खरी कुजबूज: 'कॉक्रोच' गोव्‍याच्‍या दिशेने!

Khari Kujbuj Political Satire: भारताचे सरन्‍यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुण बेरोजगारांना हिणावले, त्‍यांना ‘कॉक्रोच’ची उपाधी दिली.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

रितेशची ‘डिप्लोमसी’

माजी मुख्यमंत्री दिवंगत रवी नाईक यांची खासियत म्हणजे त्यांची ‘डिप्लोमसी’. ते पत्रकारांशी तसे मोघमच बोलायचे. कधी कधी तर पत्रकारांनाच गुगली टाकायचे. परवा त्यांचा पुत्र रितेश यांनी हाच फॉर्मुला वापरला. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ‘आपण फोंड्यात भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलो तरी शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल’ असे सांगितले. हा म्हणजे ताकाला जाऊन गाडगे लपविण्याचा प्रकार. सध्या त्यांनी आगामी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्‍यातून त्यांचा इरादा स्पष्टपणे दिसून येतोय. पण शेवटी राजकारण म्हणजे पडद्यापुढे एक आणि पडद्यामागे वेगळेच असंच असते. नाही का?

‘कॉक्रोच’ गोव्‍याच्‍या दिशेने!

भारताचे सरन्‍यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुण बेरोजगारांना हिणावले, त्‍यांना ‘कॉक्रोच’ची उपाधी दिली. त्‍यानंतर महाराष्‍ट्रातील अभिजीत दीपके नावाच्‍या तरुणाने अमेरिकेत बसून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नामक एक पक्ष सोशल मीडियावर स्‍थापन केला. अवघ्‍या काहीच दिवसांत या पक्षाचे भाजप आणि काँग्रेसपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले. त्‍यामुळे सत्ताधारी भाजप नेत्‍यांच्‍या पायाखालची वाळू सरकण्‍यास सुरुवात झाली आहे. आता हा पक्ष गोव्‍यातही येणार असल्‍याची चर्चा सुरू आहे. तसे झाल्‍यास या पक्षात तरुणांचा अधिक भरणा असेल हे निश्‍चित. अशा स्‍थितीत प्रदेश भाजपचे नेते नेमकी कशी आणि कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'आप'ला लक्ष्य करण्यासाठीच 'ईडी'चे छापे, भाजपाकडून पक्षाच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न; वाल्मिकी नाईक यांची टीका

एल्टनने केपेत पाडला ‘उजेड’

मनात जिद्द आणि जबर इच्छाशक्ती असेल तर कोणतेही दिव्य साकार होऊ शकते. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विरोधी पक्षात असूनही आपल्या मतदारसंघात अनेक विकासकामांना चालना दिलीय, हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. त्‍यांनी केपे पालिका क्षेत्रात बारा हायमास्ट दिवे बसवून संपूर्ण नगरात झगमगाट केला आहे. अनेक वर्षांपासून केपेनगरात उजेड नव्हता, तो उजेड साडेचार वर्षांनी का होईना, पडला आहे. केपे शहर चकाचक करण्यात एल्टनला यश आले आहे. एक मात्र खरे, सत्ताधारी पक्षात उपमुख्यमंत्री असूनही बाबूंना जे शक्य झाले नाही ते एल्टनने करून दाखविले, असे त्‍यांचे समर्थक बोलत आहेत.

मराठ्यांनी उभारली दोन भव्य संकुले

‘केल्याने होते आहे रे आधी केलेची पाहिजे’ असे एक बोधवाक्य आहे. कोणत्याही जातीय व समाज संघटनेत जर एकी असेल व काही अनोखे करण्याची जिद्द असेल तर कोणतेही दिव्य साकार होणे शक्य आहे, हे राज्यातील मराठा समाजाने सिद्ध करून दाखविले आहे. राज्यात जरी मराठा समाजाचे राजकीय वजन असले जरी समाजाचे मुख्यमंत्री व दोन मंत्री व एकूण सहा आमदार असले तरी कोणाचीही मदत न घेता मराठा समाजाने पर्वरीत दोन भव्य अशी संकुले उभारून आपली शक्ती व एकीचे दर्शन घडवले आहे. केवळ सहा महिन्यांत मराठा.समाजाच्या दोन भव्य अशा संकुलाचे लोकार्पण होणे, ते ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा केवळ योगायोग नसून समाजाच्या उच्चशक्तीचे ज्वलंत उदाहरण आहे. अखिल मराठा समाज संघटनेच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर संकुलाचे गेल्या डिसेंबरमध्ये लोकार्पण झाले होते. १९ मे रोजी मराठा शिक्षण व संस्कृती मंडळ मराठा भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ही संकुले मराठ्यांचे नवे व्यासपीठ व आयडेंटीटी बनली आहे, हे मात्र सत्य आहे. खरेच मराठा समाजाच्या या एकीचे उदाहरण इतरांनी घ्यायला नको का?

