खरी कुजबुज: मनोज उत्तर कर्नाटक संघर्ष सेनेच्‍या संपर्कात

Khari Kujbuj Political Satire: आरजीपीत असताना ‘घाटी घाटी’ म्‍हणत मनोज परब कायमच कर्नाटकसह गोव्‍यात स्‍थायिक झालेल्‍या परप्रांतीयांवर घसरत होते.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

भाटीकरांची किमया...

केतन भाटीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित शोकसभेला मोठा प्रतिसाद मिळाला. वास्तविक, एखाद्या आमदार किंवा मंत्र्यालाही लाभणार नाही, एवढी प्रचंड गर्दी केतन यांच्या अंत्यसंस्कारावेळी पाहायला मिळाली होती. अशाप्रकारे जनतेचे प्रेम आणि माया मिळणे फार दुर्मिळ असते. सत्तेवर असलेल्यांच्या मागे मोठा लवाजमा असतोच; मात्र सत्तेवर नसतानाही लोकांचे सहकार्य आणि प्रेम मिळवणे फार कठीण असते. ही किमया केतन भाटीकर यांनी साधली होती. त्यांनी प्रचंड लोकसंग्रह केला आणि तो त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहिला. ‘केतन जर आमदार किंवा मंत्री असते तर...!’ असेच शब्द आजही अनेकांच्या मनातून उमटत असतील.

आता लक्ष भाटीकरांच्या कार्यकर्त्यांकडे...

फोंड्यातील राजकीय वातावरण सध्या तापू लागले आहे. विधानसभा निवडणूक येत्या मार्चमध्ये होणार की त्याआधी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच जाहीर होणार, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. फोंड्याची पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष काहीसे हिरमुसले होते. मात्र आता पुन्हा एकदा प्रचाराचा श्रीगणेशा करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह काँग्रेससारख्या प्रमुख पक्षांनी आतापासूनच चाचपणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणूक पुढील वर्षी मार्चमध्ये होईल, अशी अटकळ बांधली जात असली तरी ती अचानक नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये जाहीर झाली, तर त्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. शिवाय कार्यकर्त्यांची जमवाजमव ही आलीच. अशा परिस्थितीत केतन भाटीकर यांचे समर्थक आणि कार्यकर्ते नेमके कुठे जाणार, हा खरा प्रश्न आहे. कारण तयार कार्यकर्त्यांची ही भक्कम फळी एखाद्या उमेदवाराच्या बाजूने गेली, तर ते त्याच्यासाठी ‘सोन्याहून पिवळे’ ठरणार, असेच संभाव्य उमेदवारांना वाटत असावे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: आमदार वीरेश बोरकर मांडणार भूमिका? पक्षातील अंतर्गत वाद आणि मनोज परब यांच्‍याबाबत काय बोलणार?

मानकुराद, नाटकांचं बंपर पीक

मानकुराद, घोंटां, कापे रसाळ फणस यांचे यंदा बंपर पीक आले आहे. कापे फणस तर २०-२५ किलोंचे येतात. मानकुराद झाडांना पानं दिसतच नाही. फक्त डवरलेले आंबे. असा मडेपीकाचा ऋतू कधीतरी येतो. आपल्या हातात निसर्गाचा रिमोट नसतो. असो. मानकुराद नुकतेच लुप्त होत मांगीलाल दिसत आहेत. यंदा घोंटांचं पीक अमाप असल्याने आंब्याचं साट (पोळी) निर्मिती भरपूर प्रमाणात चालू आहे. दरम्यान वर्षच उंदडतेचं आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. साहित्याचा असा ऋतू जरी कधीच आला नसला तरी यंदा कोंकणी नाटके विपुलतेने येतील, असा जाणकारांचा कयास आहे. अकादमीच्या नाट्य शिबिरातून तावून, सुलाखून, पिकून नवीन क्राफ्ट शिकलेले नाटककार नाटकं लिहू लागले आहेत. एकेकटा भरघोस नाटके लिहिण्याच्या पावित्र्यात जोष बाळगून आहे. बघू, ५१व्या स्पर्धेचे घोडामैदान जवळ आहे.

