Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रांवचा वारसदार कोण...

Khari Kujbuj Political Satire: खरे म्हणजे तिसरा जिल्हा जाहीर होताच जनतेकडून वाहवा मिळणार, अशी कदाचित भाजप सरकारची अपेक्षा होती. मात्र, झाले भलतेच सरकारचा अपेक्षाभंग झाला.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
Published on
Updated on

रवी पात्रांवचा वारसदार कोण...

फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक मार्च महिन्यात होणार आहे. त्यासाठी अनेक इच्छुक तयार झाले आहेत, मात्र भाजपच्या तिकिटाचे दोन प्रभावी दावेदार आहेत, त्यात एक म्हणजे रितेश नाईक आणि दुसरे म्हणजे विश्‍वनाथ दळवी. दोन्ही गडी तसे तगडे, त्यामुळे कुणाला तिकीट द्यायची हा पेच भाजप श्रेष्ठींसमोर आहे. एकाला तिकीट दिली तर दुसरा दुखावतो, मात्र एकाने माघार घेतली तर दुसऱ्याचा मार्ग सूकर. पण माघार कोण घेणार हा प्रश्‍न आहे. सध्या तरी रवी पात्रांवचा वारसदार कोण याचीच चर्चा फोंड्यात सुरू आहे. ∙∙∙

तिसरा जिल्हा बनतोय डोकेदुखी!

‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’, असे म्हणण्याची पाळी आता सरकारवर आली असणार.जनतेच्या भल्याचा दावा करीत व केंद्र सरकारकडून पाचशे कोटी रुपये मिळणार या भरवशांवर सरकारने ‘कुशावती’ हा तिसरा जिल्हा जाहीर केला. खरे म्हणजे तिसरा जिल्हा जाहीर होताच जनतेकडून वाहवा मिळणार, अशी कदाचित भाजप सरकारची अपेक्षा होती. मात्र, झाले भलतेच सरकारचा अपेक्षाभंग झाला. कुशावती तिसरा जिल्हा नको, असे म्हणून मठग्रामात राहणारे काणकोणकर लढा देत आहेत. केपेकरांना जिल्हा मुख्यालय केपेत हवे आहे. कुडचडे कुशावती जिल्ह्याचे मुख्यालय करा, अशी आग्रही मागणी कुडचडेकर करतात.आता या पुढे जाऊन सांगितले एक वकील सांगे कुशावती जिल्ह्याचे मुख्यालय करा, या मागणीसाठी उपोषणावर बसले आहेत.‘चूड लाऊन म्हारू घरात घेणे’ म्हणतात ते असे. ∙∙∙

प्रशासन स्‍तंभलाही होणार विरोध?

चिंबलमधील प्रस्‍तावित युनिटी मॉल प्रकल्‍पाविरोधात स्‍थानिकांनी शड्डू ठोकलेला असतानाच सरकारने आता प्रशासन स्‍तंभची इमारतही चिंबलमध्‍येच उभारण्‍याचे नियोजन आखले आहे. चिंबलमधील सर्वे क्रमांक ४०/१ मधील २२,५०० चौरस मीटर जागेत हा प्रकल्‍प उभारण्‍यात येणार असून, त्‍यासाठी ३१५.९४ कोटींचा खर्च येणार असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरात म्‍हटले आहे. त्‍यामुळे या प्रकल्‍पाला स्‍थानिक सहकार्य करणार? की युनिटी मॉलप्रमाणेच रस्‍त्‍यावर येणार? याकडे राज्‍याचे लक्ष आहे. ∙∙∙

‘ती’ मागणी मुख्‍यमंत्री पूर्ण करणार?

