Goa Politics: खरी कुजबुज; सायबाच्‍या ओल्‍या पार्टीची गोष्‍ट

Khari Kujbuj Political Satire: गोव्यांत गेल्या काही दिवसांपासून टॅक्सीवाल्यांकडून होत असलेल्या अतिरेकांची प्रकरणे समाजमाध्यमांवरून व्हायरल होत आहेत.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

सायबाच्‍या ओल्‍या पार्टीची गोष्‍ट

केपे परिसरातील एका पोलिस अधिकाऱ्याने आयोजित केलेली एक ओली पार्टी सध्‍या चर्चेचा विषय बनली असून या पार्टीच्‍या गोष्‍टी पोलिसांत अगदी सूरसपणे चघळल्‍या जाताहेत. केपेपासून जवळच असलेल्‍या शिरवई येथील एका स्‍विमिंग पूल असलेल्‍या फार्ममध्‍ये या पार्टीचे आयोजन केले होते. आणि या पार्टीला मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्‍थित होते, असे सांगितले जातेय. असे म्‍हणतात, की हाऊजींचे आयोजन करण्‍यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली असतानाही केपे परिसरात या हाऊजींचे आयोजन करण्‍यात आले होते. या हाऊजींना राखण दिली गेल्‍यामुळेच हाऊजी आयोजकांनीच या पार्टीचे आयोजन केले होते, असे सांगण्‍यात येते बुवा! ∙∙∙

टॅक्सीवाल्यांची मस्ती

गोव्यांत गेल्या काही दिवसांपासून टॅक्सीवाल्यांकडून होत असलेल्या अतिरेकांची प्रकरणे समाजमाध्यमांवरून व्हायरल होत आहेत. पूर्वी हा वाद काळे पिवळे टॅक्सीवाले व पर्यटक टॅक्सीवाले तसेच भाडी मारणारे खासगी वाहनवाले यांच्यात होत होता तर आता तो पर्यटक टॅक्सीवाले व रेंट अ कॅबवाले यांच्यात होऊं लागला आहे. मात्र या वादात बिचारा पर्यटक भरडला जाऊ लागला आहे. परवा सोमवारी असाच एक वाद रेंट अ कॅबवाला व खासगी टॅक्सीचालक यांच्यात बांबोळीत मुख्य रस्त्यावर झाला व त्यात विमानतळावर निघालेल्या पर्यटक महिलेला विनाकारण मनस्ताप भोगावा लागला. पुढील गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुस-या वाहनाला धडक बसली व त्यांतून हा वाद म्हणे झाला. त्यांत बिचा-या पर्यटक महिलेला विमान चुकते की काय अशी भिती वाटूं लागली व ती गयावया करत होती. टॅक्सीवाल्यांच्या अशा या वर्तनातून पर्यटकांना नको तो गोवा असे वाटले तर नवल काय. ∙∙∙

अन्य दुकाने कशाला?

शिरगावमधील दुर्दैवी दुर्घटनेने तेथेच केवळ नव्हे तर अशा जत्रा वा फेस्तांत भरणा-या फेरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. अशा फेरी या पूर्वी जत्रा-फेस्तासाठी लागणा-या व लोकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरत्याच मर्यादित असायच्या पण आता त्यांचे स्वरुप पार बदलून गेले असून अनावश्यक वस्तुंच्या स्टॅालची संख्याच जास्त असते. फेरीतून भलत्याच मंडळींची चांदी होते असे आरोप समाजमाध्यमांवरून होत आहेत. काहींनी तर देवस्थाने, चर्च संस्था व संबंधित पालिका-पंचायतींनी स्टॅालच्या संख्येवर मर्यादा आणावीच पण उत्सव व फेस्त यांच्याशी संबंधित वस्तुंचेच ते स्टॅाल असावेत अशी अट घालावी असे सुचविले आहे. पूर्वी अन्य वस्तू मिळत नव्हत्या पण आता गावागावांत मोठी दुकाने झालेली असल्याने जत्रा-फेस्तांत पुन्हा अशा दुकानांची गरज ती काय अशी विचारणाही होत आहे. ∙∙∙

वाहत्‍या गंगेत...