सूत्रसंचालकांची विशेषणबाजी

आरंभाला कदंब बस गावातून सुरू झाल्याप्रसंगी सोहळा असायचा. एका गांवातून सकाळी बस सुरू व्हायची होती. विधी झाले. सूत्रसंचालकाने मंत्र्यांना लोणी लावायला सुरूवात केली. मुख्य पाहुणे आदरणीय बबनरावजी साहेबजी, जे लोकप्रिय सेवाभावी आदर्श.... प्रत्यय, बिरूदं, उपाधी, विशेषणं यांची खैरात. एका कार्यक्रमात लोलेबाब मनोगत सादर करतील इतकंच वाक्य होतं. सूत्रसंचालकानं आवर्तन घेतलं. मनोज्ञ मर्मज्ञ मनोगत सादर करतील. या विशेषणांशिवाय मनोगत शब्द पोरका होतो का? पुच्चगुच्च देतो हे वाक्य हल्लीच मडगांवात ऐकलं. फुलं देत आहे, इतकं बस्स. प्रतिमेला माल्यार्पण करा अशी विनंती पाहुण्यांना करते, निवेदिकेनं म्हटलं. त्यांना काहीच बोध होईना. सायब, फोटोक हार घाल, म्हटल्यावर ते ताडकन उठले. शब्दबंबाळ बोलणं भारतीयांचं आवडीचं. सूत्रसंचालक, वक्ते हे नॅविगेट, नॅरेटीव, क्युरेट, कोंकणीत उत्फर्के, मराठीत कृतकृत्य, संपृक्त, व्यामिश्र, प्रदत्त असे शब्द वापरतातच. ऐकताना डोक्यावर घणाचा आघात झाल्यासारखं वाटतं.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: दिल्ली भेटीबाबत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांचे मौन

आयएएस परीक्षा व ‘गोंयकार’ युवक

युपीएससी परीक्षेला दर वर्षी देशात सुमारे दहा लाख उमेदवार बसतात. त्यातून अवघेच जण आयएएस, आयपीएस व आयएफएस होतात. इतरांना ‘अ ग्रेड’ च्या इतर सेवा मिळतात. गोव्याच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेविषयी मुळातच माहिती नाही. असल्यास त्यांना या परीक्षेविषयी विशेष स्वारस्य रूची नाही. दिल्लीत आयएएस प्रिलीम्स व नंतरची लेखी, तोंडी मुलाखत यासाठी कोचिंग देणाऱ्या खूप संस्था आहेत. एक प्रकारची ही संस्कृती बनली आहे. बिहार, युपी, महाराष्ट्र व इतर राज्यांतील विद्यार्थी तिथं राहून हे प्रशिक्षण घेतात. अभ्यास खूप असतो. खासकरून सामान्य ज्ञान पेपर सोपा नसतो. आपण निवडलेल्या दोन विषयांचे पेपर असतात. ऑनलाईन कोचिंग पण असते. लेखी पेपर लिहून स्कॅन करून पाठवल्यावर ते सुधारून मार्गदर्शन केले जाते. गोव्याचे उमेदवार बॅंक प्रोबेशनरी अधिकारी परीक्षेलाही बसत नाही. झेन झी पिढीला नेमकं काय करायचंय ते समजणं पालकांनाही जड जातंय.

भिकाऱ्यांचा ‘उद्योग’

गोव्याची स्थिती सध्या ‘आवो जावो, घर तुम्हारा’ अशी झाली आहे. भिकारी आणि स्थलांतरितांचे लोंढे, विशेषतः मडगावात, मोठ्या प्रमाणावर येताना दिसत आहेत. पहाटे येणाऱ्या रेल्वे आणि बसमधून या लोकांचे घोळके रस्त्यावर उतरलेले दिसतात. मडगावमधील बागा सध्या जणू त्यांचे दुसरे घर बनल्या आहेत. त्यांना तेथून हटवण्याचे प्रयत्न काही जणांकडून होत असले, तरी ते निष्फळ ठरत आहेत. ‘परत ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जुन्या बाजारातील बागही आता भिकारी आणि स्थलांतरितांनी व्यापली आहे. त्यात भर म्हणजे, दररोज सकाळी एक महिला जुना बाजार परिसरात स्थलांतरितांना रोकड वाटत असल्याचे दिसून येते. हे लोक तिची वाट पाहत बसलेले असतात. हातात पैसे पडताच ते जवळच्या बारमध्ये जातात आणि नंतर पुन्हा बागेत येऊन झोपतात. त्यामुळे या महिलेवर कोणी आवर घालणार का, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करू लागले आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'आरजी' निर्नायकी; वीरेशचे अद्याप मौन, पुढील सूत्रे कुणाच्‍या हाती? कार्यकर्ते संभ्रमात, नेतृत्वाबाबत गूढ वाढले

