Manish Jadhav
नवीन वर्ष नेहमीच नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येते. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या सवयी सुधारण्यासाठी आणि तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी नवीन संकल्प करता.
भूतकाळातील चुकांमधून शिकून नवीन वर्षात यश संपादन करण्यासाठी आपण स्वतःसाठी नवे संकल्प केले पाहिजेत.
या वर्षाच्या संकल्पाचा एक भाग म्हणून, स्वतःला वचन द्या की, तुम्ही दिवसातील काही तास तुमच्या स्मार्टफोनपासून दूर राहाल. दिवसभरातील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण केल्यानंतर पुस्तकांना आणि आपल्या छंदासाठी थोडा वेळ द्या. फोनच्या अतिवापरामुळे मानसिक थकवा आणि अनेक आजार होऊ शकतात.
नव वर्षात अनावश्यक खर्च टाळा आणि आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशोब ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला बचत करण्याची सवय नसेल, तर या नवीन वर्षात याला प्राधान्य द्या आणि दर महिन्याला तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बचतीसाठी बाजूला ठेवा.
घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा तुमचा दिनक्रम बदलून या वर्षी नवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्याचा नियम बनवा. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केल्याने तुमचा मूड तर चांगला राहतोच शिवाय नवीन संस्कृती आणि परंपरांची माहितीही मिळते.
नवीन वर्षात नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. तसेच, प्रत्येक परिस्थिती किंवा कल्पनेचा सकारात्मक पैलू पाहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
आजच्या धकाधकीच्या काळात आपल्याला कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे दुरावा येऊ लागतो. अशा परिस्थितीत या वर्षी करिअरसोबत कुटुंबालाही वेळ देण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने केवळ तुमचे कुटुंब आणि मित्रच नव्हे तर तुम्ही स्वतःही आनंदी व्हाल. लक्षात ठेवा की, आनंदी मनच यशाचा पाया रचू शकते.
तुमच्या दिवसाची सुरुवात योग आणि ध्यानाने करण्याचा संकल्प करा. सकाळी लवकर योग आणि ध्यान केल्याने शरीर दिवसभर उत्साही राहते आणि मानसिक आरोग्यही चांगले राहते. यामुळे व्यक्तीला कोणतेही काम करताना आळस येत नाही.