
पणजी: वर्षाचा शेवटच्या दिवसाची आज एक सुंदर सुरुवात झाली. दोना पावला किनाऱ्यावर रंगांची वेगवेगळी छटा पाहायला मिळाली. आजचा सूर्य काहीसा वेगळा होता. या वर्षाने कितीही प्रश्न निर्माण केले असतील किंवा संकटं उभी केली असतील मात्र शेवट हा कायम गोड झालाच पाहिजे असं कदाचित सूर्य सांगत होता. गोव्यात सध्या पर्यटकांची बरीच गर्दी उठली असली तरीही आजचा सूर्योदय मात्र सगळीकडे शांतता आणि सकारात्मकता पसरवणारा ठरला.
भल्यामोठ्या समुद्रावर गुलाबी आणि जांभळ्या रंगाची सुंदर छटा पसरली होती आणि मधूनच सूर्य उदयास येत होता. समुद्राचं सौंदर्य उजळून निघालं होतं. आज २०२४ वर्षाचा शेवटचा दिवस, गोव्याने या वर्षभरात अनेक चढउतार पहिले. सामान्य लोकांना लुबाडण्याचा प्रकार असो किंवा चोरीमारी आपण कायम यावर मात केली. गोव्यात यंदाच्या वर्षी म्हणावे तसे पर्यटक आलेले नाहीत या विषयावरून सुद्धा अनेक मतं निर्माण झाली होती. सनबर्नसारख्या संगीत महोत्सवामुळे स्थानिक नाराज होते तर पर्यटकांमुळे आमची प्रायव्हसी नाहीशी होतेय म्हणून लोकं चिडली होती. देव नेमका कोणाचा यावरून सुद्धा बरीच तूतूमेंमें झाली खरी मात्र आज वर्ष संपतंय...
आणि वर्ष संपताना आपण हे वर्ष कसं आनंदाने जगलो यावर लक्ष दिलेलं कधीही चांगलं. आपल्याकडे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला, सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या तब्बल दहा वर्षानंतर होणाऱ्या अवशेष प्रदर्शनला आपण यशस्वी करून दाखवतोय. सेरेंडिपिटी किंवा आणखीन मनोरंजनपर महोत्सव असोत आपण नेहमीच सगळ्यांचं मनापासून स्वागत केलं आणि आदरातिथ्य दाखवलं.
रस्त्यांची समस्य असली तरीही वेळोवेळी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. दिवाळी, दसरा, ईद, नाताळ सगळे सण आनंदाने साजरे केले. आज वर्ष संपतंय तेव्हा संपणाऱ्या या वर्षाला आनंदाने निरोप देऊया. गोवा हा नेहमीच सगळ्यांसाठी प्रिय होता आणि तो कायम राहील यात शंका नाही मात्र येणाऱ्या वर्षात आपल्या गोव्याला आणखीन समृद्ध कसं करता येईल याचा विचार आजपासून नक्कीच सुरु करूयात..
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.