Goa Politics: खरी कुजबुज; पोलिस यंत्रणा दबावाखाली

Khari Kujbuj Political Satire: फोंड्याच्या रवी पात्रांवाच्या राजकीय वारशाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्याचे ज्येष्ठ पुत्र रितेश यांच्या नावाला म. गो.ने एकतर्फी पाठिंबा जाहीर करून सत्ताधारी भाजपची कोंडी केली आहे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

पोलिस यंत्रणा दबावाखाली!

दिवाळी निमित्ताने राज्यात सर्वत्र चालणाऱ्या नरकासूर प्रतिमास्पर्धांमुळे व त्यावेळी रात्रभर जो गोंधळ घातला जातो, त्यामुळे यंदा म्हणे पोलिस यंत्रणा बरीच दडपणाखाली आली आहे. तशातच यंदा सरकारने रात्री बारानंतर सर्व प्रकारचा गोंगाट व कर्कश संगीत बंद ठेवण्याचा जो आदेश जारी केला आहे, त्याची अंमलबजावणी कशी करायची? अशी विचारणा दुय्यम दर्जाचे पोलिस अधिकारी आपसात करताना दिसतात. गतवर्षी या दिवशी सर्वत्र जो आक्षेपार्ह प्रकार घडला होता, त्या नंतर त्याचे सगळे खापर पोलिसांवरच फोडले गेले होते. पोलिस म्हणतात, की अशा स्पर्धाचे पुरस्कर्ते वा आयोजक राजकारणीच असतात. त्यामुळे त्यांच्या वाटेला जाता येत नाही. काही ठिकाणी तर व्यासपीठावरच पोलिस व सरकारी अधिकारी असतात, मग तेथे आपण काय प्रतिबंध करणार? असे ते म्हणतात. एक खरे की अशा प्रकरणात पोलिसांची स्थिती अडकित्यांतील सुपारी सारखी होते.∙∙∙

रवी पात्रांवाचा वारसा!

फोंड्याच्या रवी पात्रांवाच्या राजकीय वारशाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्याचे ज्येष्ठ पुत्र रितेश यांच्या नावाला म. गो.ने एकतर्फी पाठिंबा जाहीर करून सत्ताधारी भाजपची कोंडी केली आहे. पण मुद्दा तो नाही, गोव्यात मंत्री -आमदार यांच्या मुलांनाच त्यांच्या नंतर उमेदवारी देण्याची अशी पध्दत सुरू झाली तर नवोदितांना संधी कशी मिळणार? असा मुद्दा आता विविध स्तरांतून उपस्थित होऊ लागला आहे. सध्याच्या विधानसभेत यापूर्वीच तीन जोडप्यांनी मिळून सहा जागा अडविल्या आहेत. तशांतच सध्याच्या राजकारण्यांचे पुत्रही आखाड्यात उतरण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. असेच प्रयत्न जर प्रत्येक राजकारण्याने चालविले तर ही मंडळी सोडून अन्य कोणांना निवडणुकीत उतरण्याची संधीच मिळणार नाही. आजवर काँग्रेसने हेच केले, तोच कित्ता भाजपही गिरविणार का? हा मुद्दा रवीपात्रांवाच्या राजकीय वारसावरून उपस्थित झाला आहे खरा. ∙∙∙

वीरेशच्या नेतृत्वाची परीक्षा

आमदार विरेश बोरकर यांनी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ पक्षाच्या वतीने सरकारला थेट २४ तारखेच्या जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. हा इशारा साधासुधा नाही, तर थेट आव्हान आहे! आरजी पक्षाने आता आपला ‘एकला चलो रे’चा बाणा सोडला असला तरी तेच या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. पण, त्याच वेळी ‘गोव्यातील सगळ्यांना’ एकत्र घेऊन येण्याचा त्यांचा दावा आहे. म्हणजे, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून, हे आंदोलन ‘जनआंदोलन’ म्हणून उभे करण्याची त्यांची योजना आहे. या इशाऱ्यात बोरकर यांनी तर सरकारला हेही सुनावले आहे की, हे आंदोलन इतके विराट असेल की पोलीस यंत्रणेलाही ते नियंत्रणात आणता येणार नाही! आता जनता खरोखरच बोरकरांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने मैदानात उतरणार का? की हा फक्त निवडणुकीच्या तोंडावर ‘पब्लिसिटी स्टंट’ ठरणार? हे पाहावे लागेल. ∙∙∙

मायकलचे ‘डॅमेज कंट्रोल’

गेले काही दिवस आमदार मायकल लोबो अचानक ‘ऍक्शन मोड''मध्ये आले आहेत. जी बेकायदेशीर बांधकामे अनेक वर्षांपासून सुरू होती, ती स्वतःहून बंद पाडण्याचा धडाका त्यांनी लावला आहे. त्यामुळे आमदारसाहेब आता ‘राजकारणातून पूर्णपणे समाजकारणाकडे वळणार’ आहेत की काय? त्यांची ही ‘समाजकार्याची नवी इनिंग’ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. पण, या कृतीमागे आणखी एक मोठी राजकीय खेळी दडल्याची चर्चा आहे. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत, आणि ‘साहेब’ मूळ काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने अनेक जुने निष्ठावान कार्यकर्ते आणि मतदार त्यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि निवडणुकीपूर्वी ‘जनमानसात आपली प्रतिमा सुधारण्यासाठी’ म्हणून ते हे सगळे ‘धडाकेबाज’ काम करत आहेत. बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईचा हा देखावा म्हणजे केवळ ‘डॅमेज कंट्रोल’ आहे, अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; दिगंबर कामत लहान कसे?

