Goa Politics: खरी कुजबुज; सर, खरेच आपल्याला मंत्रिपद नको होते का?

Khari Kujbuj Political Satire: कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना मॅडम सध्या म्हणजे दुहेरी रेल्वेमार्गाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना दिसत नाहीत अशी चर्चा आहे. . पण एक एलिनाबायच का?
Goa Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

सर, खरेच आपल्याला मंत्रिपद नको होते का?

‘ताकाक येवन गडगो लिपोवप’ अशी गोव्‍याच्‍या ग्रामीण भागात एक म्हण आहे. माजी सभापती, एसटी समाजाचे नेते तथा क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी आपल्याला मंत्रिपद नको होते. शेवटच्या वेळी मंत्रिपद मिळाल्याने जनतेची कामे करण्यास पुरेसा अवधी मिळणार नसल्याचे विधान करून नव्या वादात भर टाकली आहे. मंत्री साहेब, जर खरोखरच आपल्याला मंत्रिपद नको होते तर सभापतिपद सोडून मंत्रिपदाची शपथ घेण्यास आपल्यावर कोणी दबाव टाकला होता? आपण केवळ गोविंद गावडे यांना धडा शिकविण्यासाठीच मंत्रिपद घेतले आहे का? की आपल्याला मिळालेल्या खात्यावर आपण खूष नाहीत? की आदिवासी कल्याण खात्याला आपण न्याय देऊ शकणार नाही अशी आपल्याला भीती आहे? असे प्रश्‍‍न आम्‍ही नव्‍हे, तुमचेच हितचिंतक विचारू लागले आहेत. ∙∙∙

माजी आमदार झाले ‘अदृश्य’

कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना मॅडम सध्या म्हणजे दुहेरी रेल्वेमार्गाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना दिसत नाहीत अशी चर्चा आहे. पण एक एलिनाबायच का?. गेल्या दहा-बारा वर्षांत अचानक प्रकाशात आलेले व नंतर आमदार बनलेले अनेक जण सध्या कुठेच दिसत नाहीयत. एलिना मॅडम या तशा अपघाताने राजकारणात आल्या व पर्रीकरांमुळे मंत्रीही बनल्या हे खरेच. त्यांच्याप्रमाणेच अपघाताने मंत्री बनलेले व चर्चिलना हरवून जायंट किलर ठरलेले नावेलीचे आवेर्तान असो, बाणावलीचे कायतू असो वा वेळ्ळीचे बेंजामीन, यापैकी सध्या राजकारणात कोणीच दिसत नाहीत. शिरोड्यात सुभाषबाबना पराभूत केलेले महादेव नाईक असो वा काणकोणचे विजय पै खोत असो वा उपसभापती झालेले इजिदोरबाबही असो, सध्या कोणीच सक्रिय नाहीत. राजकारणात एकेकाचे दिवस असतात व ते संपले की त्यांची दखल घेतली जात नाही हेच खरे. त्यांच्या मागे लागते ते ‘माजी’ हे बिरुद. ∙∙∙

कला अकादमीचे नंतर काय ते पाहू...

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांना लोहमार्ग दुपदरीकरणाविषयी पत्रकारांनी प्रश्‍‍न केल्यावर त्यांनी वादग्रस्त विषयावर बोलायचे नाही असे सांगत आपण पीडब्ल्यूडी मंत्री असल्याची आठवण करून दिली. मात्र कामत यांना तसेच जाऊ देण्यास पत्रकार तयार नव्हते. कला अकादमीचे बांधकाम पीडब्ल्यूडीकडे आहे याची माहिती पत्रकारांना होतीच. यानंतर पुन्हा कामत पत्रकारांना सामोरे गेल्यावर कला अकादमीसंदर्भातील प्रश्‍‍न कामतांवर येऊन आदळला. त्यावेळी त्यांनी आधी रस्त्यांचे पाहू, प्राधान्य रस्त्यांना बाकी सारे नंतर, असे उत्तर देऊन आपली सुटका करून घेतली. त्यामुळे कला अकादमीचा विषय आपल्याला सोडणार नाही याची खूणगाठ कामत यांनी खात्यांचा ताबा घेतल्याच्या पहिल्याच दिवशी बुधवारी मारली असणार! ∙∙∙

