
कुंभारजुवेच्या मांडवीत सजलेल्या सांगोडोत्सवात छत्रपती शंभुराजांचा देखावा उठून दिसत होता. कैदेत असतानाचा साखळदंडांनी जखडलेला प्रसंग बोटीवर उभा केला होता. त्याला ‘छावा’ चित्रपटाच्या पोस्टरची जोड मिळाल्याने वातावरण भारावून गेलं. क्षणभर संभाजी महाराजांचं शौर्य आणि यातना प्रेक्षकांसमोर जिवंत झाल्यासारखं वाटलं. आणि मग सुरू झाला जयघोषाची लाट ‘संभाजी महाराज की जय’. ∙∙∙
गोव्यातील लोक देव-देवतांना मानणारे. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावरून ते स्पष्ट होतेच, शिवाय इतर उत्सवांतूनही त्याचा प्रत्यय येतो. सध्या गोव्यातील नगरसेवक असो की मंत्री, त्यांना लालबागच्या राजाचे आकर्षण वाढले आहे. गणेशोत्सव काळात ही मंडळी मुंबई दौरा करतात. लालबागचा राजा आणि गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या गणपतीचे दर्शन घेणे असा कार्यक्रम आता नित्याचा होऊ लागला आहे. विशेष बाब म्हणजे केवळ हिंदूच या गणपती दर्शनाला जात नाहीत, तर ख्रिश्चन आमदारही जातात. नवसाला पावणारे गणपती म्हणून त्यांची ख्याती असल्याने तेथे दर्शनाला जाणारी मंडळी नवस तर बोलून येत नसतील ना? असा प्रश्न नक्कीच अनेकांच्या मनात येत असेल. गेल्या काही वर्षांपासून लालबागच्या राजाला जाणाऱ्यांची मंडळाच्या अध्यक्षांशी चांगली ओळख झाल्याने आता त्यांना व्हीआयपी प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जातो. त्यामुळे या नेतेमंडळींची कॉलर ताठ झाली आहे म्हणे. ∙∙∙
गोव्यात विरोधी पक्षात फक्त सातच आमदार आहेत. त्यामुळे विरोधक आहेत की नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवाय हे सातही आमदार एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये करत असल्याने ते अधिक विखुरलेले दिसत आहेत. मात्र अशा परिस्थितीत रेल्वे मंत्रालयाने गोव्यातील रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. त्यामुळे या एका प्रश्नावरून विखुरलेले विरोधक एकत्र येणार का, अशी उत्सुकता आहे. जर तसं झालं तर भाजपसाठी हा मुद्दा ‘ब्लेसिंग ईन डिझगायज’ ठरणार की डोकेदुखी, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙
मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या घरी भेट दिल्याची बातमी भंडारी समाजाचे नेते देवानंद नाईक यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर टाकली. या एका स्टेटसने अनेक चर्चांना तोंड फुटले आहे. अनेकांच्या मते, देवानंद यांनी हा फोटो केवळ ‘गणेश दर्शनासाठी बाबूश आले होते’ हे दाखवण्यासाठी ठेवला नाही, तर यामागे राजकीय संदेश दडलेला आहे. ‘बाबूश यांचा पाठिंबा माझ्याच गटाला आहे’ हे दाखवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे गणेशोत्सवातही राजकीय ‘मोदक’ मिळवण्याची चढाओढ सुरूच आहे. ∙∙∙
कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांनी आमदार गोविंद गावडे यांच्यावर शरसंधान करणे अद्याप सोडलेले नाही. एका मुलाखतीत त्यांना कला अकादमीविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी ‘कला अकादमीचा विषय वादग्रस्त ठरण्यास तत्कालीन मंत्र्याची विधानेही कारणीभूत होती’ असा शेरा मारला. ‘शहाजहान’, ‘ताजमहाल’ असे शब्दप्रयोग झाल्याने प्रकरणे अंगावर ओढवून घेतली गेली होती याकडे तवडकर यांनी लक्ष वेधले. यावरून तवडकर यांच्या मनातील कटुता अद्याप गेली नसल्याची चर्चा आहे. त्यांनी संधी मिळताच शरसंधान केले आहे. त्याला आता गावडे प्रत्युत्तर देतील काय याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. गावडे यांनी मात्र तवडकर यांच्यावर बोलणे अलीकडे टाळले आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद मिटविण्यासाठी समाजातील काही लोकांनी प्रयत्न केला होता. काही काळ तलवारी म्यान झाल्या होत्या. पुन्हा वाद सुरू झाला आणि त्याच परिणती कशात झाली, हे सर्वांसमोर आहे. यामुळे तवडकर हे गावडे यांच्यावर आता तरी तोंडसुख घेणार नाहीत असे अनेकांना वाटत होते. मात्र नाव न घेताही कला अकादमीच्या विषयावरून तवडकर यांनी शाब्दीक बाण गावडे यांच्या दिशेने सोडलेच. ∙∙∙
