Goa Politics: खरी कुजबुज,मायकलबाब, आधी आपले घर सांभाळा!

Khari Kujbuj Political Satire: टॅक्सी अॅप प्रकरणावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. ते म्हणाले, ‘अॅप येणारच.
Goa Latest Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

मायकलबाब, आधी आपले घर सांभाळा!

‘आधी आपल्या पायाखाली काय जळते ते बघा’ अशी मराठीत एक म्हण आहे. काही आमदार आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे सोडून इतर मतदारंघात ढवळाढवळ करण्यात धन्यता मानतात. माजी मंत्री व ‘मंत्री इन व्हेटिंग’ मायकल लोबो हे त्‍यापैकीच एक. मांद्रेत आपले समर्थक असून पुढील निवडणुकीत मांद्रे मतदारसंघात आपण भाजपचा आमदार निवडून आणणार असे वक्तव्य करून लोबो स्वतःच टीकेचे धनी बनले आहेत. म्हापसा मतदारसंघातही लोबो ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी केला आहे. मायकल आपला कळंगुट मतदारसंघ सोडून उत्तर गोव्यातील सगळ्या मतदारसंघांत ढवळाढवळ करतात. कळंगुट मतदारसंघातील हडफडे पंचायत क्षेत्रातील किनारी भागात व्यभिचार व घाणेरडी कृत्ये चालत असल्याचा आरोप खुद्द सरपंच रोशन रेडकर यांनी केला आहे. कळंगुट मतदारसंघातील किनारपट्टी भागात सर्व प्रकाराचे गैरप्रकार चालतात ते लोबो यांना दिसत नाहीत काय? असा प्रश्‍‍न जीत व ज्योशुआ विचारत आहेत. मायकलबाब, आपल्या डोळ्यांत मुसळ असताना दुसऱ्याच्या डोळ्यांत शोधणे बरे नव्‍हे! ∙∙∙

आता माविन काय करणार?

टॅक्सी अॅप प्रकरणावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. ते म्हणाले, ‘अॅप येणारच. तसेच टॅक्सीच्या दरात कोणताही बदल होणार नाही’. आता खरा प्रश्‍‍न असा आहे की, जर निर्णय आधीच झाला असेल तर वाहतूक संचालकांनी बुधवारी टॅक्सीचालकांशी बैठक का घेतली? बैठकीत सांगण्यात आले की, चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. असे असेल तर माविन यांचे विधान काही तरी वेगळंच सांगतय. त्यामुळे टॅक्सीचालक आता संतप्त बनले आहेत. माविन यांच्यावर दबाव टाकण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या गप्पांमध्ये ‘आता अॅप काय येणार? आधी आमचं ऐकून घ्या’ असा सूर ऐकू येत आहे. मंत्री आणि टॅक्सीचालक यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटणार, हे नक्की. पाहुया, आता माविनना अजून एक आंदोलन शांत करण्यासाठी काय करावं लागतंय ते! ∙∙∙

स्‍वार्थी राजकारण्‍यांना चपराक

पणजीतील चर्चचौकात भू-रुपांतराविरोधात आज निदर्शने करण्यात आली. या मोर्चाचे आयोजन काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते. त्यास काही राजकारण्यांनी उपस्थिती लावून त्यात राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्‍यास सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. हा मोर्चा राजकारण करण्यासाठी नव्हे तर गोवा वाचवण्यासाठी, असे सांगत एका बाजूला ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. प्रकरण तापल्याने अन्‍य काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देणे टाळले. हा मोर्चा म्हणजे फक्त सह्यांची मोहीम आरंभून त्याचे निवेदन सरकारला देण्याचे होते. मात्र राजकारणी आपली पोळी भाजून घेत असल्याने त्यांना रोखण्यात आले. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांचे स्वागत करून त्यांची चांगल्या प्रकारे वागणूक दिली. मात्र काही वेळानंतर मुख्यमंत्रीच बंगल्यावर नसल्याचे समजले. त्यामुळे मंत्र्यांविरुद्ध पणजीतील मोर्चामागील उद्देश असफल झाला. ∙∙∙