विकासकामांवरून जुंपते म्हणजे काय?

मडगाव नगरपालिका परिषदेची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांमध्ये गोवा फॉरवर्डतर्फे करण्यात येत असलेल्या विकासकामांवर आक्षेप घेतला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक रंगली. विशेष म्हणजे, गोवा फॉरवर्डच्या तिकिटावर निवडून येऊन नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका नगरसेवकाचाही यात समावेश होता. ज्या प्रभागातून गोवा फॉरवर्डचा उमेदवार निवडून आला, त्या भागात त्यांनी विकासकामे केली तर त्यात गैर काय, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. विकासकामे करण्यापासून कोणाला रोखता येते का, हाही मुद्दा चर्चेत आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन स्वतःचे वर्चस्व सिद्ध करणे, हे आता त्या नगरसेवकापुढील खरे आव्हान ठरणार आहे.

विदेश सायबाने घेतला ताबा

कोलवा पोलिस ठाण्यात आता विदेश शिरोडकर हे नवीन ‘पीआय’ आले आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या पदाचा ताबा घेतला. पूर्वी ते वाळपई पोलिस ठाण्यात होते. एक कर्तव्यदक्ष अधिकारी तसेच प्रसिद्धी पराडमुख म्हणून त्यांची पोलिस खात्यात ओळख आहे. कोलवा हे सासष्टी तालुक्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण पोलिस ठाणे आहे. येथे ‘पोस्टिंग’ साठी अनेक ‘सायब’ प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. कारणही तसेच असते. ते असो.. या पोलिस ठाण्यात इनचार्ज म्हणून काम करणेही तशी सोपी गोष्ट नाही. राजकारण्यांच्या कलेने वागावे लागते. ही कसरत करताना पूर्वीच्या अनेक साहेबांची दमछाक उडाली होती. आता विदेश सायबाचाही कस लागणार हे निश्चित. तूर्तास त्यांचे कोलवा पोलिस ठाण्यात ‘वेलकम’.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: आमदार वीरेश बोरकरने मनोजला दिले आव्हान! संस्थापक सदस्य, समित्य‍ांशी चर्चेअंतीच पुढील निर्णय

परबांचा राजीनामा

मनोज परब यांनी आरजीपीचा राजीनामा दिल्‍यानंतरही गप्‍प बसलेले आमदार वीरेश बोरकर सोमवारी प्रसिद्धी माध्‍यमांसमोर येणार आहेत. पक्षातील वादामुळे निराश झालेल्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण पुढील निर्णय घेणार असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले होते. त्‍यानुसार त्‍यांनी गेल्‍या काही दिवसांत ज्‍या गुप्‍त बैठका घेतल्‍या, त्‍यात बहुतांशी जणांनी त्‍यांना पक्ष स्‍वत:च्‍या ताब्‍यात घेण्‍याचा सल्ला दिलेला आहे. परब यांना हे आधीच माहीत होते. त्‍यामुळेच त्‍यांनी राजीनामा दिल्‍याची चर्चा पक्षात सुरू आहे. पण, वीरेशची भूमिका उद्या म्हणजे, सोमवारीच समजणार आहे.

