पाच सहा घरे वाचविण्यासाठी रेल्वेमार्ग पश्र्चिम भागातून पूर्व भागात नेण्यासाठी रेल्वे अधिकारी तयार झाले असल्याचे सांगून कुठ्ठाळीचे आमदार अँथोनी वाझ यांनी लोकांची नाहक दिशाभूल करू नये.
हा प्रश्न पाचसहा घरांचा नसून गावांमध्ये कोळसा वाहतुकीमुळे होणारे प्रदषूण, रेलगाडीच्या ये-जामुळे घरांना बसणारे हादरे इत्यादीचा आहे. रेलमार्ग दुपदरीकरणासंबंधी आम्ही कोणतेही राजकारण करीत नाही.
गाव वाचविण्यासाठी वेळसांववासिय एकजुटले असल्याचा सूर वेळसांववासियांच्या बैठकीत उमटला.
तीन दिवसांपूर्वी आमदार वाझ यांनी रेल्वे अधिकारयांसह वेळसांवला भेट देऊन दुपदरीकरण कामाची पाहणी केली होती. "त्यांनी ज्या काही सुचना केल्या होत्या त्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या त्यामुळे दुपदरीकरणासंबंधीचा प्रश्न सुटला", असे वास यांनी म्हटले होते.
तथापी वाझ हे लोकांची दिशाभूल करीत असून त्यांना यासंबंधी कोणताही अभ्यास नसल्याचा दावा वेळसांववासियांच्या बैठकीत करण्यात आला. वेळसावच्या सरपंच डायना गौव्हैआ यांनी दुपदरीकरणामुळे गावामध्ये मोठे प्रदूषण होणार असल्याने पंचायत मंडळ लोकांबरोबर असल्याचे स्पष्ट केले.
आमदार वाझ यांनी भेटीसंबंधी वेळसांववासियांना किंवा पंचायतीला काहीच माहिती दिली नव्हती. आम्हाला कळविले असते तर आम्ही तेथे आलो असतो असे त्या म्हणाल्या. संबंधित रेल्वेने दुपदरीकरण रेलमार्ग बदलण्यासाठी कोणता आराखडा तयार केला आहे ते दाखविण्याची गरज आहे. ते आम्हाला एकही कागदपत्र दाखवित नाही. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
माजी आमदार एलिना साल्ढाणा यांनी रेल्वे अधिकारी सत्य लपवित असल्याचा दावा केला. सध्याच्या रेलमार्गाच्या मध्यभागापासून चाळीस मीटर रेल्वेमार्ग विस्तारीत होणार आहे. त्यामुळे रहिवाशांच्या व्हरांडा, कुंपणातून रेलमार्ग जाण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाहून कोळसा आयात करून जहाजातून मुरगाव बंदरात आणला जातो. तेथून तो कर्नाटकला नेण्यात येतो. कर्नाटकामध्ये एक मोठे व बारा लहान बंदरे असताना तेथे थेट कोळसा का उतरविण्यात येत नाही?
रेलमार्ग दुपदरीकरण हे समस्या वाढविणारे आहे. घरे वाचविण्यासाठी रेलमार्ग कसा दुसरीकडे नेणार हे रेल्वेने सांगावे असे आवाहन त्यांनी केले.
गोंयचो रापणकारांचे एकवोटचे आग्नेल रॉड्रिग्ज यांनी घरे वाचविण्याचा प्रश्न नसून प्रदूषणाचा असल्याचे म्हटले. पोर्तुगीज काळात लोकांच्या सोयीसाठी भाटकारांनी आपल्या जागा रेल्वेमार्ग घालण्यासाठी दिल्या होत्या.
कोळसासाठी दिल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोळसाचा गोव्याला कोणताही लाभ नसून तो कर्नाटकाला होत आहे.मात्र हरित गोवा, काळा होत असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी सरकारी यंत्रणा स्थानिकाना दादागिरी करते असे म्हटले. कोळसामुळे मुरगाववासियांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला.
सामाजिक कार्यकर्ते आर्विल डिसौझा यांनी आमदार खोटी आश्वासने देत असल्याचा दावा केला. प्रदूषणाविरोधात आमचे युध्द असून एकजुटीने लढल्यास कोणीही स्पर्श करणार नाही असे ते म्हणाले.आम्ही कोणतेही राजकारण करीत नाही.
सर्व गाव एकजुटीने उभा आहे. प्रदूषण, दुपदरीकरण इत्यादीबाबत योग्य तोडगा दाखवा. वेळप्रसंगी आम्ही न्यायालयात जाऊ असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांच्या प्रश्नांबरोबर उभे राहिल्याबद्दल आम्हाला वेळसांव पंचायत मंडळाचा अभिमान आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.