
पणजी: गोव्यात बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळ बदलाचा मुहूर्त या आठवड्यात पक्षश्रेष्ठींना मिळू शकतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेसुद्धा त्याबाबत अस्वस्थ बनले असून त्यांना ‘तापदायक’ ठरलेल्या फोंडा तालुक्यातील एका मंत्र्याला त्यांनी स्वत:पुरते तरी ‘बाजूला’ केले आहे!
विश्वसनीय सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष गोव्यातून गेल्यानंतर दिल्लीत मंत्रिमंडळ बदलाची सारी सिद्धता झाली आहे. गोव्यातून स्वतंत्र राजकीय अहवालही पाठविण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी हा बदल अजून राहिला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच या बदलास हिरवा कंदील दाखवला आहे. बदल अडण्यास अहमदाबादेतील विमान अपघातही कारणीभूत ठरला. पंतप्रधान, गृहमंत्री दोघांनाही गुजरातला भेट द्यावी लागली.
पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, मुख्यमंत्रीही आता तत्काळ बदलासाठी उत्सुक असून अजून दिल्लीतून निर्णय येत नसल्याने राज्यात राजकीय व्यवस्थाही खुंटली आहे!
सूत्रांच्या मते, ज्या तीन मंत्र्यांवर वगळले जाण्याची टांगती तलवार आहे, त्यात गोविंद गावडे आघाडीवर आहेत. त्यानंतर नीळकंठ हळर्णकर आणि दिल्लीतील इस्पितळात उपचार घेणारे आलेक्स सिक्वेरा यांची नावे आहेत. सिक्वेरांवर गेल्याच आठवड्यात मूत्रपिंड बदलाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्याच मुलीने त्यांना मूत्रपिंड दान केले.
गोविंद गावडे यांच्यावर केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर संपूर्ण भाजप संघटनाच रूष्ट आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केल्यास आता तीन आठवडे लोटले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदिवासी कल्याण खात्यात गैरव्यवहार चालू असल्याचे विधान २३ मे रोजी केले होते. त्यानंतर गावडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सारवासारव केली; परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना माफ केलेले नाही, अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘गोमन्तक’ला दिली.
सूत्रांनी सांगितले, की विश्वास उडाल्याने काही वादग्रस्त मंत्री मुख्यमंत्र्यांसाठी अडचण ठरले आहेत. ‘‘मुख्यमंत्री आता एका मंत्र्याला तर मुळीच किंमत देत नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालविला; परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना दाद दिलेली नाही.’’
या मंत्र्यांच्या खात्यात काही जागा भरायच्या होत्या, त्याही मुख्यमंत्र्यांनी थोपवून धरल्या आहेत. त्या जागांसंदर्भात मंत्र्यांच्या सूचनेतून ‘कॉल लेटर्स’ पाठवण्यात आली होती. अन्न प्रशासनात रिक्त असलेल्या या जागांसाठी हजारो तरुणांनी अर्ज पाठविले होते; परंतु ही प्रक्रिया सरकारने थोपवून धरली आहे.
वास्तविक या मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च कारवाई करून त्यांना हटविण्याचा आग्रह पक्ष संघटनेने धरला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींच्या मान्यतेची वाट पाहिली व ते अवघड दुखणे होऊन बसले. खात्यांतर्गत कारवाई केल्यानंतर ती पक्षश्रेष्ठींनाही पसंत पडल्याचे दिसते आहे.
या घडामोडींमुळे मंत्रीही अस्वस्थ बनला असून आपल्या मतदारसंघात त्याने बैठकांचे सत्र आरंभले आहे. आपली पुढची कृती निश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांनाही जमविले जात आहे. ‘‘यापूर्वी मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले नीलेश काब्राल गप्प राहिले. अशा पद्धतीने त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला नाही.’’ अशी प्रतिक्रिया पक्ष संघटनेतून व्यक्त झाली.
या राजकीय प्रतिक्रियांमुळे गोव्यातील भाजप नेतृत्वाला मंत्रिमंडळ बदलाचा प्रश्न तातडीने धसास लावावासा वाटतो. त्यात विश्वजीत राणे यांच्या आक्रमक भूमिकेचा प्रश्न उपस्थित झाला; परंतु राणे पक्षासाठी ‘किंमती ठेवा’ असल्याने त्यांच्या कोणत्याही खात्याला हात लावण्याचा प्रश्न उदभवत नाही. पक्षश्रेष्ठींचे त्यांना संपूर्ण अभय आहे.
मंत्रिमंडळात प्रवेश करण्यासाठी सध्या दिगंबर कामत, रमेश तवडकर, संकल्प आमोणकर, नीलेश काब्राल आणि मायकल लोबो हे उत्सुक आहेत. काब्राल यांची वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे.
सूत्रांच्या मते, मंत्रिमंडळ बदलाबाबत मुख्यमंत्र्यांचीही पसंती जरूर विचारात घेण्यात येईल. काहींबाबत त्यांनी यापूर्वीच आपले मत दिले आहे. दिगंबर कामत यांना या बदलात स्थान मिळू शकते; परंतु त्यांचे स्थान पक्षश्रेष्ठींवर अवलंबून आहे.
सूत्रांच्या मते, लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात कामत यांनी उमेदवारी स्वीकारावी म्हणून पक्षश्रेष्ठी आग्रही होते. कारण सहज विजयी होतील व त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान देण्याची पक्षश्रेष्ठींची तयारी होती; परंतु कामत यांनी ही ऑफर नाकारली.
त्यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज बनले. ‘‘पक्षश्रेष्ठींना आपली सूचना नाकारलेली आवडत नाही’’ असे पक्षाचा एक जबाबदार नेता म्हणाला. त्यामुळे २०२२ साली भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कामत यांचे स्थान पक्षश्रेष्ठींच्या मर्जीवर अवलंबून आहे. कामत भाजपमध्ये आल्यास आता लवकरच तीन वर्षेे पूर्ण होतील. त्यांना अद्याप कोणतेही पद देण्यात आलेले नसून ते खूपच अस्वस्थ आहेत.
दिल्लीतून संकेत मिळतात, त्यानुसार या आठवड्यात मंत्रिमंडळातील बदल अपेक्षित आहे. बदल खात्रीपूर्वक होणार आहे, त्यात कोणताही बदल नाही. केवळ पंतप्रधानांना सवड मिळणे बाकी आहे, असे या जबाबदार सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.