

पणजी: प्रत्येक बूथवर ५० टक्के मतांचा संकल्प करून थेट कामाला लागा आणि २०२७ मध्ये गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करा, असे आवाहन भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी शनिवारी केले.
ताळगाव येथील कम्युनिटी सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, रमेश तवडकर, दिगंबर कामत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, विनय तेंडुलकर, ॲड. नरेंद्र सावईकर, विविध मतदारसंघांमधील आमदार आणि मान्यवर उपस्थित होते.
नवीन म्हणाले, की २०१२ मध्ये गोव्यात भाजप सत्तेवर आला. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत आले. देशभराच्या तुलनेत गोमंतकीयांची मते शुभ मानली जातात. प्रत्येक बूथवर ५० टक्के मिळवण्याचे ध्येय ठेवून आतापासूनच कामाला लागा, डबल इंजिन सरकारला आणखी गती द्या, अशा सूचना नवीन यांनी बूथ अध्यक्षांना केल्या.
१.भाजप संघटना ही बूथ अध्यक्षांच्या जोरावर उभी आहे. बूथ अध्यक्ष हीच भाजपची खरी ताकद आहे.
२.त्यामुळे पक्ष बळकट करण्यासाठी बूथ अध्यक्षांनी चोवीस तास कार्यरत राहणे आवश्यक आहे.
३. भाजपमध्ये कामाला महत्त्व देण्यात येते. त्यानुसारच पदे देण्यात येतात.
४. त्यामुळेच बूथ अध्यक्ष पदावरील व्यक्ती पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतात.
५.गोव्यासह केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे.
६. केंद्राच्या सहकार्यामुळे गोव्यात दोन विमानतळ तयार झाले. पायाभूत साधनसुविधांत नेहमीच वाढ होते.
७.केंद्र व राज्याने घडवून आणलेला विकास जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बूथ अध्यक्षांनी झटावे.
राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक होताच दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आलेल्या नितीन नवीन यांचे विविध भागांमधील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत केले. म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा भाजप कार्यालयाला शनिवारी सकाळी त्यांनी भेट दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. नवीन यांनीही स्वतः ढोल वाजवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
आगामी पालिका, पणजी मनपा आणि विधानसभा निवडणुकीतही भाजपच जिंकेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. नितीन हे भाजपचे नवे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधील उत्साह आणखी वाढला आहे. त्याचा मोठा फायदा आगामी काळातील सर्वच निवडणुकांत भाजपला मिळेल. २०१२ पासून गोव्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने विकास घडवून आणला आहे. त्यामुळे जनता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपलाच सत्तेवर आणेल, असा दावाही त्यांनी केला.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडून गोव्याचा विकास सुरू आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २७ जागा मिळवून देण्याचे ध्येय असल्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले. नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी गेल्या दोन दिवसांत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जे मार्गदर्शन केले, त्यानुसारच त्यांनी वाटचाल करावी आणि भाजपला सलग चौथ्यांदा सत्तेत आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.