
Meeting Between CM Pramod Sawant and Pilgao Farmers
साखळी: सारमानस, पिळगाव येथील आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी येथील रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सोबत झालेल्या बैठकीत ठोस तोडगा निघू शकला नाही.
दरम्यान, येथील मुख्य सार्वजनिक रस्त्यावरून ही खनिज वाहतूक करण्याच्या विषयावरून शेतकरी व कामगार संघटना तसेच ट्रकमालक संघटनांचे प्रतिनिधी भिडल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी डिचोली ट्रक मालक संघटना, डिचोली कामगार संघटना, आंदोलक शेतकरी व कंपनी व्यवस्थापनाशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकसानभरपाई घेण्यासाठी काही शेतकरी राजी आहेत, तर काहींजण राजी नाहीत. सर्वांनी खाणी सुरू करण्यासाठी कंपनीलाच नव्हे तर सरकारलाही मदत करावी. सरकार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
सारमानस, पिळगावच्या शेतकऱ्यांना बगल देत सरकार खाण कंपनीला खनिज वाहतुकीसाठी मुख्य सार्वजनिक रस्ता वापरण्यास देत असल्यास या विरोधात आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊ, असे अॅड. अजय प्रभूगावकर यांनी सांगितले.
मुख्य रस्त्यावरून मालवाहतूक करण्यास जर शेतकऱ्यांनी मज्जाव केला तर कामगार संघटनाही रस्त्यावर उतरणार, असा इशारा कामगार संघटनेचे आत्माराम तिळवे यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या खांद्यावर कंपनीतून कमी केलेल्या कामगारांनी बंदूक ठेऊन आपले मनसुबे साध्य करण्याचा प्रयत्न चालवला आहे. शेतकऱ्यांच्या आडून हे कामगार कंपनीविरुद्ध षडयंत्र रचून राग काढत आहेत, असे कामगार सिध्देश परब यांनी सांगितले.
मुख्य रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्याचा पर्याय सरकारसमोर आहे. हा रस्ता अडविण्याचा प्रयत्न झाल्यास खनिज वाहतूकदारही रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देणार, असा इशारा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष सतीश गावकर, सचिव सुभाष किनळकर यांनी दिला.
पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन मिटता मिटत नसून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून आमच्या मागण्यांचा प्रस्ताव आम्ही सरकार तसेच कंपनी व्यवस्थापनासमोर ठेवला आहे. आमच्या आंदोलनाला विरोध करण्याची अन्य कोणीही भाषा करू नये. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही खनिज वाहतूक करायला देणार नाही. हा आमचा निर्धार ठाम आहे, असे सुधाकर वायंगणकर, संजय फाळकर आणि पिळगावमधील अन्य शेतकऱ्यांनी रविवारी सायंकाळी पिळगाव येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. श्री महादेव मंदिरात घेतलेल्या या पत्रकार परिषदेस पंचवीसहून अधिक शेतकरी उपस्थित होते.
रविवारी सकाळी साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत आमच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघालेला नाही. कंपनीचा प्रस्तावही शेतकऱ्यांना मान्य नाही. असे असताना बहुसंख्य शेतकऱ्यांना प्रस्ताव मान्य असल्याचा जो दावा करण्यात येत आहे, तो दिशाभूल करणारा आहे. असे पुंडलिक परब गावकर यांनी सांगितले. तसेच ज्यांनी कोणी दावा केला आहे, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. असे आव्हान दिले.
पिळगाव जंक्शन ते सारमानसपर्यंतच्या सार्वजनिक रस्त्याने खनिज वाहतूक करण्यास परवानगी देण्याचा जर सरकार विचार करीत असल्यास हा निर्णय शेतकऱ्यांसह जनतेवर अन्यायकारक ठरणार आहे, असे परब गावकर म्हणाले. खनिज वाहतुकीमुळे एखादी वाईट घटना घडल्यास सरकार त्याची जबाबदारी स्वीकारणार काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.