Goa Politics: खरी कुजबुज; ...तर विद्यार्थी नापास होतील की शिक्षण खाते?

Khari Kujbuj Political satire: राज्यभरातील पंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी पावले टाकण्यास सुरू केले आहे.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

...तर विद्यार्थी नापास होतील की शिक्षण खाते?

राज्यात शिक्षण क्षेत्रात एवढे काही घडतेय, पण मुख्यमंत्री गप्प आहेत. विरोधकांनी अनेकदा सांगून पाहिलं, की शिक्षण खात्याला स्वतंत्र मंत्री द्या, पण कोण ऐकतोय? सध्या शाळांपेक्षा शिक्षण संचालनालयात जास्त गोंधळ आहे. पालकांच्या तक्रारी, शिक्षकांवर आरोप, तर कधी नवीन शैक्षणिक वर्षाच्या तारखांवर वाद सगळं काही घडतंय. मुख्यमंत्र्यांनी शिक्षणावर लक्ष द्यायला हवं. शिक्षण क्षेत्रात अशीच गडबड सुरूच राहिली, तर विद्यार्थी नापास होतील की ‘शिक्षण खातं?’ यावरच आता चर्चा रंगली आहे! ∙∙∙

पंचायत कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’

राज्यभरातील पंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी पावले टाकण्यास सुरू केले आहे. त्यांच्या काही मागण्या मान्य होतील, असे मंत्र्यांनी म्हटले आहे. एका बाजूने कदंब कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारण्याचे ठरविले असल्यानेच पंचायत कर्मचाऱ्यांना मधाचे बोट लावण्यास सरकारकडून उशीर करण्यात आलेला नाही. या कर्मचाऱ्यांना समान केडर लागू करून त्यांची राज्यभरात कुठेही बदली करण्याची तजवीज सरकार करत होते. त्याविषयावर मात्र सोयीस्कर मौन बाळगले जात आहे. गुदिन्हो यांनी तूर्त संघर्ष टाळण्यात यश मिळवले असले, तरी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करवून घेण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे. अन्यथा संपाचा मार्ग हे कर्मचारी कधीही चोखाळू शकतील याचीही जाणीव मंत्र्यांना असेलच. ∙∙∙

कुणाला वगळून कुणाला घेणार?

राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. मात्र, कुणाला वगळून कुणाला घेणार ते अजून स्पष्ट झालेले नाही. फोंडा तालुक्यात चार मंत्री आहेत, त्यातील दोघांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र, कुणाचा पत्ता कट होणार हे गुलदस्त्यात आहे. सध्या तरी या चारही मंत्र्यांच्या पोटात गोळा आला असणार हे नक्की. पाहुया काय होते ते..! ∙∙∙

सुदिनरावांनी करून दाखवलेच

फोंड्याचे विद्यमान आमदार आणि कृषिमंत्री रवी नाईक यांनी एकेकाळी पणजीत सुमारे पस्तीस हजार महिलांचा मेळावा भरवला होता. त्यानंतर त्यांनी फोंड्यात १६ हजार महिलांचा मेळावा भरवला. आता त्याच धर्तीवर मडकईचे सुदिनराव महिला मेळावे भरवू लागले आहेत. चार दिवसांपूर्वी भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुदिनरावांनी मोठा महिला मेळावा भरवला होता. नाही म्हटले तरी किमान पाच ते सहा हजार महिला या मेळाव्याला उपस्थित होत्या. आता सहजासहजी बहुतांश महिला मेळाव्यासाठी घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला जमवणे तसे सोपे काम नाही, तरीही सुदिनरावांनी हे करून दाखवले तेच मोठे. ∙∙∙

राजकीय आरोपांच्या ओघात फजिती?