तवडकरांचे ‘हायो रब्‍बा’

आदिवासी कल्‍याणमंत्री रमेश तवडकर हे लोकांमध्‍ये मिळून मिसळून काम करणारे. त्‍यामुळे काणकोण मतदारसंघात त्‍यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. कुठलाही सण असल्‍यास तवडकर आपला सभापतिपदाचा बाज बाजूला ठेवून लोकांमध्‍ये सामील व्‍हायचे. आता मंत्री झाल्‍यावरही त्‍यांनी आपली ही सवय सोडलेली नाही. दोन दिवसांपूर्वी काणकोणात झालेल्‍या गणेश विसर्जनावेळीही हेच दिसून आले. यावेळी त्‍यांनी ‘हायो रब्‍बा’ या गाण्‍यावर इतर कार्यकर्त्यांसमवेत ठेका धरला. सध्‍या हा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. त्‍यामुळे तवडकर पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहेत. ∙∙∙

मडगावची वाहतूक ‘रेस-कोर्स’

वाहतूक कोंडी ही मडगाव शहरासाठी शाप ठरली आहे. पश्चिम बगलमार्ग वाहतुकीस खुला झाल्यावर ती सुटेल असे प्रत्येकजण छाती पुढे काढून सांगत असे. पण हा रस्ता खुला होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला, पण समस्‍या काही सुटलेली नाही. आता रावणफोंड पूल अवजड वाहनांना बंद झाल्याची सबब पुढे केली जात आहे, पण त्यात काही तथ्य नाही. मडगावहून बंगळूर, मंगळूर व म्हैसूरकडे जाणाऱ्या दहा चाकी बसगाड्या शहरातून जातात व येतात. त्यामुळे गर्दीच्या वेळी ही कोंडी जास्त होते अशा तक्रारी आहेत. घाऊक मासळी मार्केटजवळ पश्‍मिच बगलरस्त्याला जर मडगाव कदंब बसकडून येणाऱ्या रस्त्याला जोडले असते तर या बसेस परस्पर तशा वळविता आल्या असत्या. पण बगलमार्गाला होत असलेल्या विरोधाच्या कल्लोळात ते भान कोणालाच राहिले नाही. त्यामुळे तशी वाहतूक वळवायची झाली तर वाहनांना तीन-साडेतीन किलोमीटरचा वळसा घेऊन नुवेपर्यंत जाऊन परत फिरावे लागते. हा सर्व उपद्व्‍याप टाळण्यासाठी सर्व वाहतूक शहरातील मार्ग धरते. आता नवीनच सार्वजनिक बांधकाममंत्री बनलेले दिगंबर कामत याकडे लक्ष देतील का? ∙∙∙

क्रिकेटचे ‘राजकारण’

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रंग भरू लागले आहेत. माजी सभापती व भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश पाटणेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे या निवडणुकीस आता ‘राजकीय’ महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपचे युवा नेते व कुडचडेतून आमदारकीसाठी इच्छुक असलेले रोहन गावस देसाई जरी बीसीसीआयचे संयुक्त सचिव असले तरी त्यांना गोव्यातील क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे. त्यादृष्टीने त्यांना संघटनेच्या मावळत्या समितीतील काही असंतुष्टांची साथ मिळत आहे. माजी अध्यक्ष चेतन देसाई व विनोद फडके एकत्र आल्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. आपल्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आशीर्वाद असल्याचा दावा एक गट करत आहे. या गटाकडून मुख्यमंत्री कार्यालयाचा वापर जीसीए निवडणुकीसाठी होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. आपल्या गटाला मत नाही दिले तर ‘बघून घेऊ’ असा धमकीवजा इशारा या गटाकडून मिळत असल्याचे काही क्लबांचे म्हणणे आहे. आता बघू, घोडेामैदान जवळच आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; पाच रुपयांना दहा नारळ

कामतांची नजर वीज खात्‍यावर?

