मायकल लोबो यांची चलबिचल

काँग्रेस हवालदिल: अमित शहा संपर्कात असल्याचे वक्तव्य
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak

पणजी: बार्देशचे सम्राट होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करत असलेले माजी मंत्री व कळंगुटचे काँग्रेस उमेदवार मायकल लोबो यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संपर्क साधल्याच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाशी सौदेबाजी चालवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

'माझ्याशी स्वत: अमित शहा यांनी संपर्क साधला. ते म्हणाले, तुम्ही आमचेच आहात. त्या तुलनेने काँग्रेस पक्षात काहीच हालचाल चालत नाही. भाजप नेते निकालाची वाट न पाहता सरकार स्थापन करण्यासाठी तीव्र हालचाली करत आहेत' असे वक्तव्य लोबो यांनी 'गोमन्तक'शी बोलताना केले. हैदराबादवरून रविवारी रात्री गोव्यात परतलेले मायकल लोबो विमानतळावर गोमन्तक प्रतिनिधीशी बोलत होते. काँग्रेस पक्ष माझी योग्य प्रकारे कदर करेल अशी मी अपेक्षा बाळगून आहे असे मत लोबो यांनी व्यक्त केले.

भाजप नेत्यांच्या संपर्कात राहून काँग्रेसकडे वाटाघाटी सुरू करण्याचा लोबो यांचा इरादा लपून राहत नाही. मायकल लोबो भाजपातून फुटून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या पक्ष नेत्यांशी सतत संपर्क ठेवला आहे. राजकीय निरिक्षक मानतात की,

ज्या पद्धतीने सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने भाजप नेत्यांनी तीव्र हालचाली चालवल्या आहेत. मात्र, त्या तुलनेने काँग्रेसमध्ये शांततेचे वातावरण असून ते निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.

Michael Lobo
Indian Super League: बरोबरीमुळे शेवटच्या क्रमांकाची चुरस कायम

राज्‍यात पुन्‍हा एकदा भाजपचे सरकार स्‍थानापन्न व्‍हावे यासाठी भाजप नेत्‍यांनी कंबर कसली आहे. मात्र त्‍यामानाने काँग्रेस पक्षात सामसूम दिसतेय. तरीसुद्धा काँग्रेसचे पाठीराखे आमच्‍याच पक्षाचे सरकार येणार असल्‍याचे ठामपणे सांगत आहेत. प्रभाकर तिंबले यांच्‍या मते काँग्रेस-गोवा फॉरवर्डला बहुमतासाठी आवश्‍‍यक असलेल्‍या 21 जागा सहज मिळतील. तर, ॲड. क्‍लिओफात कुतिन्‍हो यांनी सासष्‍टीत मतविभागणी होऊन त्‍याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल काय याबाबत असा संशय व्‍यक्त केला आहे. डॉ.ऑस्‍कर रिबेलो यांच्‍या मते भाजप दुहेरी आकडाही गाठणार नाही. या निवडणुकीत भाजप पाठीराख्‍यांनीच त्‍या पक्षाला संतापाने मतदान केलेले नाही. भाजपविरोधातील प्रस्‍थापित विरोधी लाट आणखी तीव्र बनली आहे.

दुसऱ्या बाजूने कानोसा घेतला असता भाजपने सरकार स्‍थापन करण्‍यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. लोबोंशी जवळीक साधण्‍याबरोबरच अपक्ष आणि लहान-सहान पक्षांची मोट बांधण्‍यासाठी कंबर कसली आहे.

या पक्षाचे स्‍थानिक आणि केंद्रीय नेते काँग्रेस नेत्‍यांच्‍याही संपर्कात असल्‍याचे समजते. या सूत्रांच्‍या मते भाजपमध्‍ये ज्‍या तीव्रतेने हालचाली सुरू आहेत, त्‍या मानाने काँग्रेसमध्‍ये काहीच हालचाली नाहीत. काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते हात पांघरून बसले आहेत, असे खुद्द लोबो यांच्‍या निकटवर्तीयांकडून सांगण्‍यात आले.

भाजपचे ‘बलाढ्य’ नेतेही सरसावले!

राज्‍यात भाजपची सत्ता यावी यासाठी त्‍या पक्षाचे नेतेही सक्रिय बनले आहेत. विश्‍‍वजीत राणे, बाबूश मोन्‍सेरात, रोहन खंवटे आदी नेते सतत आपल्‍या समर्थक उमेदवारांच्‍या संपर्कात आहेत. मोन्‍सेरात यांनी अपक्ष उमेदवारांशी सोयरीक साधणे सुरू केले आहे. निवडून आल्‍यावर या विजयी उमेदवारांच्‍या साथीने भाजपवर दबाव आणून आपले ईप्सित साध्‍य करण्‍याचा त्‍यांचा डाव असल्‍याचे समजते. दुसरीकडे भाजप नेत्‍यांनीही आपल्‍या बंडखोर उमेदवारांशी संपर्क सुरू केला आहे. कोणत्‍याही परिस्‍थितीत यावेळीही राज्‍यात भाजपचे सरकार सत्तेवर आणावे, यासाठी हा आटापिटा चाललेला आहे

Michael Lobo
मटका प्रकरणी दोघांना अटक

अमित शहांकडून इन्कार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मायकल लोबो यांच्याशी संपर्क साधल्याच्या वृत्ताचा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयाने आज सोमवारी इन्कार केला. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी 'गोमन्तक'शी संपर्क साधून अमित शहा यांनी कोणताही संपर्क मायकल लोबो यांच्याशी साधला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, अमित शहा यांच्या कार्यालयाने आपल्याशी संपर्क साधून प्रत्यक्षात ही माहिती दिली आहे. दरम्यान, 'गोमन्तक'च्या सायं डिजिटल बुलेटिनमध्ये तसेच 'गोमन्तक टीव्ही' मध्ये ही बातमी झळकल्यानंतर गोव्यात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्रिपदावरही डोळा:

बार्देश तालुक्यात पाच ते सहा जिंकून आणल्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये महत्त्वाचे पद व खाती दिली जातील अशी अपेक्षा लोबोंना आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदावरही डोळा ठेवला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अमित शहा यांनी संपर्क साधल्याचा लोबोंचा दावा महत्त्वाचा आहे.

बाबूश म्हणतात, अपक्ष आमच्या संपर्कात

काही अपक्ष उमेदवार आमच्या संपर्कात असून सत्तास्थापनेत ते भूमिका बजावण्यासाठी उत्सुक आहेत, असे बाबूश मोन्सेरात यांनी म्हटले आहे. अपक्ष उमेदवारांना घेऊन राज्यात भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com