Goa Politics: खरी कुजबुज; छत्रपतींना आगळी वेगळी मानवंदना!

Khari Kujbuj Political Satire: श्री ‘लईराई’ देवीच्या जत्रोत्सवातील ''चेंगराचेंगरी''ने प्रशासनासह संबंधित घटकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडले आहे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

छत्रपतींना आगळी वेगळी मानवंदना!

युग पुरुषांचे महात्म्य आजच्या युवा पिढीला व शालेय विद्यार्थ्यांना कळायला हवे तर नुसत्या मिरवणुका काढून झेंडे फडकावून व घोषणा देऊन भागणार नाही. त्यासाठी युग पुरुषांचे कर्तव्य विद्यार्थ्यांपुढे उभे करायला हवे त्यांच्या जीवनमूल्यांची व शौर्याची शिकवण शालेय विद्यार्थ्यांना द्यायला हवी. याच उद्देशाने अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व मूल्ये या विषयावर अखिल गोवा पातळीवर कथाकथन व कविता स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांपुढे शिवशाही उभी करण्याचा स्तुत्य उपक्रम केला याला उदंड प्रतिसाद लाभल्याचे कळते. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असतानाही सुमारे चाळीस विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेऊन छत्रपतींचा पूर्ण इतिहास कथेतून व कवितेतून व्यक्त केला. शिवप्रेमी म्हणायला लागले आहेत, वालोर तुमका मराठवांक! ∙∙∙

दुर्घटनेतून बोध..!

श्री ‘लईराई’ देवीच्या जत्रोत्सवातील ''चेंगराचेंगरी''ने प्रशासनासह संबंधित घटकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडले आहे. आता तर या दुर्घटनेपासून देवस्थान समितीने बोध घेतलाय. श्री लईराई देवीच्या धोंड भक्तगणांच्या आता नोंदणीचा निर्णय घेतला आहे. देवस्थानच्या या निर्णयाला सर्व धोंडभक्तांनी सहकार्य केले, तर आतापर्यंत नक्की माहीत नसलेली धोंड भक्तांची नेमकी आकडेवारी कळणे सोपे होईल. धोंड भक्तांची नोंदणी करतानाच भविष्यात चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी देवस्थान समितीने कडक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. पुढील वर्षी जत्रेची वाट न पाहता, आतापासूनच तयारीला लागल्यास बरे!. ∙∙∙

अहवाल कधी होणार उघड?

शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीचे खापर उत्तर गोव्यातील जिल्हाधिकारी व अधीक्षकावर फोडण्यात येऊन त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्याचबरोबर त्या परिसराचा ताबा असलेल्या उपअधीक्षक व निरीक्षक यांनाही बदलण्यात आले. या जत्रोत्सवावेळी तेथील संबंधित उपजिल्हाधिकारी तसेच मामलेदार हेही तितकेच जबाबदार आहेत, मात्र त्यांना झुकते माप देण्यात आले. या घटनेला देवस्थानची समितीही सुद्धा तेवढीच जबाबदार आहे. या घटनेचा चौकशी अहवाल आयएएस अधिकारी संदीप जॅकीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर तो मीडियासमोर उघड केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र दोन दिवस उलटून गेले तर अजूनही तो उघड केला नसल्याने सरकार कोणती भूमिका घेते व कोणाला बळीचा बकरा बनवते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. पोलिसांना दोषी धरल्यास हे प्रकरण मुख्यमंत्र्यांवरच शेकेल व विरोधकांना आरोप करण्यास रान मोकळे होईल. कारण मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री या चौकशी अहवालाची माहिती उघड करण्यास वेळ घेत नाहीत ना? ∙∙∙

लाचखोराच्या उलट्या बोंबा!

रेल्वे पोलिस स्थानकातील निरीक्षक सुनील गुडलर व कॉन्स्टेबल हुसेन हरिहर याच्याविरुद्ध लाचप्रकरणीचा गुन्हा लुचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केला आहे. मात्र जेव्हा विभागाच्या पथकाने छापा टाकला तेव्हा निरीक्षक पोलिस स्थानकात नव्हता तर तो गस्तीवर गेला होता. स्थानकात फक्त कॉन्स्टेबल हुसेन होता त्यानेच लाच स्वीकारली व निरीक्षकाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवल्याचा कांगावा जामिनावेळी गुडलर याने केला आहे. या लाचप्रकरणाला कॉन्स्टेबल हुसेन हा पूर्णपणे जबाबदार आहे, अशी बाजू मांडत स्वतःला निर्दोष ठरवण्याचा आटापिटा सुरू केला आहे. ज्याच्याकडे लाच मागितली गेली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करता निरीक्षकाने हे प्रकरण का ताटकळत ठेवले, हे स्पष्ट केलेले नाही. कॉन्स्टेबल हुसेनला पोलिस स्थानकात ठेवून त्याला लाच घेण्यास लावली, मात्र स्वतः गस्तीवर जाऊन नामानिराळा झाला. सीसीटीव्ही कॅमेरा लाच स्वीकारताना कसे बंद झाले व कोणी ते केले हे निरीक्षकलाचा माहीत असणार. कारण त्याचा कंट्रोल त्याच्याच केबिनमध्ये असतो. उलट निरीक्षकाने सीसी टीव्ही कॅमेऱ्याची माहिती सुरक्षित ठेवण्याची मागणी न्यायालयाला केली आहे, म्हणजेच लाचखोराच्या उलट्या बोंबा! ∙∙∙

