
पेडणे: मोपा विमानतळाच्या टॅक्सी पार्किंगसाठी वाढविण्यात आलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ टॅक्सीचालकांनी आज गेटबाहेरील पोलिसांना न जुमानता बॅरिकेड्स तोडून प्रशासकीय इमारतीकडे धाव घेतली. त्याचे नेतृत्व आमदार विजय सरदेसाई, मनोज परब, शिव वॉरियर्स युनायटेड टॅक्सी युनायटेड संघटनेचे अध्यक्ष रामा वारंग, संघटनेचे खजिनदार निखिल महाले, चेतन कामत, दीपक कळंगुटकर, ॲड अमित सावंत, अनिकेत साळगावकर यांनी केले.
यावेळी आंदोलकांनी प्रशासकीय इमारतीबाहेर जीएमआर कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी प्रशासकीय कार्यालयाच्या एका अधिकाऱ्यासोबत झालेली चर्चा आंदोलकांना मान्य न झाल्याने कार्यालयाच्या दारातच आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
कंपनीचा एक अधिकारी त्या ठिकाणी आला. मात्र, योग्य भूमिका घेण्यासाठी मोपा विमानतळ प्राधिकरणाचा अधिकारी अपयशी ठरला. या आंदोलनात टॅक्सीचालकांच्या कुटुंबातील महिलांनीही मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता तर राज्याच्या विविध भागातील टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांच्या नेत्यांनीही भाग घेतला होता.
जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही, पार्किंग शुल्क ८० रुपये होते ते तसेच ठेवत नाहीत, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत इथून हटणार नाही, असा हट्ट त्यांनी धरला. यावेळी विजय सरदेसाई यांनी जीएमआर कंपनीचे सीईओ सेशन यांना मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांच्याशी मोबाईलवर चर्चा केल्यानंतर त्यांनी आपण राज्याबाहेर असल्याचे सांगितले.
मोपा पोलिस ठाण्यातील पोलिसांबरोबरच पेडणे, मांद्रे व अतिरिक्त राखीव पोलिसांची कुमक या ठिकाणी बंदोबस्तासाठी आणली होती. या ठिकाणी जीएमआर कंपनी व सीईओ सेशन यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
नंतर दुपारी आमदार विजय सरदेसाई, मनोज परब, शिव वॉरियर्स युनायटेड टॅक्सी युनायटेड संघटनेचे अध्यक्ष रामा वारंग, संघटनेचे खजिनदार निखिल महाले, दीपक कळंगुटकर, ॲड. अमित सावंत यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यासाठी पणजी येथील महालक्ष्मी बंगल्यावर त्यांना भेटण्यासाठी गेले.
यावेळी जोपर्यंत आम्ही तिथून येत नाही, तोपर्यंत तुम्ही इथून हलायचे नाही. तुम्ही ठाण मांडून प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयासमोर बसावे, अशी त्यांना सक्त ताकीद दिली.
मुख्यमंत्री सावंत यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व विजय सरदेसाई यांनी केले. यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. सोबत असलेल्या आंदोलकांच्या नेत्यांनीही चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जे वाढीव शुल्क आहे ते सध्या जैसे थे ठेवले.
आणि येत्या ३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री तसेच टॅक्सी व्यवसायिक आणि इतर नेत्यांसोबत वाढीव शुल्क आणि इतर विषयाबाबत खास बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय शिष्टमंडळाला कळवला.
नंतर महालक्ष्मी बंगल्यावर गेलेले शिष्टमंडळ विजय सरदेसाई आणि इतर आंदोलन करणारे नेते परत रात्री उशिरा मोपा विमानतळावर आंदोलन स्थळी आले.
आंदोलनकर्त्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीबाबत सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी शुल्क जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्याने हे आंदोलन आम्ही आता स्थगित करूया, असे त्यांना सांगितले. आणि हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, जीएमआर कंपनी ही स्थानिकांना कुठल्याही प्रकारे सुविधा देत नाही. बाहेरच्या लोकांचे चोचले पुरवण्याचे काम करत आहे आणि मुख्यमंत्री हे जीएमआर कंपनीला बळी पडत आहेत. गेले अनेक दिवस आणि गेली दोन वर्षे हे टॅक्सी व्यावसायिक आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडत आहेत. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. स्थानिकांना प्राधान्य देण्याबरोबर त्यांचे शुल्क तातडीने कमी करा आणि न तसे झाल्यास हे आंदोलन संपूर्ण पेडणे तालुक्यातून गावागावांतून पेटवण्यात येईल.
‘आरजी’ नेते मनोज परब म्हणाले की, स्थानिकांना परत परत हे सरकार रस्त्यावर उतरवण्याचे काम करत आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू असून महिलांना आज रस्त्यावर उतरण्याची वेळ भाजप सरकारने आणली आहे. आज टॅक्सी व्यवसाय काही पेडण्यातील बेरोजगार युवक करतात त्यांच्या पोटावर पाय ठेवण्याचे काम जीएमआर कंपनी आणि सरकार करत आहे. परत परत शुल्क वाढ आणि नको त्या अटी घालून त्यांना जेरीस आणण्याचे काम कंपनीकडून होत आहे. आम्ही हा अन्याय आता सहन करणार नाही.
शिव वॉरियर्स संघटनेचे अध्यक्ष रामा वारंग म्हणाले की, आमच्या जमिनी गेल्या. आम्हाला नोकरी नाही आणि टॅक्सी व्यवसाय करण्यासाठी सरकार आम्हाला देत नाही. वारंवार आमच्या मागण्या सरकार धुडकावून लावत आहे. आमची सतावणूक करण्याचे काम जीएमआर कंपनी करत आहे. जीएमआर कंपनीचे सीईओ सेशन हे कोणालाही जुमानत नाहीत. मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत यापूर्वी बैठक झाली होती त्या बैठकीचे इतिवृत्त यावेळी वाचून दाखवण्यात आले.
पेडणेचे माजी आमदार बाबू आजगावकर यांनी आंदोलन करणाऱ्या टॅक्सी चालकांना पाठिंबा दिला. या शुल्कवाढीविषयी टॅक्सीचालकांच्यावतीने ते मुख्यमंत्र्यांना भेटले. टॅक्सीचालकांची समस्या सोडवावी, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. जर ही समस्या सुटली नाही, तर टॅक्सीचालकांबरोबर रस्त्यावर उतरू, असे ते म्हणाले.
अखिल गोवा टॅक्सी संघटनेचे नेते चेतन कामत म्हणाले की, गेली अनेक वर्षे आम्ही मोपावरील टॅक्सी बांधवांसाठी आंदोलनात सहभागी होत आहोत. वारंवार न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरायला सरकार आणि जीएमआर कंपनी लावते. यापुढे ठोस भूमिका घेऊन या प्रकरणाचा एकदाच सोक्षमोक्ष लावा. हे आंदोलन आता तीव्र होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.