मंत्रिपदाची शपथ घेतल्‍यानंतर तब्‍बल चौदा दिवसांनी बुधवारी दिगंबर कामत यांनी ‘पीडब्‍ल्‍यूडी’, बंदर-कप्‍तान आणि वजन-माप या तीन खात्‍यांच्‍या कारभाराची सूत्रे स्‍वीकारली. २००७ ते २०१२ अशी पाच वर्षे मुख्‍यमंत्रिपदाच्‍या खुर्चीत बसलेले कामत बुधवारी मंत्रिपदाच्‍या खुर्चीत विराजमान झाले. त्‍यामुळे आपल्‍याकडील खात्‍यांच्‍या अनुषंगाने ते काय बोलणार, याकडे जनतेचे लक्ष होतेच. पत्रकारांनी कामतांना पहिला प्रश्‍‍न विचारला तो ‘पीडब्‍ल्‍यूडी’चा. पण, या प्रश्‍‍नाला उत्तर देताना त्‍यांनी ‘पीडब्‍ल्‍यूडी’पेक्षा वीज खात्‍यावर अधिक जोर दिला. सलग आठ वर्षे वीजमंत्रिपदावर राहण्‍याचा विक्रम आपण नोंदवला आहे. असा विक्रम संपूर्ण देशात कुणाच्‍या नावावर नाही असे म्‍हणत, वीजमंत्री असताना आपण काय-काय केले, याचे दाखले देण्‍यास त्‍यांनी सुरवात केली. त्‍यामुळे कामतांची ‘नजर’ ‘पीडब्‍ल्‍यूडी’पेक्षा वीज खात्‍यावर अधिक होती का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: 'मग तुम्हीच तो DPR जनतेसमोर आणा!’ मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवरुन अमित पाटकरांचं सुदिन ढवळीकरांना थेट आव्हान

‘टार्गेट’ दिगंबर?

हॉस्‍पेट ते तिनईघाटपर्यंतच्‍या रेल्‍वेमार्ग दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्‍याची आणि या मार्गावरून कोळशाची वाहतूक होणार असल्‍याची घोषणा केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी केली. त्‍यामुळे राज्‍यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्‍यातच सरकारची बाजू उचलून धरत मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मात्र या प्रकल्‍पाला काँग्रेसला जबाबदार ठरवत निषेधही केला. दुपदरीकरण प्रकल्पाचा सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल (डीपीआर) २००८-२००९ मध्‍ये तयार झाला. त्‍यावेळी केंद्रात आणि राज्‍यात काँग्रेसचे सरकार होते. तेव्‍हा राज्‍याचे मुख्‍यमंत्रीही काँग्रेसचे होते, असेही ढवळीकर म्‍हणाले. त्‍यामुळे पत्रकारांनी आपला मोर्चा त्‍या काळात काँग्रेसचे मुख्‍यमंत्री असलेले आणि बुधवारीच मंत्रिपदाचा ताबा स्‍वीकारलेले दिगंबर कामतांकडे वळवला. पण, राजकीयदृष्‍ट्या तरबेज असलेल्‍या कामतांनी पत्रकारांवरच आगपाखड केली. ‘तुम्‍ही या विषयाचे राजकारण करू नका, वाद होईल असे मी काहीही बोलणार नाही, तुम्‍हाला काय छापायचे ते छापा’ असे म्‍हणत या विषयावर बोलणेच टाळले. पण, त्‍यानंतर मात्र सुदिननी केलेली वक्तव्‍ये नेमक्‍या कोणत्‍या हेतूने होती? त्‍यांना दिगंबरना ‘टार्गेट’ करायचे होते का? या प्रश्‍‍नांनी उत्तरे अनेकजण शोधू लागले. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com