

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजी) आमदार वीरेश बोरकर आणि पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत (सीईसी) झालेल्या वाटाघाटी अपूर्णावस्थेत असतानाच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षाने दहा पदाधिकाऱ्यांना मंगळवारी निलंबित केले. त्यातील सहाजण गत विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’चे उमेदवार होते.
मनोज परब यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासह संस्थापक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता ‘आरजी’त आमदार वीरेश बोरकर आणि अजय खोलकर-विश्वेश नाईक असे दोन गट पडले आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार बोरकर यांनी ‘सीईसी’समोर उपस्थित राहून आपले सर्व प्रश्न मांडले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत अजय खोलकर आणि बोरकर यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगल्याचे व्हिडिओही गोमंतकीयांनी पाहिले होते. परंतु, बोरकर यांनी सामंजस्याने वाद वाढू दिला नव्हता. त्यानंतरच्या काळातही आमदार बोरकर, पुढील विधानसभा निवडणूक (Election) ‘आरजी’कडूनच लढवणार असल्याचे स्पष्टपणे सांगत असतानाही आता पक्षाने त्यांच्या मर्जीतील दहाजणांना निलंबित केल्याने बोरकर आणि खोलकर-नाईक या दोन गटांतील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.
ज्यांना निलंबित केले, त्यापैकी प्रशांत पागी, ल्युसिओ रॉनकॉन, प्रेमानंद गावडे, डेग्ली फर्नांडिस, विशाल देसाई. आदित्य देसाई या सहाजणांनी २०२२ ची विधानसभा, तर मनिला शिरोडकर यांनी गत जिल्हा पंचायत निवडणूक ‘आरजी’च्या उमेदवारीवर लढविली होती. हे सर्वजण बोरकर यांच्याजवळचे असल्याने त्यांच्या गटात असंतोष निर्माण झाला अाहे.
आमदार वीरेश बोरकर यांनीही यापूर्वी पक्षविरोधी कारवायांत सहभाग घेतला, ‘सीईसी’च्या बैठकांना दांडी मारली, असे आरोप अजय खोलकर आणि विश्वेश नाईक यांनी केले होते. त्यामुळे या दहाजणांप्रमाणेच आरजी आमदार बोरकर यांच्यावरही निलंबनाची कारवाई करणार का? याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत.
१. प्रशांत पागी
२. ल्युसिओ रॉनकॉन
३. मनिला शिरोडकर
४. राहुल नाईक
५. प्रेमानंद गावडे
६. डेग्ली फर्नांडिस
७. मेल्विन दा सिल्वा
८. विशाल देसाई
९. आदित्य देसाई
१०. संजन (सॅम) नाईक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.