गिरीशरावांच्‍या भाषणाचे उठतात ‘तरंग’

काँग्रेसच्या केंद्रीय समितीचे कायम सदस्य गिरीश चोडणकर यांनी तामिळनाडूत केलेल्या भाषणाचे तरंग गोव्‍यात उठू लागले आहेत. इंग्रजीत केलेल्या भाषणात थेट पंतप्रधानांवर टीका करून चोडणकर चर्चेत आले आहेत. त्यांच्या भाषणाची राष्ट्रीय पातळीवर माध्यमांत दखल घेतली गेली आहे. काँग्रेसचा आक्रमक युवा चेहरा असा त्यांचा उल्लेख होऊ लागला आहे. तामिळनाडूतील गुंतागुंतीच्या राजकारणात एका बाजूला द्रमुक आणि दुसरीकडे अण्णाद्रमुक असताना, केंद्रातील सत्ताधारी भाजप हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न करत असताना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांत उमेद निर्माण करण्यासाठी चोडणकर यांची जोशपूर्ण भाषणे कारणीभूत ठरतील असे दिसते. ∙∙∙

एका म्‍यानात दोन तलवारी मावणार?

मांद्रे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मगोचा आमदार करत आहे. त्यातच, मुख्यमंत्र्यांनी अलीकडे आगामी निवडणुकीत मांद्रेतून भाजपच निवडून येणार असे वक्तव्‍य केल्‍यामुळे या दोन पक्षांच्‍या युतीत मिठाचा खडा पडल्यासारखे झाले आहे. हे विधान ढवळीकर बंधूसह मगोपच्या नेत्‍यांना रुचलेले नाही. दुसरीकडे मगोचे आमदार जीत आरोलकरांची यांची भाजपकडे जवळीक वाढत चालली आहे. त्‍यांची मुख्‍यमंत्र्यांशी मैत्री आहे. त्‍यामुळे भविष्‍यात जीत भाजपमध्‍ये उडी मारणार अशा चर्चांना अधूनमधून उधाण येते. पण दयानंद सोपटेंचा त्‍यांना पक्षात घेण्‍यास विरोध असेल हे सांगायला कुणा ज्‍योतिषाची गरज नाही. कारण जीत भाजपमध्‍ये आल्‍यास ते तिकिटावर दावा ठोकणारच आणि एका म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाही. त्‍यामुळे दोन्‍ही पक्षांची कसोटीच लागणार आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; ...तर विद्यार्थी नापास होतील की शिक्षण खाते?

दामूंच्या मौनाचा अर्थ काय?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीत केवळ केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते असे कोणीही खरे मानणार नाही. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यास केवळ दोन महिने झाले असताना प्रदेशाध्यक्ष याबाबत काय म्हणतील असा विचार मंत्र्यांना करावा लागण्यापर्यंत दामू यांनी आपली प्रतिमा तयार केली आहे. अशा या दामू यांनी दिल्ली दौऱ्यात कोणाच्या भेटी घेतल्या आणि काय चर्चा केली याविषयी शब्दही कुठे उच्चारलेला नाही. त्यामुळे त्यांच्या या मौनाचा जो तो सोयीस्कर अर्थ काढू लागला आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: कधी होणार गोवा मंत्रिमंडळाचा फेरबदल? CM सावंत आणि अमित शहांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

तानावडेंची चौफेर नजर

राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे प्रश्‍‍न विचारताना सर्व विषय कवेत घेण्याचा प्रयत्न करतात. गोव्याला मुंबईशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले कित्येक वर्षे रखडले आहे. ते केव्हा पूर्ण होणार या प्रश्नाचे उत्तर तानावडे यांनी राज्यसभेत प्रश्न विचारून मिळविले. यंदा सप्टेंबरपर्यंत ते काम पूर्ण होईल असे उत्तर तानावडे यांच्या प्रश्नाला देण्यात आले आहे. आपण केवळ गोव्यातीलच प्रश्न विचारत नाहीत तर गोव्याशी संबंधित प्रश्नांची जाण आपणास आहे, हे तानावडे आता दाखवून देऊ लागले आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com