Goa Politics: खरी कुजबुज; विधानसभेत आणणार अंथरुण

Khari Kujbuj Political Satire: मोरजी आणि हरमल या शांत समजल्या जाणाऱ्या गोव्‍यातील भागांत घडलेल्या महिलांच्या दुहेरी खुनानंतर आता भीती जितकी पसरली आहे, तितकीच चर्चाही रंगत आहे.
Goa Latest Political News
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

विधानसभेत आणणार अंथरुण!

‘विधानसभेत काही आमदार झोपतात. आम्ही ही बाब सभापतींच्या लक्षात आणून दिली आहे. तसेच त्यांच्‍यासाठी यापुढे विधानसभेत अंथरुणाची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे’’ असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकारांना सांगितले. ते सांगतात त्याप्रमाणे जो आमदार झोपतो, तो गोव्‍याला महाराष्ट्रात विलीन करावे, या बाजूचा होता. राज्‍यात कुणाचेही सरकार येऊ दे, त्या सरकारमध्ये कसे राहायचे ही कला त्याला चांगलीच अवगत आहे. विधानसभेत झोपला म्हणून आमचे काही नाही. पण झोपलेल्या अवस्थेत तो आमदार खाली पडला तर नंतर आम्हालाच जड जाईल. म्हणून ही बाब सभापतींच्या लक्षात आणून दिली आहे असा युरींचा दावा. आता हा झोपणारा आमदार कोण हे म्‍हणे सर्वांना माहीत आहे. ∙∙∙

मोक्षाचा शॉर्टकट?

मोरजी आणि हरमल या शांत समजल्या जाणाऱ्या गोव्‍यातील भागांत घडलेल्या महिलांच्या दुहेरी खुनानंतर आता भीती जितकी पसरली आहे, तितकीच चर्चाही रंगत आहे. चहाच्या टपरीपासून समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळच्या गप्पांपर्यंत ही एकच चर्चा. हा सगळा प्रकार मोक्ष मिळविण्यासाठी तर केला नाही ना? काहींच्या म्हणण्यानुसार, संशयिताच्या मनात ‘मोक्ष मिळवायचा असेल तर बळी हवा’ अशी कुठली तरी अजब, विकृत कल्पना ठसली होती म्हणे. मोक्षाचा मार्ग ध्यान, तपश्चर्येऐवजी थेट रक्तपातातून?, मोक्षासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज असते का? असा सवालही केला जातोय, पण उत्तर देणार कोण? पोलिस अधिकृतपणे काही सांगत नाहीत तोवर ही चर्चा थांबण्‍याची शक्यता कमीच. उलट, प्रत्येक अफवेला नवे पंख मिळतायत. आज मोक्ष, उद्या तांत्रिक विधी, परवा अंधश्रद्धा...चर्चांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. पोलिसांनी तोंड उघडलं तरच या मोक्ष-कथेला पूर्णविराम मिळेल; तोवर कुजबूज सुरूच! ∙∙∙

आठवणी जिवंत झाल्‍या

माजी आमदार परशुराम कोटकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी पेडणे तालुक्यात भावनिक वातावरण दिसून आले. त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी ‘ते आमच्यातून गेलेच नाहीत’ अशी भावना लोकांच्या मनात अधूनमधून उमटली; समाजमाध्यमांवर श्रद्धांजलीचा अक्षरशः पूर उसळला. कोटकर यांची नि:स्वार्थ वृत्ती, साधी राहणी आणि सर्वसामान्य माणसांशी जिव्हाळ्याचे नाते, यामुळे त्यांची खरी ओळख बनली. गरीब-श्रीमंत, लहान-थोर, तरुण-वयोवृद्ध असा कोणताही भेद न करता, प्रत्येकाच्या सुख-दुःखात त्यांचा आधार असायचा. कुटुंबातील आनंदाचा क्षण असो वा दुःखाची वेळ, ते नेहमीच उपस्थित राहायचे, धीर द्यायचे, आधार द्यायचे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केवळ राजकारण केले नाही तर माणुसकी जपली. त्यामुळे देहाने गेले असले, तरी त्यांची आठवण, मूल्ये आणि कार्य आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. ∙∙∙

कला अकादमीत रंगले रंगमंचाबाहेरचं नाट्य!

कला अकादमी ही नाटक, संगीत, नृत्य आणि कलाविष्कारांची ओळख. पण येथे एका अनोख्या प्रयोगाची भर पडली व ती म्‍हणजे घोरपड दर्शनाची. स्टेजवर कलाकार नव्हते, प्रेक्षागृहात प्रेक्षक नव्हते; मात्र अकादमीच्या बाथरूममध्ये निसर्गाचा एक थेट, लाईव्ह परफॉर्मर अवतरला...चक्क घोरपड हात धुण्याच्या साध्या कृतीत गुंतलेले काही जण क्षणातच ‘अरे देवा!’ या उत्कट एकपात्री प्रयोगात ओढले गेले. कुणी दचकून दरवाजा आतून बंद केला, तर कुणी जिवाच्या आकांताने पळ काढला. प्रसंगात तालमीचा मागमूस नव्हता, पण भावनांची तीव्रता मात्र प्रिमिअर शोसारखीच होती. काही मिश्कील रसिकांनी कुजबूज केली...कला अकादमीत एवढी रिअॅलिस्टिक परफॉर्मन्स याआधी कधीच पाहिली नव्हती! तर, काहींच्या मते, घोरपड महाशयांना ‘स्वच्छ भारत अभियान’ची माहिती मिळाली असावी आणि त्यांनी थेट प्रत्यक्ष पाहणीचा निर्णय घेतला असावा! असो, कला अकादमीने कलाविश्वाला नेहमीच नवे अनुभव दिले आहेत. यावेळी मात्र हा अनुभव कलाकारांच्‍या नव्हे तर प्रेक्षकांच्‍याच अधिक लक्षात राहणारा ठरला, एवढे नक्की. ∙∙∙