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्या'! LOP युरींचे प्रतिपादन; काँग्रेस आमदारांतर्फे राज्यपालांना निवेदन

‘कॉक्रोच’ क्रांती करणार?

कॉक्रोच जनता पार्टी हे संघटन ऑनलाईन. उपहासात्मक, उपरोधी स्तरावर त्याचा जन्म झाला आहे. पण तरुणाईने जगभर दिलेला पाठिंबा पाहता युवा शक्ती क्रांती करू शकते हे राजकीय पक्षांना कळून चुकले. ही पिढी हुशार आहे, ती डिजिटल तंत्रज्ञान कोळून पित आहे आणि त्यांचा एकोपा क्षणार्धात किती महाकाय संख्येने होऊ शकतो त्याचा प्रत्यय आला. इन्स्टा हॅक झालाय. कुणालाही काही संबोधताना वा उपमा देताना सारासार विचार करायला हवा, हा संदेश या घटनेतून गेला. राजकीय पक्षांना दक्ष राहण्याचा इशारा गेला. कुणीही कुणाला गृहीत धरू नये हा विचार गेला. आणखीन ऑनलाईन संघटन झालं तर तरुण मतदार काय करू शकतात याचा एक धास्तीचा ठाव या घटनेतून सर्वांपर्यंत गेला हेही नसे थोडके.

प्रतिमा मॅडमची राजकीय धडपड

प्रतिमा कुतिन्हो या दिवसांत नावेलीत भलत्याच सक्रिय झालेल्या दिसतात. वीज ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न हाती घेऊन शुक्रवारी त्या आके येथील वीज कार्यालयावर धडकल्या.यापूर्वी त्यांनी याच कार्यालयात वाढीव वीजबिलांसंबंधी मोर्चा आणला होता. आता पुढे काही दिवसांनी त्या ‘स्मार्ट मीटर’चा विषय घेऊन पुन्हा मोर्चा आणतील हेही नक्की. नावेलीत काही खुट्ट झाले की मॅडम आवाज उठवतात. सामाजिक कार्यकर्त्या असे त्या सध्या लेबल लावत असल्या तरी त्यांचा खरा पिंड राजकारणी आहे हे कधीच लपून राहिलेले नाही. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्यांची मनीषा आहे. मागच्या वेळी नावेलीतून त्या ‘आप’च्या उमेदवार होत्या. नंतर यथावकाश त्यांनी त्‍या पक्षाला सोडचिठ्ठी दिली.आता प्रतिमाबाय कुठल्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे. त्या स्वत: याबाबत ताकास तूर लावू देत नाहीत. तूर्त वेट अ‍ॅण्ड वॉच.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

मनोज, वीरेशचे ‘फॅन्‍स’ झाले जागे

रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे (आरजीपी) प्रमुख आधारस्‍तंभ असलेले मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्‍यातील वाद शिगेला पोहोचल्‍यानंतर परब यांनी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदासह संस्‍थापक सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला. तसेच राजकारणातून संन्‍यास घेत असल्‍याची घोषणाही केली. परब यांनी पक्षाला रामराम ठोकून तीन दिवस उलटले, तरी आमदार बोरकर यांनी मात्र अजूनही

कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच आपापल्‍या नेत्‍यांबाबत त्‍यांच्‍या ‘फॅन्‍स’नी फेसबुकवरून स्‍तुतिसुमने उधळण्‍यास सुरुवात केली आहे. परब यांच्‍या ‘फॅन्‍स’कडून परब यांनी राजकीय संन्‍यास घेऊ नये, अशी मागणी होत आहे. तर, बोरकर यांचे ‘फॅन्‍स’ त्‍यांनी आमदार म्‍हणून केलेल्‍या कामांची आठवण पुन्‍हा एकदा जनतेला करून देत आहेत. सद्य:स्‍थितीत आरजीपीचे भवितव्‍य काय असेल, हे कुणालाही सांगता येत नाही. पण, पक्ष बंद पडण्‍याची चिंता असल्‍यामुळेच या दोन्‍ही नेत्‍यांचे ‘फॅन्‍स’ सोशल मीडियावर सक्रिय झाल्‍याची चर्चा सुरू आहे.

आता जनतेला ‘वाली’ कोण?