श्री लईराई देवीच्‍या जत्रोत्‍सवात यंदा जे अघटित घडले, त्‍यामुळे सारा गोवा हादरला. त्‍यासाठी दोषी कोण, याचा शोध घेतला जात आहे. पोलिस व प्रशासकीय यंत्रणेवर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच देवस्‍थानच्‍या एका माजी अध्‍यक्षाने मात्र काही वाहिन्‍यांशी बोलताना विद्यमान समिती किती कुचकामी आहे, याचा पाढा वाचत सरकारी यंत्रणेवर स्‍तुतिसुमने उधळली आहेत. राज्‍य महोत्‍सवाचा दर्जा मिळूनही पायाभूत सुविधांसाठी नव्‍या समितीने सरकारकडे पाठपुरावा केला नाही, असे त्‍यांचे म्‍हणणे. इतकेच नाही तर राज्‍य सरकारला मंदिर व्‍यवहारात जराही रस नाही, असे त्‍यांनी छातीठोकपणे सांगितले. राज्‍य महोत्‍सवाच्‍या घोषणेनंतर खुद्द राज्‍य सरकारने कोणतीही स्‍पष्‍टता दिली नसताना माजी अध्‍यक्ष मात्र सरकारचे जणू प्रवक्‍ते असल्‍यासारखे बोलत होते. त्‍यांच्‍याच कार्यकाळात एका महिलेचा चेंगरून मृत्‍यू होऊनही त्‍यांनी नियोजनासंदर्भात आपली पाठ थोपटून घेतली. विशेष म्‍हणजे, या माजी अध्‍यक्षांची मुलाखत घेण्‍यास चढाओढ सुरू होती. यालाच म्‍हणतात, वाहत्‍या गंगेत हात धुऊन घेणे! ∙∙∙

‘मॉक ड्रिल’ म्हणजे काय रे भाऊ?

केंद्र सरकारने देशभरात प्रभावी नागरी संरक्षण मॉक ड्रिलचे निर्देश दिल्यानंतर राज्यात यासंदर्भात अनेकांच्या तोंडी त्याची चर्चा होती. भारत व पाकिस्तान युद्ध होणार, असा त्यातून काहीजण निष्कर्ष काढताना दिसत होते. मॉक ड्रिल म्हणजे नेमके काय याचा उत्कंठा अनेकांना लागून राहिली आहे. त्यावेळी काय होईल व कशाप्रकारे होईल याबाबत युवा पिढीलाही उत्सुकता असल्याचे दिसून आले. सागर कवच सराव होतो त्याच धर्तीवर हा एकप्रकारचा सराव असून तो मात्र युद्ध झाल्यास लोकांनी कोणती सावधगिरी बाळगावी, याची ही एकप्रकारची माहिती देणारी तालीम असणार आहे. युद्ध जवळ पोहचले आहे की काय, या काळजीने काही मात्र चिंतेतही दिसले. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; पाकिस्तानी झेंडे कोणी रंगविले?

आगीचा डोंब अन् पंचायतीची कसोटी

ताळगावच्या शेतातील गवताला आगी कोण लावतात, हे ताळगावातील शेतकऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे. सोमवारी आग लावल्यानंतर की लागल्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत जो प्रकार ताळगावातील लोकांनी अनुभवला किंवा पाहिला, तो भयानकच होता. शेतातील गवत सुकलेले नसताना हिरवे गवतही त्या आगीत जळत राहिले कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे जी हवा वाहत होती, त्यामुळे त्याला आपोआप हवाच मिळाली. गतवर्षी ताळगावातील पडीक शेतीतील गवताला आग लागते. अग्निशामक दलाचे जवान येतात आणि आग विझवतात, हे रस्त्याच्या बाजूच्या दोन-तीन सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या फ्लॅटमधील नागरिकांना माहीत आहे. शेतात सुकलेले गवत कापून काढण्यापेक्षा ते पेटवणे काही शेतकरी अधिक उचित समजतात. कालची घटना भयानक असल्याने पोलिसांनाही त्या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करावा लागला. हे झाले सोपस्कार, पण आता कसोटी आहे, ती पंचायतीची. कारण पंचायत सोमवारीची आगीची घटना किती गांभिर्याने घेतेय, त्यावरच पुढील उपाय समोर येतील. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; पोलिस नेमके काय करीत होते?

दिव्याखाली अंधार!

मुरगाव पालिका मंडळाची बैठक मंगळवारी झाली. बैठकीत नगरसेवक लिओ रॉडिग्ज यांनी पालिका इमारत व परिसर अगोदर स्वच्छ ठेवा. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेच्याच परिषद हॉलमध्ये घाण साचली आहे, असे त्यांना नगराध्यक्षांना सांगावे लागले. घाणीमुळे आमच्या ‘लंग्स’ला धोका निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी अस्वच्छेतेवर नेमके बोट ठेवले. इमारतीचे नूतनीकरण झाले, तरी स्वच्छता मात्र दिसत नाही. निदान आठवड्यातून दोनदा तरी पालिका इमारत व कार्यालयांची स्वच्छता करा, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली. या नगरसेवकाचा एक प्रश्न संपत नाही, तोवर दुसरा प्रश्न निर्माण झाला. बोलता बोलता वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे उष्म्याने नगरसेवक, नगरसेविकाही हैराण झाल्या. काहीजण कागदाने वारा घालत होते. पंधरा कोटी खर्चून नूतनीकरण केलेल्या या पालिका इमारतीत ‘दिव्याखाली अंधार’च दिसत होता. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com