
माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी ज्यावेळी गोव्यात राजभाषा आंदोलन पेटले होते. आणि चर्चिल कंपनीच्या दहशतीमुळे मडगाव मार्केट संपूर्ण आठवडाभर बंद असताना मडगावात येण्याचे धारिष्ट्य कसे दाखविले; याबद्दल सध्या मडगावात चर्चा चालू असतानाच रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहताना मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनीही या गोष्टीला उजाळा दिला होता. त्यावेळी आपण लहान होतो, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. रवी नाईक यांना त्यावेळी मडगावात आमंत्रण देणारे दुसरे तिसरे कुणी नसून त्यावेळी नुकतेच विद्यार्थी चळवळीतून बाहेर आलेले मोहनदास लोलयेकर हे होते. काल ‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘साश्टीकार’ या कार्यक्रमात बोलताना मोहनदास लोलयेकर यांनी, ज्यावेळी ही घटना घडली होती, त्यावेळी दिगंबर कामत हे काही शाळेतील विद्यार्थी नव्हते, तर ते मडगावचे नगरसेवक होते, असे सांगून त्यावेळी दिगंबर कामत नेमक्या कुठल्या अर्थाने लहान होत असा सवाल उपस्थित केला. कदाचित त्यावेळी दिगंबर कामत नगरसेवक असल्याने त्यांना आपण राजकीयदृष्ट्या लहान होतो, असे म्हणायचे तर नव्हते ना? ∙∙∙
‘लोकनायक’ ही दिवंगत रवी नाईकांच्या राजकीय जीवनावर आधारित असलेली चित्रफित परत एकदा चर्चेत आली आहे. २०११ साली रवी गृहमंत्री असताना या चित्रफितीने गोव्याच्या सर्व टीव्ही वाहिन्यांवरून अक्षरशः धुमाकूळ घातला होता. दिवसांतून दोन वेळा हे गाणे सगळ्या वाहिन्यांवरून प्रक्षेपित केले जात असे. एक प्रकारची ‘क्रेज’ या गाण्याने त्या काळी निर्माण केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी पात्रांवची काही ताजी क्षणचित्रे घालून ही चित्रफीत युट्यूब वरून परत दाखविण्यात आली होती. आता रवींच्या मृत्यूनंतर ही चित्रफीत सगळीकडे ‘व्हायरल’ झाली असून जो तो हे गाणे बघताना व म्हणताना दिसत आहे. शेवटी माणूस गेला तरी त्याच्या आठवणी या उरतातच. ∙∙∙
कळंगुटचे आमदार मायकल लोबो काही ना काही करून आपल्याकडे लक्ष वेधून घेत असतात. मध्यंतरी त्यांनी राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे कसे तीन-तेरा वाजले आहेत हे सत्ताधार आमदार असूनही जाहीरपणे सांगितले होते. कळंगुट आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था हा त्यांचा आवडीचा विषय. आधी ते टॅक्सीवाल्यांची बाजू हिरीरीने मांडत होते. आता त्याला त्यांनी बसवाल्यांच्या न्याय्य मागण्यांची जोड दिली आहे. मंत्रिमंडळातील एक रिक्त जागा आणि मायकल यांची सक्रियता यांची सांगड घातली जात आहे. ∙∙∙
गोव्यातील बहुतेक रस्ते बिघडलेले आहेत, त्यांची दुरुस्ती चालू आहे. रस्ते बिघडलेले आहेत ते आपल्यालाही माहीत आहे. पण सर्व रस्ते एकाच बरोबर दुरुस्त करण्यास आपल्याकडे जादूची कांडी नाही. ही जादूची कांडी फिरवली की, सर्व रस्ते एकाच बरोबर दुरुस्त होतील, असे नाही. जर जादूची कांडी आपल्या हातात असती, तर एव्हाना आपण सर्व रस्ते दुरुस्त केले असते, असे सार्वजनिक बांघकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत सांगतात. रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल लोकांमध्ये चिंता आहे खरी. पण पावसामुळे