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट स्‍टेडियम धारगळमधून वन म्‍हावळींगेत हलवण्‍यात यावे. त्‍यामुळे डिचोली तालुक्‍याचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये प्रत्‍येक अधिवेशनात करीत असतात. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही डिचोली तालुक्‍यातीलच असल्‍याने काहीही करून ते हे स्‍टेडियम वन म्‍हावळींगेतील ‘जीसीए’च्‍या जागेत आणतील, असे वाटत होते. परंतु, सरकारकडे तसा कोणताही प्रस्‍ताव नसून, स्‍टेडियम धारगळमध्‍येच उभे राहील, असे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे आता पुढील अधिवेशनात आमदार शेट आणि शेट्ये आपली मागणी मुख्‍यमंत्र्यांकडे कशापद्धतीने मांडणार? आणि त्‍यात त्‍यांना यश येणार का? याकडे डिचोलीवासीयांचे लक्ष लागून आहे. ∙∙∙

वर्षपूर्ती शुभेच्छा कार्यक्रमाबद्दल दामू अनभिज्ञ?

प्रदेशाध्यक्षपदाच्या वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित केलेल्या शुभेच्छा कार्यक्रमाची आपल्याला कल्पना नव्हती. आपल्याला इथे आल्यावरच खरी माहिती मिळाली. त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटले. भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कचेरीत ‘एसआयआर’ प्रक्रियेबद्दलची बैठक आहे, असे आपल्याला सांगण्यात आले असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. वर्षपूर्तीच्या निमित्ताने शुभेच्छा कार्यक्रम आयोजित केला आहे, हे दामू यांना माहीतच नव्हते, हे कोणाला पटण्यासारखे आहे का? ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: '2027 ची विधानसभा निवडणूक हे युद्धच, तयारीला लागा'! दामू नाईकांचे कार्यकर्त्यांना आवाहन; प्रदेशाध्यक्षपदाची वर्षपूर्ती

‘त्या’ नगरसेवकाची उडाली झोप

महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे काही आठवड्यांनी बदलेली प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलला सत्ता स्वतःकडे ठेवण्याचे आव्हान असणार आहे. कारण या निवडणुकीत त्यांचे राजकीय विरोधक उत्पल पर्रीकर यांनी विरोधात पॅनल उभे करण्याचे जाहीर केले आहे. त्याशिवाय दत्तप्रसाद नाईक यांनीही आपले दहा उमेदवार या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. असे असताना मंत्री बाबूश कोणाला तिकीट देणार आणि कोणाचा पत्ता कापणार याविषयी नगरसेवकांतच उत्सुकता आहे. पण मध्य पणजीतील भाजपच्या नगरसेवकाचा या निवडणुकीत पत्ता कट होणार असल्याची चर्चा रायबंदरपासून ते मीरामार येथील आमदारांच्या कार्यालयापर्यंत जोरदार सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू झाल्यापासून हा नगरसेवक आपलं सख्य असलेल्या सांतिनेजमधील नगरसेवकाबरोबर फिरतानाही दिसेनासा झाला असल्याचे सांगितले जात आहे. बाबूश हे उमेदवारांची यादी जाहीर करतील, तेव्हाच त्या उमेदवाराचा पत्ता कट झाला की नाही हे समजेल. पण त्याची सध्या झोप उडाली आहे हे नक्की. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; विधानसभेत आणणार अंथरुण

आता डॉक्टर बनणे झाले सोपे!

राजकीय हितासाठी आपण शिक्षणाचा दर्जा आणखी किती खालवणार आहोत? असा प्रश्न आम जनतेला पडणे स्वाभाविक आहे. आता म्हणे ‘नीट’ परीक्षेत शून्य पर्सेंटाइल म्हणजे आठशेपैकी मायनस (-) ४० गुण मिळाले तरी अनुसूचित जाती व जमातीचे उमेदवार वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. ‘ईडब्ल्यूएस’ उमेदवारांना सात पर्सेंटाइल व शारीरिक व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना पाच पर्सेंटाइल गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. आता हे सगळे करण्याची काय गरज होती.त्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षाच रद्द केली असती तर बरे झाले नसते का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com