बाबूंकडून उमेदवारीची मोर्चेबांधणी?

२०१७ च्‍या विधानसभा निवडणुकीत मगोच्‍या उमेदवारीवर पेडण्‍यातून निवडणूक जिंकल्‍यानंतर बाबू आजगावकर यांनी दीपक पावस्‍कर यांना सोबत घेत भाजपात उडी मारली आणि त्‍या सरकारात उपमुख्‍यमंत्रिपदही मिळवले. बाबू आणि दीपक या दोघांनी केलेल्‍या विश्‍‍वासघातामुळे मगोचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी तीव्र नाराजी व्‍यक्त केली होती. त्‍यानंतर २०२२ च्‍या निवडणुकीत भाजपने पेडण्‍यात प्रवीण आर्लेकरांना उमेदवारी देत, बाबूंना मडगावातून उभे केले आणि अपेक्षेनुसार बाबूंचा तेथे दिगंबर कामत यांनी पराभवही केला. तेव्‍हापासून आजपर्यंत भाजपने पेडण्‍यात नाकारलेल्‍या उमेदवारीची सल बाबूंना आजही कायम आहे. त्‍यामुळे आगामी २०२७ ची निवडणूक ते पेडण्‍यातूनच लढवणार, असे वारंवार सांगत आहेत. अशातच रविवारी पणजीत पत्रकारांशी बोलताना बाबूंनी सुदिन ढवळीकरांवर कौतुकाचा वर्षाव केला. सुदिन ढवळीकर माझे नेते. त्‍यांच्‍यामुळे मगो पक्ष आहे, असेही ते म्‍हणाले. त्‍यामुळे पुढील निवडणुकीत पेडण्‍यातून भाजपची उमेदवारी मिळणार नसल्‍याचे पक्‍के माहीत झाल्‍यामुळे बाबूंनी आता ढवळीकरांना खूश करण्‍याचे प्रयत्‍न सुरू केलेत का? असा प्रश्‍‍न अनेकांना पडला आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

...निवडणुकीवेळी काय?

फोंडा मतदारसंघात भंडारी समाजाचे प्राबल्य आहे. भंडारी समाज राज्यात सर्वात मोठा समाज असून विविध मतदारसंघात या समाजातील बहुसंख्य मतदार आहेत. फोंडा मतदारसंघात कुणीही उमेदवार निवडणुकीत उभा राहिला तरी भंडारी समाजाची मते निर्णायक होऊ शकतात, अशी येथील स्थिती आहे. त्यामुळे या समाजाचे एक बडे नेते रवी पात्रांव यांचे निधन झाल्यामुळे आता त्यांचे पुत्र रितेश नाईक यांना भाजप सरकारने निवडणुकीत तिकीट देण्याची मागणी जोर धरत आहे. वास्तविक भंडारी समाजाची दोन शकले आहेत, तरीपण रवी नाईक यांच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या शासकीय कार्यक्रमात भंडारी समाजाच्या दोन्ही नेत्यांनी रितेश किंवा रॉयला तिकीट द्यावे, अशी मागणी लावून धरली होती, त्यामुळे आता भाजप सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. आता जर पोटनिवडणुकीत रितेश किंवा रॉयला तिकीट दिली तर दीड वर्षांनंतर येणाऱ्या राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी काय? हा सवाल सध्या भाजपच्या नेत्यांना सतावत आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

साकोर्ड्यातील गैरव्यवहार...

साकोर्डा पंचायतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत या पंचायतीच्या दोन पंचसदस्यांसह एका सामाजिक कार्यकर्त्याने पत्रकार परिषद घेऊन थेट आरोप केले आहेत. या प्रकरणात सरपंचासह इतर काही पंचसदस्य आणि पंचायत सचिव गुंतल्याचा हा आरोप आहे. त्यामुळे साकोर्डा पंचायत सध्या हलली आहे. या पंचायतीचे एक पंचसदस्य आणि पत्रकार परिषद घेणारे महादेव शेटकर यांनी तर आपण ग्रामस्थांसोबत असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या ग्रामसभेला महादेव शेटकर तर व्यासपीठावर नव्हे, तर ग्रामस्थांसमवेत बसले होते. त्यामुळे आता आरोपांची सखोल चौकशी होणार की नाही, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com