
प्रियोळचे आमदार आणि माजी मंत्री गोविंद गावडे यांना राजकारणात कुणी आणले असेल, तर ते दिवंगत माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनीच. स्वत: गोविंद गावडे हेही ते मान्य करतात. रवी नाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना गोविंद गावडे यांनी, रवी नाईक हे आपले राजकीय गुरु असून ते आपल्यासाठी नेहमीच प्रेरणा ठरले आहेत, असे म्हटले. त्यापुढेही जाऊन गावडे यांनी रवींचे व्हिजन घेऊन आपण फोंड्यातील लोकांसाठी पूर्ण निष्ठेने काम करू असेही म्हटले आहे. गोविंदराव आता संपूर्ण फोंडा तालुक्यावर आपला वरचष्मा ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत, असे म्हणायचे का? ∙∙∙
‘नाका पेक्षा मोती जड’ या म्हणीचा खरा अर्थ आता आपल्या प्राथमिक शिक्षकांना व प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना चांगलाच समजला असणार. ‘शिक्षणापेक्षा परीक्षा जड’ असे म्हणण्याची पाळी मुलांवर नव्हे, तर शिक्षकांवर आली आहे. यंदापासून तिसरीला राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले असून प्रथमच तिसरीपासून आठवीपर्यंत प्रश्नपत्रिका जीएससीआरटीने काढल्यामुळे विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक व पालक गोंधळात पडले आहेत. तिसरीच्या प्रश्न पत्रिका विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमते पेक्षा कठीण होत्या व मुलांना ज्याप्रमाणे शिकविले, तशा प्रश्न पत्रिका काढल्या नाहीत, असा आरोप काही पालकांनी केला आहे. खरे म्हणजे काही शिक्षकांनाच तिसरीचा अभ्यासक्रम जड जायला लागला आहे. प्रश्न जरा वेगळ्या प्रमाणे विचारल्यामुळे शिक्षकच गोंधळात सापडले आहेत. आता मुलांना अभ्यासक्रम सारखा समजला नाही, यात मुलांची काय चूक? ज्यांना गलेलठ्ठ वेतन मिळते तेच जर शिकायला तयार नसतील तर त्याला काय म्हणणार? ∙∙∙
एकाबाजूने गोवा सरकारने बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्यासाठी जी ‘माझे घर योजना’ सुरू केली आहे, त्याला सात कोमुनिदादींनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसऱ्या बाजूने म्हादई अभयारण्य क्षेत्र व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित करण्यास भाजपच्या कित्येक आमदारांनी विरोध केला आहे. यावर काँग्रेसचे पूर्वीचे युवा नेते सिद्धनाथ बुयांव यांनी चक्क सत्तरीच्या बाबाला प्रश्न विचारताना, वाघोबाचे एक चित्र काढून ‘म्हजे घर कधी कायदेशीर करता?’ असा सवाल केला आहे. सिद्धनाथचा हा पोस्ट बराच व्हायरल झाला असून कित्येक ठिकाणी तो शेअर होत आहे. ∙∙∙
फोंड्यातील पोटनिवडणूक बिनविरोध होणार, की मतदानाद्वारे होणार? हे येत्या काही काळात स्पष्ट होईल. कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंड्यातील जागेवर भाजपचा उमेदवार कोण? असा प्रश्न पडलेला असणार आहे. कारण भाजप रवींच्या दोन पुत्रांपैकी कोणाला उमेदवारी देणार? हे प्रत्यक्षात उमेदवारी दिल्यानंतरच कळणार आहे. तोपर्यंत सध्या या ठिकाणी भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या मगोने फोंड्यातील विधानसभेची जागा सध्या बिनविरोध निवडून द्यावी, असे आवाहन केले