Goa Flights
Goa Flights Dainik Gomantak

एकमेकांवर कुरघोडी सुरू

सध्या गोव्यात प्रस्थापित व उभरत्या राजकारण्यांच्या हालचाली पाहिल्या तर निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचा अंदाज आल्याशिवाय रहात नाही. वेगवेगळ्या प्रकारे लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच असतात. मडगावात या दिवसात पुट्टपर्थी साईबाबांची रथयात्रा सुरु आहे. मडगावातील प्रत्येक मंदिरात या रथयात्रेचा प्रचार व प्रवास सुरू आहे. शुक्रवारी हा रथ विठ्ठल मंदिरात आला व एका उभरत्या युवा राजकारण्याला सर्वप्रथम आरती सेवा प्राप्त झाली. तिथे प्रस्थापित राजकारण्याचे शिलेदर उपस्थित होते. त्यांनी वेळ न दडवता प्रस्थापित राजकारण्याला याची माहिती दिली. काही क्षणातच प्रस्थापित राजकारणी आपल्या लवाजम्यासह तिथे उपस्थित झाले. कुणी कुठे रथयात्रेचे दर्शन घ्यावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ही घटना तेथील उपस्थितांत चर्चेचा विषय मात्र ठरली. उभरत्या राजकारण्याला जास्त श्रेय मिळाले तर! असा विचार करून कदाचित प्रस्थापित राजकारण्याने तिथे उपस्थिती लावली असावी, अशी चर्चा सुरू झाली. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; सायबाच्‍या ओल्‍या पार्टीची गोष्‍ट

विरियातोंचे देव दर्शन!

दक्षिण गोव्यातून खासदार म्हणून निवडून आलेल्या विरियातो फर्नांडिस यांनी सध्या देवतांचे दर्शनावर भर दिला आहे. प्राप्त माहितीनुसार लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी देवदर्शनाच्यावेळी निवडून येण्याची मनोकामना केली, ती फलदायी ठरल्याने आता ते देवदर्शन घेताहेत. कदाचित निवडून आल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन, असा नवस मनातून त्यांनी केला असावा, त्यामुळेच त्यांनी विविध ठिकाणच्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारात जे-जे होते, त्यांना त्यांनी त्यासाठी बोलावूनही घेतले. त्यात ‘आप’चे ॲड. सुरेल तिळवे होते. ‘आप’ आणि काँग्रेसमध्ये सध्या काही अंतर आलेय, पण लोकसभेला ‘आप’नेच काँग्रेसचा अधिक प्रचार केला होता. विरियातोंनी या दिवसांत कवळेतील शांतादुर्गा मंदिर, भगवान वेताळ मंदीर आणि मडकईकतील देवी नवदुर्गा मंदिराला भेट दिली. सोबत दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साव्हियो डिसिल्वा, सरचिटणीस, गोवा काँग्रेस प्रभारी मनीषा उसगावकर याही होत्या. असो येत्या काही दिवसांत विरियातोंचे असे देवदर्शनाचे दौरे होत राहतील, असे दिसते. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; 25 कोटी मोडून तरी 'कला अकादमी' नीट होईल?

मंत्रिमंडळ फेरबदलास चालना ?

गेल्या एका वर्षापासून गोव्यातील मंत्रिमंडळात बदल होणार, अशी वदंता आहे. पण हा बदल या ना त्या कारणाने पुढे ढकलला जात आहे. त्यामुळे इच्छुकांच्या पदरात दर वेळी निराशाच पडलेली दिसते. चतुर्थी झाली, दिवाळी झाली, महाराष्ट्रातील निवडणुका झाल्या, नववर्ष संपले, गोव्याला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला. मागे तर १५ दिवसांत मंत्रिमंडळ बदल होणार, असे बोलले जात होते. नंतर संसदेचे अधिवेशन आडवे आले. आता तर युद्धही झाले. आता ‘सिझफायर’ होताच मंत्रिमंडळ बदलाला चालना मिळेल, असे संकेत इच्छुकांच्या कार्यकर्त्यांतून द्यायला सुरवात झाली आहे. काय हे इच्छुक? स्वार्थासाठी स्थितीचे गांभीर्यही त्यांना ओळखता येत नाही का, अशी विचारणा होऊ लागलीय. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com