गोव्यात अनेक नगरपालिकांचा कार्यकाळ संपत आला तरी निवडणुकांचा पत्ता नाही. आता प्रशासक नेमले जाणार असल्याने नागरिकांची अवस्था ‘तक्रार कुणाकडे करायची?’ अशी झाली आहे. पावसाळा तोंडावर आहे. नालेसफाई, कचरा आणि झाडांच्या धोक्याची कामे पूर्ण झाली की नाहीत, हे फक्त देवच जाणे! नगरसेवकांचे अधिकार संपल्यावर ते फोन उचलतील की नाही, याचीही शाश्वती नाही. काही जण पुढच्या निवडणुकीसाठी हजर राहतील, तर काही ‘माझा कार्यकाळ संपला’ म्हणत गायब होतील. प्रशासकांकडे फाईली जातील, फिरतील, पण नागरिक मात्र पावसात भिजतच राहतील. लोकशाहीत नागरिक राजा म्हणतात, पण इथे राजालाच आपल्या शहराचा दरवाजा कुठे आहे ते शोधावे लागतेय!

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

तो आमदार कोण?

गोव्यातील एका आमदाराला सहीदेखील करता येत नव्हती, असा गौप्यस्फोट गोव्‍याचे माजी सभापती तथा केरळ आणि तामिळनाडूचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात आता चर्चेला ऊत आला आहे. लोकशाहीत जनतेच्या प्रश्नांवर सही करणारे प्रतिनिधी अपेक्षित असतात; पण इथे तर काहींना स्वतःची सहीच जमत नव्हती, हे ऐकून मतदारांना डोक्याला हात लावायची वेळ आली आहे. गोव्यात निवडणुकांवेळी उमेदवारांच्या प्रचारात दूरदृष्टी, नेतृत्व, विकास अशा मोठमोठ्या घोषणा झळकतात; पण पडद्यामागे स्थिती अशी होती की, काहींना बहुतेक सही कुठे करायची हेच आधी समजावून सांगावे लागत असे. आता राजकीय वर्तुळात चर्चा एकाच गोष्टीची, तो आमदार नेमका कोण? कारण गोव्यात विकासकामांपेक्षा गूढकथा जास्त वेगाने पुढे जातात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे!

अधिकाऱ्यांकडूनच इंधनाची नासाडी

सध्या आखाती युद्धामुळे तेलाच्या किमती भडकून रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना प्रवासावर निर्बंध आणण्याचे आवाहन केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही सरकारी अधिकाऱ्यांनी शासकीय वाहन न वापरता सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा आधार घ्यावा असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर वन खात्यात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्‍यांच्‍याकडून इंधनाची होणारी नासाडी याकडे लक्ष वेधले जात आहे. वन खात्याच्या वन्य जीव संवर्धन विभागत हे अधिकारी काम करतात. त्यात दक्षिण गोव्याचा ताबा एका महिला अधिकाऱ्याकडे असून ही महिला पणजीत वास्तव्य करून आहे. दुसऱ्या बाजूने उत्तर गोव्यात नियुक्त केलेला आणखी एक अधिकारी दक्षिण गोव्यात राहतो. त्यामुळे त्यांच्या वाहतूक इंधनाचा खर्च विनाकारण वाढतो. आता या अधिकाऱ्यांना ‘तुम्ही बसमधून प्रवास करा’ असे सांगण्यात येणार का? की, पणजीत राहणाऱ्या त्या अधिकारी महिलेची बदली पणजी कार्यालयात आणि दक्षिण गोव्यात राहणाऱ्या त्या अधिकाऱ्याची बदली तेथील कार्यालयात करणार का?

Khari Kujbuj Political Satire
Tivim Political News: हळर्णकर-कांदोळकर आमनेसामने ; थिवीत आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले

नेता होण्‍यासाठी ‘ट्रेनिंग’ हवेच

आजकाल राजकारण म्हणजे अभ्यास, शिस्त आणि तत्त्वांपेक्षा आरोप, पक्षांतर आणि सोशल मीडियावरील घोषणांचा खेळ बनला आहे. डॉक्टर, वकील, शिक्षक होण्यासाठी शिक्षण लागते; पण लाखो लोकांचे भविष्य ठरवणारा नेता होण्यासाठी कोणतीही पात्रता लागत नाही, हेच मोठे विडंबन आहे. राज्‍यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी राजकारण्यांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत मांडले, ते चुकीचे नाही. आज शिक्षणाचा गंध नसलेले शिक्षणमंत्री आणि तंत्रज्ञान समजत नसलेले विज्ञानमंत्री दिसतात. त्यामुळे प्रशासनाचा दर्जा खालावत असल्याची चर्चा सामान्य लोकही करताना दिसतात. लोकशाहीत सर्वांना संधी असावी, पण किमान अभ्यास आणि घटनात्मक ज्ञान तरी आवश्यक असावे. नाहीतर उद्या विमान चालवायलाही ‘जनतेचा आशीर्वाद’ पुरेल अशी वेळ येईल.

