
पणजी: मान्सूनपूर्व पावसाने आज मंगळवारी राज्याला अक्षरश: झोडपून काढताना दोघांचे बळी घेतले. अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक तुंबली. म्हापशातील ‘बार्देश बझार’मध्ये पाणी घुसले तर डिचोलीत घरे पाण्याखाली गेली.
काणकोणात रवींद्र भवनाला गळती लागून आतमध्ये पाणी साचले. ‘दाबोळी’वरून विमाने दुसरीकडे वळविली, कोकण रेल्वेसेवाही ठप्प झाली. एकंदरीत या पहिल्या पावसाने गोवा सरकारच्या सज्जतेच्या मर्यादा उघड केल्या. मागील दोन-तीन महिन्यांपासून उष्म्याने हैराण झालेल्या गोमंतकीयांना या पावसाने दिलासा मिळाला असला तरी सर्वांची दाणादाण उडवून दिली.
आज सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले रिपरिप सुरू झाली. मात्र दुपारनंतर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. पावसाळीपूर्व कामांमध्ये झालेली हलगर्जी प्रकर्षाने दिसून आली. आपत्ती नियोजन बैठकही उशिरा झाली. साऱ्यांनीच पावसाला गृहित धरल्याचे स्पष्ट झाले.
रवींद्र भवनाच्या वास्तूला पहिल्याच पावसात गळती लागली. त्यामुळे कला व संस्कृती खात्याच्या या कामाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. घाईगडबडीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. वाचनालयातही पाणी साचले आहे. ते पुसून काढण्याची वेळ तेथील कर्मचाऱ्यांवर आलेली आहे.
सर्वाधिक पाऊस आज पेडण्यात १६१ मिमी म्हणजेच तब्बल ६.३३ इंच पडला. त्यानंतर म्हापशात ६.८ इंच, पणजीत ३.१८, मुरगावात २.९५, वाळपईत १.६९, सांगेत १.६५, केपेत १.५७ तर फोंड्यात १.१८ इंच पावसाची नोंद झाली.
दाबोळी विमानतळावर दिल्ली आणि पुण्याहून आलेली विमाने हैदराबादकडे वळविण्यात आली. शिवाय मुंबईहून आलेले विमान बेळगावला वळविले. मात्र स्थिती सुधारल्यानंतर ते माघारी बोलावण्यात आले, अशी माहिती दाबोळी विमानतळाचे संचालक जेम्स वर्गीस यांनी दिली.
गिरी ते पर्वरी तिस्क मार्गावर आज सायंकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. पावणेसहा ते सात या पाऊणतासाच्या काळात शेकडो वाहनचालक या कोंडीत अडकून पडले. साचलेले पाणी आणि उड्डाणपुलाचे काम यामुळे त्यात आणखी भर पडली, असे ॲड. ज्युईनो डिसोझा यांनी सांगितले. ते या वाहतूक कोंडीत अडकले होते. ते म्हणाले, पोलिस नियंत्रण कक्षात फोन केला, पण उपयोग झाला नाही. कुठेही पोलिसांचा मागमूस नव्हता. प्रशासन आणि वाहतूक पोलिस दोघेही अपयशी ठरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.