

पणजी: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उद्या शुक्रवारी (ता. ३०) प्रथमच गोव्याचा दौरा करत आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे एक वर्ष शिल्लक असताना होत असलेला हा दौरा भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. येत्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘रणनीती ठरविणारा दौरा’ म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
नितीन नवीन हे उद्या सकाळी ११ वाजता मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन करतील. त्यानंतर ते थेट भाजपच्या राज्य कार्यालयात दाखल होणार आहेत. तेथे दिवसभर गाभा समिती, प्रमुख पदाधिकारी, मंत्री आणि आमदारांसोबत स्वतंत्र बैठका घेऊन संघटनात्मक तसेच राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतील. सायंकाळी ते उत्तर आणि दक्षिण गोव्यातील भाजप कार्यालयांना भेट देत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
शनिवारी ३१ रोजी सकाळी १० वाजता ताळगाव येथील समाज केंद्रात आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला नितीन नवीन संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा नितीन नवीन यांच्याशी जुना कार्यसंबंध आहे.
भाजप युवा मोर्चामध्ये कार्यरत असताना या तिघांनी एकत्र काम केले असून, त्यामुळे निर्णय प्रक्रियेत आवश्यक असलेली सुसूत्रता आणि समन्वय आधीपासूनच अस्तित्वात असल्याचे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर, आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचे राजकीय आणि संघटनात्मक निर्णय या दौऱ्यात निश्चित होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपविरोधी पक्ष एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील असतानाच नितीन नवीन यांचा हा दौरा होत असल्याने त्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. येत्या काळात पणजी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर राज्यातील इतर नगरपालिकांच्या निवडणुका होतील. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे.
या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांचा हा पहिलाच गोवा दौरा असल्याने भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे. या दौऱ्यातून भाजपची आगामी राजकीय दिशा आणि निवडणूक रणनीती स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत.
शुक्रवारी सकाळी ११ वा. मोपा विमानतळावर आगमन
राज्य भाजप कार्यालयात गाभा समिती, मंत्री, आमदारांसोबत बैठका
उत्तर व दक्षिण गोवा भाजप कार्यालयांना भेट
शनिवारी ताळगाव येथे कार्यकर्ता मेळावा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.