आहे. परंतु यापूर्वी फक्त कुठ्ठाळीत बिनविरोध निवडीचा निर्णय झाला होता, तोही माथाया साल्ढाणा यांच्या प्रेमापोटी. त्यानंतर भाजपचेच उपमुख्यमंत्री राहिलेले फ्रान्सिस डिसोझा यांच्याही अकाली निधनानंतर म्हापशात त्यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकरांना उमेदवारी दिली होती. डिसोझा व रवी नाईक हे दोघेही वजनदार नेते, पण जोशुआंचा अनुभव पाहता फोंड्यात बिनविरोध निवडणूक होणे अशक्य आहे, कारण काँग्रेसनेही तेथे रिंगणात उतरण्याची तयारी केलीच आहे. ∙∙∙
आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नरकासूर मंडळांना बिदागी देण्याचे बंद केले असल्याचे सांगितले जाते. परंतु काही मंडळातून मात्र आवश्यक ती बिदागी त्यांच्यापर्यंत पोहोचली जात असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे मिळणारी बिदागी ही काही हजारात नव्हे, तर पाच आकडी संख्येत जाते. त्यामुळेच आपल्या मंडळाला किती बिदागी मिळाली? याची फारशी वाच्यता कोणी करीत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्याने सध्याच्या नगरसेवकांनी तथा पुन्हा निवडणुकीत उतरण्यास इच्छुक असणाऱ्यांनीही खिसे खाली केले आहेत. एका-एका प्रभागात दोन-तीन ठिकाणी नरकासूर होत असल्याने काही नगरसेवकांनी हात आखडता घेतला आहे. काही झाले तरी आमदारांकडून खरोखरच बिदागी दिली जातेय का, याचा कानोसा विविध मंडळाचे अनेकजण मंडळांतून घेत आहेत हे निश्चित. ∙∙∙
जिल्हा पंचायतींना कोणतेच अधिकार नाहीत. जिल्हा पंचायती केवळ नावासाठी. ‘झेडपी’ना पंच सदस्या एवढाही मान नाही, अशा तक्रारी ग्रामीण भागातील राजकारणी वारंवार करीत असले, तरी जिल्हा पंचायत निवडणुकीचे महत्त्व काही कमी झालेले नाही. झेडपी बनण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक नेते आता सिद्ध झाले आहेत. बार्से जिल्हा पंचायत मतदारसंघाचे झेडपी म्हणून खुशाली वेळीप गेल्या तीन टर्मपासून वावरत आहेत. आता पुन्हा एकदा खुशाली वेळीप झेडपीच्या निवडणुकीत उतरणार आहेत. खुशाली यांना आव्हान देण्यासाठी दुसरा नेताच या भागात नसल्याचे भाजपा समर्थक दावा करतात. मात्र यंदाच्या निवडणुकीत एक युवा नेता बार्से जिल्हा पंचायत मतदार संघातून झेडपीच्या शर्यतीत उतरणार असल्यामुळे बाबू यांचे उजवे हात समजले जाणारे विद्यमान झेडपी खुशाली वेळीप सध्या चिंतेत पडले आहेत. आता बार्सेचे युवक खुशालीचे मक्तेदारी मोडतात की नाही, हे पहावे लागणार. ∙∙∙
हरमल येथे शनिवारी पर्यटकांना घेण्यासाठी गेलेल्या गोवा माईल्सच्या टॅक्सी व्यावसायिकास अटकाव झाला. अलीकडे असे वाद मिटल्याचे चित्र होते. त्यामुळे हरमलच्या प्रकारामागे नेमका कोणाचा हात अशी चर्चा सुरू झाली आहे. सरकार सर्व टॅक्सी व्यावसायिकांना ॲप वापरण्याची कधीतरी सक्ती करणार असे गृहीत धरण्यात आले आहे. बहुतांश टॅक्सी व्यावसायिकांनी तशी मानसिक तयारीही केली आहे. तरीही असे प्रकार का घडतात याची दबक्या आवाजातील चर्चा ऐकू येऊ लागली आहे. अद्यापही काही जणांना टॅक्सी व्यावसायिकांतील वाद कायम रहावा असे वाटते, असे घटक अशा प्रकारामागे असावेत अशी चर्चा आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.