गेल्या चार-पाच दिवसांपासून कहर केलेल्या पावसाने काल रात्रीपासून अक्षरशः रौद्रावतार धारण केला. आज (रविवारी) तर ''कोसळ''धार पावसाने डिचोलीत सर्वत्र धुमाकूळ घातला. ''कोसळधार'' पावसामुळे डिचोलीत सर्वत्र हाहाकार उडून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नदीनाले तुडुंब भरले असून, नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे.
पिळगाव येथील बागवाडासह काही भागात पाणी घरात घुसले. सर्वण येथील सरकारी शाळेसह डिचोली येथील सेतू संगम प्रकल्पातही पाणी घुसले. बहुतेक रस्तेही पाण्याखाली गेले.
जोरदार पावसामुळे बागवाडा-पिळगाव येथे काही घरांनी पाणी घुसले. बागवाडा येथे धर्मेंद्र सावंत यांच्या गोठ्यात पाणी घुसल्याने गुरे गोठ्यात अडकून पडली. सर्वण येथील सरकारी शाळेसह डिचोलीतील ''सेतू संगम'' प्रकल्पातही पाणी घुसले.
नानोडा येथे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरून मोटारगाडी हाकण्याचा प्रयत्न केला असता, ही मोटारगाडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून पुढे गेली आणि अडकून पडली. तेथील काही दुकानांतही पाणी घुसले. अडवलपाल येथे नव्यानेच बांधलेला पूलही पाण्याखाली गेल्याने धनगरवाड्यावरील जनतेचा संपर्क तुटला. रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडले.
डिचोलीसह अस्नोडा येथील पार नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. नद्या तुडुंब भरल्याने आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि जलस्रोत खाते सजग झाले आहे. डिचोलीत नदीकाठी तुंबलेले पाणी पंपिंगद्वारे नदीत सोडणे सुरु करण्यात आले आहे. आपत्कालीन यंत्रणेसह जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंते आदी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
डिचोलीत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. शापोरा नदी नियंत्रणात असल्याने तूर्त तरी नदीकाठच्या गावांना पुराचा धोका नाही. आपत्कालीन यंत्रणा आणि जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली.
कालपासून जोरदार पर्जनवृष्टी सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागलेत. रविवारी अनेक ठिकाणे पडझड झाली. घरांच्या भिंती कोसळल्या, वाहने वाहून गेली आणि रस्ते, पूलही पाण्याखाली गेले. फोंडा, जुने गोवे, वास्को, डिचोली, सत्तरी, कासारवर्णे, मालपे,चांदेल, हसापूर, बार्देशात जनजीवन विस्कळीत झाले. डिचोली-सर्वणमध्ये शाळेतही पाणी घुसले, केपे-पारोड्यात पूलही पाण्याखाली गेल्याने ये-जाही थांबली होती. साखळी, डिचोलीत पूरनियंत्रणासाठी पाणी बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे. एकूणच राज्यात ‘कोसळधार’मुळे रविवार असूनही जनजीवनावर परिणाम झाला!
नानोडा येथे एक मोटारगाडी पाण्यात अडकली तर अडवलपाल येथे नव्यानेच बांधलेला पूल पाण्याखाली गेल्याने धनगरवाड्यावरील जनतेचा संपर्क तुटला आहे. बंदरवाडा-डिचोली रस्ताही पाण्याखाली गेला. आजच्या पावसामुळे विविध ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तरीसुद्धा वित्तहानी वगळता अन्य कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने भयभीत झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.