काळ्या काचा, पांढरा कायदा?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत ‘आमदारांच्याही गाड्यांच्या काळ्या काचा चालणार नाहीत’ असे सांगितले आणि अचानक वाहतूक पोलिसांनी डोळे उघडले. शिट्ट्या वाजू लागल्या, नियमांची पुस्तके जणू धुळीतून बाहेर आली. राज्यभर मोहीम सुरू. काळ्या काचा आता स्टेटसची खूण नाही, तर दंडाची पावती ठरली. कालपर्यंत ज्यांच्या गाड्या पाहून पोलिस सलाम ठोकायचे, त्या गाड्या आता थांबवल्या जात आहेत. ‘आमदारांची गाडी’ हे जादुई वाक्य निष्प्रभ ठरले. ‘कायदा सर्वांसाठी समान’ हा फलक रस्त्यावर दिसला. सामान्य नागरिकांना समाधान मिळाले. मात्र किंचित काळजीच. कारण गोव्यात नियम काचेसारखे असतात. कधी पारदर्शक, कधी काळे आणि बहुतेक वेळा सत्तेनुसार बदलणारे. प्रश्न फक्त एवढाच- ही तात्पुरती चमक आहे की खरंच नियमांचे राज्य सुरू झालंय? ∙∙∙

बर्चचे प्रकरण युक्तिवादात रंगणार

हडफडे ‘बर्च’ अग्नितांडवाला महिना उलटून गेला आहे. या प्रकरणात अनेकजण सध्या कोठडीत आहेत. आता जबाबदार असलेले तेथील माजी सरपंच व निलंबित पंचायत सचिव यांच्यात द्वंद्व पेटले आहे. त्याबाबतची वृत्तपत्रांतील वर्णने लोकांसाठी करमणुकीची ठरत आहेत. ते दोघेही म्हणजे त्यांचे वकील न्यायालयात एकमेकांवर जबाबदारी ढकलून दोषारोप करत आहेत. गेले अनेक दिवस हे ‘तू तू...मैं मैं’ चाललेले पाहून सरपंच-सचिवाच्या वकिलांची चांदीच चांदी. म्‍हणजे पैसाच पैसा. या अग्नितांडवात जे मरण पावले, ते मात्र कायमचे गेले. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; काल किती खून झाले?

लुथरा आणि लोधांचा गोवा

गोव्याचे वेगळे अस्तित्व राखून ठेवल्यामुळे गोव्याचा नक्की काय फायदा झाला, याबाबत आता कालपासून नवीन चर्वितचर्वण सुरू झाले आहे. सध्या गोव्यातील जमिनी ज्या वेगाने दिल्लीवाल्यांच्या घशात घातले जात आहे, ते पाहता गोवा खराच गोमंतकीयांचा राहिला आहे का? हा प्रश्‍‍न कुणालाही पडावा. शुक्रवारी मडगावात ‘अस्मिताय’ दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उदय भेंब्रे यांनी तीच भावना व्यक्त केली. गोवा आता गोमंतकीयांचा राहिलेला नाही. तो आता लुथरा, लोधा, गेरा अशांचा झाला आहे असे त्‍यांचे म्‍हणणे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात तथ्‍य आहे, हे अलीकडच्‍या काही घटनांवरून स्‍पष्‍ट होते. पण शेवटी आपला गोवा वाचला पाहिजे ना! ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: "मी भाजपमध्ये जाणार, ही केवळ वावडी", अफवा पसरवणाऱ्यांची तोंडं सरदेसाईंनी केली बंद VIDEO

भूतानीचे भूत पुन्हा जागे होणार?

टीसीपी खात्याच्या १७ (अ) तरतुदीचा फायदा घेऊन गोव्यात उभारण्‍यात आलेल्‍या सर्व प्रकल्पांना स्थगिती द्या, अशी मागणी आता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश फर्दिन रिबेलो यांनी लावून धरली आहे. त्‍यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. सांकवाळ येथे उभा राहणारा बहुचर्चित भूतानी प्रकल्पही असाच आडवाटेने मंजूर करून घेतलेला. याही प्रकल्पाच्या वैधतेला आपण न्‍यायालयात आव्हान देणार असल्‍याचे रिबेलो यांनी मडगाव येथील जाहीर सभेत स्पष्ट केले आहे. मध्यंतरी भूतानी प्रकल्पाचे हे भूत काही काळासाठी निद्रिस्त झाले होते. आता लवकरच ते पुन्हा जागे होणार असल्‍याचेच याचेच हे संकेत नाहीत का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com