
Sindhudurg Banda Two Bus Accident
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी (३० जून) सकाळच्या सुमारास दोन एसटी बसमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन मोठा अपघात घडला. हा अपघात बांदा-दोडामार्ग मार्गावरील पानवळ या ठिकाणी झाला. दोन्ही बसचा समोरासमोर झालेल्या धडकेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, फुकेरीहून बांद्याच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि उस्मानाबादहून पणजीकडे जाणारी दुसरी एसटी बस यांची पानवळ येथील वळणावर समोरासमोर धडक झाली.
वळणावर अचानक समोरून बस येताना दिसल्यामुळे फुकेरी बसचा चालक ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, समोरून आलेल्या बसने जोरदार धडक दिली आणि फुकेरी बस जवळपास १०० फूट फरफटत नेली.
या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले असून, फुकेरी बसमध्ये असलेले काही महाविद्यालयीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांना तत्काळ बाहेर काढत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने तातडीने मदत मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
या घटनेमुळे पानवळ परिसरात काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बस रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहने थांबून राहिली होती. अपघाताच्या ठिकाणी स्थानिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी आणि एसटी प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.
सध्या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून, काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती आहे. हा अपघात नेमका कसा घडला? त्यास जबाबदार कोण? याचा तपास पोलीस आणि एसटी प्रशासन करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.