हळदोणेत मोठ्या प्रमाणात जमीन रूपांतरणे होत असल्याचा आरोप स्थानिक आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी अलीकडेच केला होता. यावर प्रत्युत्तर देताना भाजपाचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी फेरेरांवर टीका केली. तसेच या गोष्टीला फेरेरा हेच जबाबदार असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे, एकप्रकारे हळदोणेत बेकायदा जमीन रूपांतरण तसेच बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याची अप्रत्यक्ष कबुली टिकलोंनी दिली. मुळात टिकलोंना माध्यमांकडून आलेला प्रश्न व्यवस्थितरीत्या समजला नाही, किंबहुना बोलण्याच्या ओघात त्यांनी आपल्याच सरकारकडे बोट दाखविले. टिकलो म्हणाले की, मागील तीन वर्षांत हळदोणेत बेकायदा बांधकामे व जमीन रूपांतर झाली आहेत, परंतु स्थानिक आमदार याला जबाबदार कसे? कारण जमीन रूपांतरण असो किंवा एखादे बांधकाम उभे राहत असल्यास त्यांना प्रशासकीय परवानग्या लागतात आणि ते सरकारकडून मिळते, कदाचित ही बाब टिकलो विसरले. अशाप्रकारे टिकलोंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला अशी चर्चा नंतर टिकलोंच्या विधानानंतर हळदोणेत रंगली होती. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; हा शिमगा की नरकासुर स्पर्धा

शिक्षकांची प्रतिमा सुधारणार कोण?

गोवा विद्यापीठात एका साहाय्यक प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका चोरी करून विद्यार्थिनीला पुरवण्याचा प्रकार उघड झाल्याने सगळीकडे खळबळ माजली आहे. या एका प्रकरणामुळे आता गोवा विद्यापीठात विद्यार्थिप्रिय शिक्षक नाहीत का? अशी चर्चा रंगू लागली आहे. सर्वांना वाटते, अशा चुकीचे धडे देणाऱ्या शिक्षकांची उजळणी व्हायलाच हवी! पण पुढाकार कोण घेणार? आता गोवा विद्यापीठातच नव्हे, तर इतर शिक्षकांकडे देखील लोक संशयाच्या दृष्टीने पाहू लागले आहेत. आता ही प्रतिमा सुधारणार कोण यावर शिक्षकांमध्येच चर्चा सुरू झाली आहे. ∙∙

Goa Political Updates
Goa politics: मांद्रेच्या जागेवरुन भाजप - मगोप यांच्यात जुंपली; 'बालेकिल्ला कदापि सोडणार नाही', ढवळीकरांचा एल्गार

नाट्यकलेच्या वाढीसाठी...

सायमन कॅलो या नटाचं ‘बीईंग ॲन एक्टर’ हे पुस्तक जगभर गाजलं. पुस्तक वाचून कुणीही अभिनेता होऊ शकत नाही, पण करिअर करणाऱ्या रंगसाधकांनी हे पुस्तक जरूर वाचावं असं आहे. नाट्यमंचावरील कलाकार फुलत रहावा, वाहता रहावा यासाठी त्यांना नाट्यविषयक वाचन हे अन्नासारखं आवश्यक असतं असं जगभरातील नाट्य तज्ञांनी मान्य केलं आहे. लॉरेन्स ऑलिवेअर हे ब्रिटिश अभिनेते आणि दिग्दर्शक. त्यांनी ब्रिटिश रंगमंच गाजवला आणि आपलं नाव नाट्यमंचावर कायम कोरून ठेवलं. त्यांच्याविषयीचं साहित्यही तरुण कलाकारांनी बारकाईनं वाचलं पाहिजे. कोकणी नाटक स्पर्धेतील आविष्करणाचा दर्जा पाहिला, तर याची नितांत गरज आहे असं वाटतं. अगदी छोट्या विश्वात राहणाऱ्या नाट्य शाळेने अशी पुस्तकं ग्रंथालयात ठेवली तर विद्यार्थ्यांना आपल्या जाणिवांच्या कक्षा विस्तारत ठेवता येतील. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com