
पणजी: गेल्या सहा वर्षांत १३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, त्यात अनेक तरुणांचा समावेश असूनही रस्ते अपघात रोखण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गुरुवारी (१७ एप्रिल) केली.
गेल्या काही दिवसांत घडलेल्या जीवघेण्या अपघातांवर प्रतिक्रिया देताना आलेमाव म्हणाले की, भाजप सरकार धर्म आणि जातीच्या नावाखाली महत्त्वाचे मुद्दे वळविण्यात व्यस्त असून जनतेच्या जिवाला कमी महत्त्व देत आहे.
‘‘रस्ते अपघात रोखण्यात आणि त्यांची कारणे शोधण्यात भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. दररोज जीवघेण्या अपघातांच्या घटना घडत असून, त्यात जीवितहानी होत आहे. रस्ते अपघातात लोकांचा मृत्यू होत आहे, ही चिंताजनक बाब आहे, तरीही हे सरकार या प्रश्नाबाबत असंवेदनशील असल्याचे दिसून येत आहे,’’ असे आलेमाव म्हणाले.
2023 मध्ये केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील रस्त्यांचे ’ब्लॅक स्पॉट’ दूर करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती, परंतु हे सरकार अपयशी ठरले आहे.
‘‘सरकारने हे ब्लॅक स्पॉट हटवले असतील तर जनतेला सांगावे,' असे सांगून आलेमाव म्हणाले की, रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे रस्ते अपघात होत आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अनेकदा खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज सुद्धा अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले दिसत आहेत, जे रस्ते अपघाताचे एक कारण होत आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी आणलेली जेट पॅचर मशिन आणि खड्डे नोंदविण्यासाठी व्हॉट्सअॅप सेवा बंद पडल्याचे,’’ आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले.
‘‘रस्ते सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि अपघातांना जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. गेल्या सहा वर्षांत रस्ते अपघातात १३०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे,' असे सांगून आलेमाव म्हणाले की, सरकारने रस्त्यांची रचना आणि अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांचा अभ्यास करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.