रस्ते बिघडलेले आहेत, हेही तेवढेच खरे. पण पाऊस नसला तरीही रस्ते लगेच बिघडतात, हेही तेवढेच खरे. पूर्वी रस्ता बनवला की पाच -दहा वर्षे काहीच होत नसे. पोर्तुगीजकालीन रस्तेही मजबूत असायचे. पण आता तसे होत नाही. लोकसंख्या वाढली, वाहने वाढली, रस्त्यांवरील वर्दळ वाढली हेही त्याचे कारण असू शकेल. तरीही नागरिकांना चांगले रस्ते देणे ही सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. नागरिकांकडून हजारो रुपयांचा रस्ता कर घेतला जात नाही का?, असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. ∙∙∙
माजीमंत्री स्व. रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सरकारने कला अकादमीत रविवारी शोकसभा आयोजित केली आहे. त्यात सर्वजण सहभागी होतील. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी खास येणार आहेत. मध्यंतरी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने फडणवीस यांची मुंबईत जाऊन अनेकांनी भेट घेतली होती, त्यात काही मंत्र्यांचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपने फडणवीस यांच्याकडे दिली होती. सरकार स्थापनेनंतर ते फारसे राज्याच्या राजकारणात लक्ष घालत नव्हते. आता ते रविवारी येत असल्याने काही गोष्टी त्यांच्या कानावर घालता येतील, अशी आशा काही जणांना आहे. ∙∙∙
रवी नाईक यांच्या निधनानंतर रवींच्या पुत्राला बिनविरोध निवडून द्यावे, असेही काही लोकांचे म्हणणे आहे. रवींनी फोंड्यासाठी आयुष्यभर काम केले. त्यामुळे त्यांना ती एक श्रद्धांजलीच ठरेल, असे मत या काही लोकांकडून व्यक्त होत आहे. आता ही गोष्ट झाली भाजपची. पण इतर राजकीय पक्ष आहेत ना...! काँग्रेस आणि आम आदमी पक्ष तसेच गोवा फॉरवर्डसह ‘आरजी’वाले या गोष्टीला राजी होतील काय, हाही मोठा प्रश्न आहेच की...! दुसऱ्या बाजूला समाजमाध्यमावर अनेक विचारवंत क्रियाशील झाले आहेत. फोंडा मतदारसंघ हे कोणाचे ‘भाट’ आहे का, असे विचारू लागले असून उमेदवार क्रियाशील, कार्यतत्पर असावा, अशी मल्लीनाथी सुरू झाली आहे, त्यातही तथ्य आहे! ∙∙∙
साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे वचन पूर्वी वडिलधारी मंडळी आळवत होती. त्यात थोडी फार सुधारणा करून सध्या काणकोणातील रहिवासी वरील ओळ म्हणे आता गुणगुणताना दिसतात. कारण येत्या महिन्यात पर्तगाळी मठात होणार असलेल्या सार्ध पंचशतमान महोत्सवात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तर त्या नंतर डिसेंबर मध्ये आमोणा-काणकोण येथे होणार असलेल्या राष्ट्रीय लोकोत्सवाला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहाणार आहेत. देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्या उपस्थितीमुळे गोव्याच्या टोकावरील काणकोण तालुका राष्ट्रीय माध्यमांवर झळकणार आहे.मात्र त्यामुळे सुरक्षा यंत्रणाची तारांबळ उडणार असली तरी या नेत्यांमुळे काणकोण तालुक्यात अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली आहे. गेल्या वर्षी लोकोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार असे जाहीर झाले होते, पण काही कारणास्तव त्यांची भेट रहीत झाली पण यंदा तो योग जुळून येणार असल्याने सध्या तवडकर साहेब ‘फॉर्मात’ आहेत म्हणे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.