मनोज उत्तर कर्नाटक संघर्ष सेनेच्‍या संपर्कात

रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स पक्षाच्‍या (आरजीपी) अध्‍यक्षपदासह संस्‍थापक सदस्‍यत्‍वाचाही राजीनामा दिल्‍यानंतर दुसऱ्याच दिवशी मनोज परब हुबळीला गेले आणि तिथे त्‍यांनी ‘उत्तर कर्नाटक संघर्ष सेना’ या संघटनेच्‍या काही नेत्‍यांची भेट घेतली. या संघटनेच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांशी परब यांची जवळीक आहे. त्‍यातूनच त्‍यांनी ही भेट घेतल्‍याचे बोलले जात

आहे. परंतु, आरजीपीत असताना ‘घाटी घाटी’ म्‍हणत मनोज परब कायमच कर्नाटकसह गोव्‍यात स्‍थायिक झालेल्‍या परप्रांतीयांवर घसरत होते. आता पक्ष सोडल्‍यानंतर त्‍यांचे परप्रांतीयांप्रतीचे प्रेम उफाळून आल्‍याच्‍या चर्चा ‘आरजीपी’ कार्यकर्त्यांत सुरू झाली आहेत. अर्थात, काय खरे, काय खोटे हे परबांनाच ठाऊक..

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: ‘आरजीपी’तील अंतर्गत वादाबाबत आमदार बोरकरांची अप्रत्यक्ष पुष्‍टी; आल्‍मेदांवर कारवाईवर चर्चा सुरु असल्‍याचेही केले स्‍पष्‍ट

महंगाई हाजीर हो...

पेट्रोलचे दर तीन वेळा वाढले... गॅस सिलिंडरनेही सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चटका दिला... भाजीपाला तर आधीच आवाक्याबाहेर गेला आहे. आता गोवा डेअरीने दुधाचे दरही दोन रुपयांनी वाढवले. त्यामुळे दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या किमती वाढणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या सर्व दरवाढींमागे युद्धाचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, निवडणुका होत्या, तेव्हाही जगात युद्ध सुरूच होते ना...? असा सवाल आता सामान्य माणूस करू लागला आहे. विशेष म्हणजे, विरोधकांना इतर अनेक विषय सापडतात; पण महागाईसारखा ज्वलंत विषय मात्र गोव्यातील विरोधकांच्या अजेंड्यावर दिसत नाही. कधी काळे कांद्याचे दर वाढले असताना पणजी मार्केटमध्ये दरवाढीचा निषेध करणाऱ्या विरोधकांनी या विषयावर आता शांत बसण्याचे ठरवले का?

रोहिंग्यांचा शोध घ्या

गोव्यातील बेरोजगारी, महागाई, पायाभूत सुविधांचे प्रश्न, पर्यटनातील गोंधळ, वाहतूक कोंडी, किनाऱ्यांची दुर्दशा...हे सगळं सोडून आता काही जणांना अचानक ‘रोहिंग्या शोध मोहीम’ आठवली आहे! गोव्यात घरभाडे परवडत नाही, स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत, रस्त्यांवर खड्डे आणि प्रकल्पांवर वाद आहेत; पण राजकारणाला मुद्दा हवा असतो आणि तोही असा की ज्यातून भीती जास्त आणि उत्तरं कमी मिळतात. ‘सर्व्हे करा, हाकलून द्या’ या घोषणा देणाऱ्यांनी आधी गोव्यात किती बेकायदा बांधकामे उभी राहिली, किती जमीन व्यवहार संशयास्पद झाले आणि किती स्थानिक युवक स्थलांतरित झाले याचाही कधी सर्वे केला आहे का? कारण वास्तव असं आहे की, सामान्य माणूस अजूनही पाणी, वीज, नोकरी आणि घरासाठी रांगेत उभा आहे आणि राजकारण मात्र ‘घुसखोर’ शोधण्यात व्यस्त आहे!

