मडगावमध्ये खारेबांद, पेड, एमसीसी स्टेडियम-रावणफोंड रस्ता तसेच इतर अनेक ठिकाणी स्क्रॅप यार्डांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणे किंवा वाहने चालविणे धोक्याचे ठरत आहे.
त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यावरच बेवारस वाहने ठेवली गेल्यानेही काही ठिकाणी रस्ते बंदच झाले आहेत. हे स्क्रॅप यार्ड व वाहने हटविण्याची मागणी येथील रहिवाशांतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच नगरपालिकसमोर मोठे आव्हान उभे आहे.
मंगळवारी आमदार दिगंबर कामत व भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील नाईक यांनी सिने लताजवळील भागाची पाहणी केली. सोमवारी रात्री रेल्वे रुळाच्या समांतर भागात मोठी आग लागली त्यामुळे आमदार कामत यांना या भागाची पाहणी करणे भाग पडले. या संपूर्ण रस्त्याच्या बाजूला ठेवलेली वाहने पाहून व रस्ता बंद केल्याचे पाहून आमदार कामत यांना आश्र्चर्याचा धक्का बसला.
या पाहणीनंतर आमदार दिगंबर कामत म्हणाले की, आपण वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांना या भागाची पाहणी करून अहवाल सादर करण्यास व वाहने हटविण्यास सांगितले आहे.
सुनील नाईक म्हणाले की, ही वाहने रिंग रोडसाठी सरकारने संपादन केलेल्या जागेत ठेवलेली आहेत. आपण आमदार कामत यांना यासंबंधी चौकशी करून वाहने ताबडतोब हटविण्यास व रस्ता मोकळा करण्याची विनंती केली आहे.
रिंग रोडची झाली दुरवस्था
सिने लताजवळ पूर्वी केवळ एक वाहन दुरुस्तीचे गॅरेज होते. आता हा रस्ता पूर्ण बंद करून तिथे वाहने धुण्याचे केंद्र, शिवाय दोन स्क्रॅप यार्ड आहेत व त्याबाहेर मोडलेली कमीत कमी 15 ते 20 वाहने पडून आहेत. जर रिंग रोड पूर्ण करायचा असेल तर सर्वप्रथम हे स्क्रॅप यार्ड, वाहन धुण्याच्या केंद्रासह मोडलेली वाहने तिथून हलविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.