कोकणी म्हणींच्या पुस्तकांना ‘अच्‍छे दिन’

अडगळीत पडलेल्या कुठल्या मालाला कधी मागणी, बरकत येईल सांगता येत नाही. कोकणी पुस्तकांचे ढीग येतात, ते ठेवायला खास गोदाम लागते. व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, कोश ही पुस्तके संदर्भ ग्रंथ असतात. ती कुणी वाचायला नेत नाही. जीपीएससी, कर्मचारी निवड आयोगातर्फे विविध पदांसाठी भरती होते. लेखी परीक्षेत एक भाग कोकणी व म्हणी, तत्सम चाचणीचा सक्तीचा असतो. त्यामुळे इंजिनिअर असो की चित्रकार असो, त्याला या कोकणी पुस्तकांचा आधार घ्यावाच लागतो. हे उमेदवार पुस्तक खरेदीकडे वळतात. ‘वरणात आयता गूळ’ अशी एक कोकणी म्हण आहे. तसेच सध्‍या या जीर्ण पुस्तकांचे झाले आहे. ‘कोणालोय कोंबो रडूं, पूण उजवाडूं’ अशी एक कोकणी म्हण आहे. त्या म्हणीला अनुसरून, कुणीही निमित्त ठरो, परंतु कोकणी पुस्तके खपत आहेत, हेही नसे थोडके.

Khari Kujbuj Political Satire
Goa Political Election: गोव्यात भाजप 30 पेक्षा अधिक जागा जिंकेल! केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक योजनांचा घेतला आढावा

व्यावसायिक नाटकांची दशा

हल्लीच गोव्यात एक व्यावसायिक नाटक येऊन गेलं. एका विदेशी लेखकाच्या कृतीवर ते आधारीत होतं. रूपांतरण विस्कळीत होतं. त्यामुळे चारही टीव्ही कलाकार नाटकाला उभारी देऊ शकले नाहीत. दुसरी गोष्ट, टीव्ही कलाकारांना नाट्याभिनय तितकासा जमत नाही. कॅमेऱ्यापुरते बोलायची त्यांना सवय. इथं कायम बेअरिंगमधले राहावं लागतं. संहितेत दोष होते. विस्कळीतपणा होता. मुळात विदेशी सस्पेन्स थ्रिलर इथल्या मातीत रूजू, रूळू, रूचू शकत नाही. विदेशी संहितांचे हे नाट्यकर्मींचे व्यसन कधी सुटणार का? दुसरा अंक सुरू झाल्यावर 10 मिनिटं रेंगाळण्याचे कंटाळ्याचे हेलकावे सुरू झाले. खूप ठिकाणी ते रेटत, खेचत होतंच. कथेत दम नव्हता. एक पात्र तर ऐतिहासिक नाटकातील पात्रासारखं विनाकारण शब्दांना जोरदार धक्के देऊन बोलत होतं. शब्दही कळत नव्हते. भव्य नेपथ्याच्या डोलाऱ्याला कुणी भुलत नाही. दोन तास वाया गेले याचं शल्य बोचतं असं लोक बोलत होते. हल्ली दर्जेदार नाटक मिळणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखी झाली आहे.

केपे पोलिस स्थानकाचे काम बंद का पडले?

जनतेच्या संयमाची परीक्षा राजकारण्यांनी घेऊ नये. अशा राजकारण्यांना योग्य धडा शिकविण्यात जनता मागे राहत नाही याचा अनुभव अनेक मोठ-मोठ्या राजकारण्यांनी घेतला आहे. केपे पोलिस स्थानकाच्या इमारतीचे काम गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. तत्कालीन आमदार बाबू कवळेकर यांच्या कार्यकाळात सुरू झालेले हे काम सध्‍या बंद पडले आहे. बाबूंच्‍या हस्तक्षेपामुळे हे काम बंद पडल्‍याचा आरोप एल्टन समर्थक करतात.या इमारतीची फाईल म्हणे गेल्या सहा महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात धूळ खात पडली आहे. सध्‍या केपे पोलिस स्थानक एका जुन्या इमारतीत चालत आहे. मुख्यमंत्री साहेब, या पोलिस स्थानकाच्या इमारतीचे काम का बंद पडले आहे? असा प्रश्न आमदार एल्टन व केपेचे मतदार विचारत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com