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: आरजीपीच्या दुभंगण्याची कारणमीमांसा

‘बाबां’ची सभा म्हणजे ‘हाऊसफुल्ल’

सध्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वाळपई मतदारसंघात जाहीर सभांचा सपाटा लावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध कामांमध्ये व्यस्त असलेले राणे आता खास वेळ काढून कार्यकर्ते आणि नागरिकांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत. वाळपई, नगरगाव, उसगाव, सावर्डे आणि त्यानंतर गुळेली

पंचायत क्षेत्रात झालेल्या त्यांच्या जाहीर सभांना मोठा प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, गुळेली येथील सभेला महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. ‘बाबांची सभा म्हणजे हाऊसफुल्ल’ हे समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले. सभास्थळी युवकांचा उत्साह, महिलांचा सहभाग आणि कार्यकर्त्यांची लगबग यामुळे वातावरण भारावून गेले होते. “युवा शक्ती आणि नारी शक्ती ही सत्तरीची खरी ताकद आहे. ऊर्जावान युवक आणि महिलांशी संवाद साधताना विकासामुळे सामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल कसे घडत आहेत, हे प्रत्यक्ष जाणवले. भाजपा कार्यकर्ते आणि जनसेवक म्हणून प्रत्येक घराचे जीवनमान अधिक सुलभ करण्यासाठी आणि विकास कायम लोकाभिमुख ठेवण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू,” असे राणे यांनी सांगितले. राणे यांच्या या विधानानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे चित्र दिसून आले. सभेला उपस्थित महिलांच्या डोळ्यांत राणेंबद्दलचा प्रेमभाव, विश्वास आणि आपलेपणा स्पष्टपणे जाणवत होता.

दामूंचा ‘सर्व्हे’

मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हे आता मुरब्बी राजकारणी बनले आहेत. आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात केलेल्या विकासकामांचा त्यांनी हल्लीच सर्व्हे करून घेतला व तो व्हॉटसअप ग्रुपवर शेयर करून, लोकांची मतेही जाणून घेतली. नगराध्यक्ष असल्याने बहुतांश जणांनी त्यांना खुश करीत ‘वेलडन’ असे सांगत दहा पैकी ८ ते ९ गुणही देऊन टाकले. त्यामुळे सध्या स्वारी खुश आहे. पालिका निवडणूक कधी होणार हे निश्चित झाले नसले तरी आपल्या प्रभाग २१ मधून निवडणूक लढविण्यास ते सज्ज झाले आहेत. नगरसेवक म्हणून पुन्हा विजयी होऊच, याबाबत त्यांना खात्री आहे. विजयी झाल्यानंतर पुन्हा एकदा नगराध्यक्ष खुर्चीवर बसण्याचा त्यांची इच्छा आहे. मडगावच्या बाबाचा भरभक्कम हात या पुढेही डोक्यावर कायम असल्यास ही मनोकामनाही पूर्ण होईल, याबाबत हे दामोदर पंत पूर्ण आशावादी आहेत बरे का. पुढे काय घडणार हे नंतर कळेलच म्हणा..!

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: "बापाला मुलांनी शिकवू नये!" मनोज परब यांच्या 'पोस्ट'ने पक्षात खळबळ; ‘आरजी’तील मतभेद चव्‍हाट्यावर!

प्रदूषण मापन होणार कसे?

‘प्रदूषण नियमांच्या चौकटीतच कोळसा हाताळणी सुरू आहे,’ असे बंदर प्रशासन सांगते...आणि दुसरीकडे, वास्कोकर सकाळी गाड्यांवर बसलेली काळी धूळ पुसत दिवसाची सुरुवात करतात! ती मोजण्याची यंत्रणास चोरीला गेल्याने सर्वकाही आबादीआबाद आहे. कागदावरचे प्रदूषण नियंत्रण आणि प्रत्यक्षात फुफ्फुसात जाणारी धूळ यांच्यातला फरक बहुतेक सामान्य नागरिकांनाच जास्त जाणवतो. अहवाल म्हणतो ‘सर्व काही नियमांत,’ पण लोक विचारतात मग खिडक्या बंद ठेवूनही घरात येणारी काळी पावडर कोणत्या नियमांत बसते? गोव्यात कोळसा हाताळणीवर प्रश्न उपस्थित झाले की उत्तर नेहमी तयार असते ‘मानके पाळली जात आहेत.’ इतकी मानके पाळली जात असतील, तर नागरिकांना मास्क आणि धूळ दोन्हींची सवय का झाली आहे? शेवटी गोष्ट इतकीच, कागदावरील हवा स्वच्छ असू शकते, पण माणूस अजूनही प्रत्यक्ष हवा श्वासातूनच घेतो, फाईलमधून नाही!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com