्ये काँग्रेस पक्षाची पताका जनार्दन भंडारी यांनी फडकावत ठेवली आहे. जनार्दन भंडारींनी राजधानी पणजीत कॉंग्रेसतर्फे केलेली आंदोलने लोक आजही विसरणार नाहीत. परंतु पक्षांतर्गत कलहाचा फटका बसल्यानंतर त्यांनी ‘आपले काणकोण बरे’ असे म्हणत काणकोणमध्येच पक्षकार्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनसेना उभी केली आणि या सेनेच्या माध्यमातून आंदोलने सुरू झाली. २०२७ मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांना आहे. पण त्यावेळीही काहीजण उमेदवारीला खोडा घालू शकतात, असेही त्यांना वाटत राहिले आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईंच्या काणकोणातील दौऱ्यावेळी जनार्दन भंडारी त्यांच्याबरोबर फिरत होते. त्यांच्या या फिरण्यामुळे काँग्रेसमधील काहीजणांना आश्‍चर्यही वाटले असणार आहे. मात्र, २०२७ मध्ये उमेदवारी मिळविण्याच्यावेळी आणीबाणीची वेळ आलीच तर दुसरा एखदा पर्याय उपलब्ध तर ते करीत नसावेत ना, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. ∙∙∙

प्रकाशसरांचा गोंधळ की, व्हिक्टिम कार्ड?

‘वेड पांघरुण पेडगावला जाणे’, याचा अर्थ प्रकाश वेळीप यांना नक्कीच माहीत असणार. ‘उटा’ संघटनेवर दक्षिण गोवा जिल्हा उपनिबंधकानी निर्बंध लादल्याने राज्यातील आदिवासी समाजावर अन्याय झाला आहे, असा दावा प्रकाश वेळीप यांनी केला आहे. ‘उटा’ संघटना कोणत्याही आठ संघटनांनी मिळून स्थापन केलेली नसून ही संघटना काही स्वतंत्र व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना असल्याचा दावा प्रकाश वेळीप यांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे केला होता. ‘युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स’ या संघटनेचा इतर संघटनांशी कोणताच संबंध नसल्याचे स्पष्टीकरण वेळीप यांनी उपनिबंधकांना दिले आहे. प्रकाश वेळीप यांच्या म्हणण्याप्रमाणे जर ‘उटा’ संघटनेचा इतर संघटनांशी व ट्रायबल समाजाशी संबंध नाही व ती स्वतंत्र लोकांनी स्थापन केलेली संघटना असेल तर त्या संघटनेवर निर्बंध लादल्यास ट्रायबल समाजावर अन्याय कसा झाला, असा प्रश्‍न एसटी समाजातील जाणकार विचारत आहेत. शिवाय त्या संघटनेत अनागोंदी चालल्याची तक्रार एसटी समाजातील लोकांनीच केली आहे. प्रकाशसर यात इतरांचा व सरकारने अन्याय करण्याचा प्रश्‍न कुठून येतो ? आपण गोंधळात की, व्हिक्टिम कार्ड खेळताहात, असे आम्ही नव्हे नेटिझन्स विचारत आहेत. ∙∙∙

‘गेला तो गेला, परत नाही!’ ‘मगो’ची धमाल

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती देताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, एकदा पक्ष सोडून गेलेला आमदार परत घेणार नाही, आणि तिकिटही मिळणार नाही! काय म्हणावं याला? ‘सोडून गेलेल्यांची लायनी लावायची गरजच उरलेली नाही’ अशीच काहीशी गोष्ट! त्यात भर म्हणजे, पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदाराला मंत्रिपद नाही – फक्त अध्यक्षपद! आधी ‘शिका’, मग काम करा – असा सल्ला! पण तोच आमदार दुसऱ्या पक्षात गेलाच, तर मग मंत्रिपदही मिळेल आणि शिकायलाही नको – हे सगळ्यांना माहीत आहे.∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; जनता दरबारात खोडा घालण्‍यासाठी रॅली?

चुकीचे कोण, प्रकाश की उदय?

तांत्रिक मुद्यांवर केलेले युक्‍तीवाद न्‍यायालयात जरी चालत असले तरी समाजकार्यात ते चालत नाहीत. उदाहरण द्यायचे झाल्‍यास ‘उटा’ बद्दल अध्‍यक्ष प्रकाश वेळीप यांनी घेतलेली भूमिका. ‘उटा’ची ज्‍यावेळी नाेंदणी झाली त्‍यावेळी त्‍या नोंदणीच्‍या मसुद्यात कुठल्‍याही संस्‍थेचा नामोल्‍लेख नसल्‍याने आता प्रकाश वेळीप हे ‘उटा’ ही आठ संघटनांनी एकत्र येऊन तयार केलेली शिखर संघटना असे मानत नाहीत. तर ती चौदा सदस्‍यांनी स्‍थापन केलेली सोसायटी असे सांगतात. मात्र यापूर्वी ‘उटा’चेच खास सचिव असलेले डॉ. उदय गावकर यांनी बाळ्‍ळीच्‍या आंदोलनाची पार्श्वभूमी देऊन ‘उटा संघर्ष’ हे पुस्‍तक लिहिले आहे, त्‍यात त्‍यांनी या आठही संघटनांच्‍या नांवांसह ‘उटा’ची स्‍थापना कशी झाली ते सविस्‍तर लिहिले आहे. जर प्रकाश वेळीप ‘उटा’ संघटना ही आठ संघटनांनी एकत्र येऊन तयार केलेली संघटना नाही, असे म्‍हणत असतील आणि उदय गावकर त्‍याच्‍या परस्‍पर विरोधात मत मांडत असतील तर चूक कुणाला ठरवायचे? प्रकाश सरांना की उदय सरांना? ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: गोव्यात राजकारणाला ‘उकळी’! काँग्रेस, फॉरवर्ड नरम-गरम; कुडचडेत एकाच दिवशी मेळावे

दिगंबरचे ‘पेरू’चे झाड

दिगंबरबाबांना भाषण करताना आपल्या जुन्या आठवणी सांगण्याची मोठी हौस. काही लोकांना त्यांचे हे भाषणही आवडते. वन महोत्सव आला की, त्यांना फातिमा कॉन्व्हेंटमध्ये लावलेल्या पेरूच्या झाडाची आठवण येते. नंतर पहिला पेरू आपल्याला कुणीतरी आणून दिला हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तरळतो. पण गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक वनमहोत्सवाच्या दिवशी त्यांना या पेरुच्या झाडाची आठवण होते, आजही झाली. पण प्रत्येक वेळी चार वर्षां पूर्वी पेरुचे झाड लावले होते, असे ते सांगतात. चार वर्षां पूर्वीही चारच वर्षें होती आणि आजही चारच वर्षे. गणितात काही तरी गोंधळ झालेला दिसत नाही का?, आज आठ वर्षे व्हायला नको होते का? ज्यांनी आजच्या त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनाही गणित चुकल्यासारखे वाटणे साहजिकच आहे की, नाही! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com