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गणेशोत्सवाचे निमित्त साधत नेते, कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेणे सुरू ठेवले आहे. मंगळवारी ते डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या निवासस्थानी पोचले. सातव्या दिवशी गणेश दर्शन घेताना त्यांच्यासोबत म्हापशाचे आमदार आणि उपसभापती ज्योशुआ डिसोझा, साळगावचे आमदार केदार नाईक, मयेचे आमदार प्रमेंद्र शेट यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी होते. दामू यांच्या या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांच्या निवासस्थानी जाण्याची वेळ साधत दामू यांनी अपक्ष आमदार डॉ. शेट्ये यांचे निवासस्थान गाठले. त्यातून त्यांनी राजकीय संदेश दिल्याची चर्चा आहे. ∙∙∙
राज्यात नारळ महागले म्हणून फलोत्पादन मंडळाने चतुर्थीला स्वस्त नारळ देण्याची योजना आणली. पण गणपतीसमोर ठेवायचं ओझं हलकं झालं असं कुणालाच वाटलं नाही. कुंभारजुवेच्या सांगोडोत्सवात तर थेट नदीपात्रातून नारळ विक्री झाली. कुणीतरी पात्रांतून ओरडत होतं ‘पाच रुपयांना दहा नारळ घेऊन जा हो’. लोकही हसत-खिदळत प्रतिसाद देत होते. व्यासपीठावरून मंत्री माविन, आमदार राजेश आणि प्रेमेंद्रजी निवांत बघत होते. त्या पात्राचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचत होता... ‘तुम्हालाही मिळवून दाखवा बरं, स्वस्तात नारळ’ हे आव्हान लोकप्रतिनिधींना पेलता येणार का, हाच प्रश्न रसिकांत रंगला होता. ∙∙∙
अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ विधानसभेचे सर्वोच्च सभापतिपद भूषवलेले रमेश तवडकर यांना भाजपने काहीच दिवसांपूर्वी मंत्रिपदाची संधी दिली. सभापतिपदाचा राजीनामा देत मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून तवडकर नेहमी एकच वाक्य म्हणत आहेत, ते म्हणजे आपल्याला मंत्रिपद नकोच होते. दोन दिवसांपूर्वी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यापुढे जाऊन विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून मंत्रिपदासाठी आपल्या नावाचा विचार करू नका, असे सांगितले होते. विधानसभा निवडणूक अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. मधल्या काळात जिल्हा पंचायत, नगरपालिका निवडणुका असतील. त्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे मंत्री म्हणून काम करण्यास पुरेसा वेळ मिळणार नसल्याने आपल्याला मंत्रिपद नको होते, असे तवडकरांनी स्पष्ट केले. पण, गेल्या काही महिन्यांत तवडकर उपमुख्यमंत्रिपद मागत होते. त्यानंतर त्यांनी शिक्षण खात्यावर दावा केला होता. पण, मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडील आदिवासी कल्याण खात्यासह गोविंद गावडेंकडील खाती त्यांना दिली. त्यामुळे तवडकर नाराज असल्याच्या चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांत होत्या. या चर्चा आणि तवडकरांची सध्याची विधाने यांचा परस्पर संबंध असेल का? याचा अभ्यास आता राजकीय विश्लेषक करत आहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.