
कला अकादमीचा वापर नाटकांसह ‘इफ्फी’ काळात चित्रपटही सादरीकरणासाठी होतो. कदाचित त्याचा विचार करून संबंधित सल्लागारांनी नाटक आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून नाट्यगृहाची रचना केली, असे अहवालात म्हटले आहे. मुख्यमंत्री त्यावर काय निर्णय घ्यायचा तो घेतील. परंतु आता ६० कोटी मोडूनही अकादमी व्यवस्थित होत नसेल, तर आणखी २५ कोटी मोडून ती सुस्थितीत येईल, याची हमी आणि खात्री कोण देणार आहेत. २५ कोटी रुपये ही रक्क्म सरकार देणार असले तरी कोणी स्वतःच्या खिशातील देणार नाहीत, तर तो जनतेच्या विविध करातून आलेला पैसा आहे. त्यामुळे आणखी खर्चासाठी रक्कम मागणाऱ्यांनी अनेक गणिते केलेली असणार आहेत, त्यातून आपल्या खिशात किती लक्ष्मी येणार याचाही विचार असणारच. त्यामुळे आता सरकारने कंत्राटदारांकडूनच त्यांना दिलेल्या रकमेतून अकादमीच्या सभागृहाची दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा त्यांची देय रक्कम असेल तर त्यातून ती करून घ्यावी. २५ कोटी खर्च होणारी रक्कम दोना पावला येथील प्रस्तावित बहुउद्देशीय इमारतीसाठी वापरल्यास तो तरी प्रकल्प मार्गी लागेल, नाही का? ∙∙∙
शिरगाव येथील चेंगराचेंगरीत ६ जण दगावले. त्यानंतर सरकारने नेमलेल्या सत्य शोधन समितीचा अहवाल गुरुवारी मिळूनही दोन दिवस सरकारने तो दडपल्याने संशय व्यक्त केला जात आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे संतोषकुमार सावंत यांनी १० दिवसांनंतरही हा अहवाल सरकार का जाहीर करत नाही याविषयी प्रश्न विचारला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळू लागले आहे. स्थानिक पातळीवर आधीच आरोप प्रत्यारोप झाले आहेत. त्यामुळे सरकारला या अहवालातून परिस्थिती आणखीन चिघळणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. यामुळेच अहवालातील सत्य सर्वांसमोर आहे तसे न येण्याची काळजी सरकारी पातळीवर घेतली जात आहे. ∙∙∙
मडगाव शहरात भूमिगत वीज केबल टाकल्यास नाही म्हटले तरी वीस-बावीस वर्षे होऊन गेली. त्यावेळी सर्व शहरांतील पथदीपांसाठी नवे अर्धगोल आकाराचे लोखंडी खांब घातले गेले. त्यासाठी म्हणे खास निविदाही काढल्या गेल्या. त्यासाठी अटी काय होत्या ते कोणालाच माहीत नाही, पण नवलाची गोष्ट म्हणजे हे खांबे आता खालील भागात गंजून कोसळू लागले आहेत. त्यामुळे अनेक भागांत पुन्हा नवे खांब उभे केले जात आहेत. आके वीज खाते कार्यालय परिसरातील असे अनेक खांब बदलले गेले आहेत. त्यामुळे या खांबांचे आयुर्मान किती असे प्रश्न लोक करू लागले आहेत. सौंदर्यीकरणासाठी केलेली कामे जर अशी अल्पकाळात कोसळू लागली, तर त्याचा उपयोग काय. कारण अनेक भागात पन्नास वर्षांपूर्वीचे खांब अजून उभे आहेत, मग यांनी अकाली पलटी खाल्ली ती त्यावर ओढलेल्या केबलमुळे तर नव्हे ना हा मुद्दा येतोच. ∙∙∙
भारत-पाकिस्तानमध्ये आरपारची लढाई होणार, असे वातावरण मागील तीन दिवसांत निर्माण झाले होते. या दिवसांत भारताने पाकिस्तानवर केलेली ड्रोनची कारवाई असो वा पाकिस्तानमधील क्षेपणास्त्रांचा मारा असफल ठरवण्याची बाब असो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातूनही दहशतवाद्यांना उद्देशून केलेल्या भाषणाची आठवण शनिवारी युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर अनेकांना झाली असेल. युद्धबंदी करण्यात आल्याचे परराष्ट्र खात्याच्या सचिवांनी जाहीर केल्यानंतर काँग्रेसला आयतीच संधी मिळाली. गोव्यातही काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय झाले आणि त्यांनी तत्काळ इंदिरा गांधींचे छायाचित्र टाकत पोस्ट करण्यास सुरवात केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी इंदिरा गांधींच्या छायाचित्राचा वापर करीत त्या एक ‘आयर्न लेडी’ होत्या, कोणीही इंदिरा गांधी होऊ शकत नाही. त्यांच्यात ध्येय, विश्वास आणि सामर्थ्य होते. आता ही पोष्ट का आणि कशासाठी ट्विट केली, हे सांगायला नको. ‘समझनेवाले को इशारा काफी होता है’, एवढेच सांगावे लागेल. इंदिरा गांधींच्या काळात पाकिस्तानबरोबर जे युद्ध झाले त्यात पाकची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केली. कारण शनिवारी युद्धबंदीची घोषणा झाल्याचे जाहीर करणाऱ्या सचिवांच्या पत्रकार परिषदेच्या थेट प्रक्षेपणावर समाज माध्यमांत ज्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत, त्या बोलक्या आणि सरकारवर टीका करणाऱ्या ठरल्या आहेत. ∙∙∙
किनारी भागात विजेची चोरी होते हे लोकांना माहीतच आहे आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वीज विभाग खूप प्रयत्न करतात. आता असाच एक प्रयत्न करताना विजेची चोरी करताना एक सापडला, पण त्याच्याविरोधात म्हणे तक्रार झालीच नाही. आता स्थानिकांमध्ये चर्चा आहे की, तक्रार झाली, पण कारवाई होत नाही. आता जर तक्रार दाबली तर कोणी वीज चोरली त्याला शिक्षा काय झाली? हे जाणून घेण्यास लोक इच्छुक आहेत, पण कारवाई मात्र पुढे सरकत नाही असे लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙
कॉंग्रेसने यात्रा काढली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने मतदारसंघवार यात्रांचे आयोजन केले. यात्रा काढून त्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर अपलोड होतात न होतात तोच दिल्लीत शस्त्रसंधीची घोषणा झाली. यामुळे उत्साहावर विरजण पडले आहे. रविवारी नियोजित केलेल्या यात्रा काढाव्यात की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. सेना दलांचा उत्साह वाढवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या यात्रा आणि शस्त्रसंधीचा संबंध नाही असा अर्थ काढण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसने एक यात्रा काढली तरी भाजपच्या आणखीन चार पाच यात्रा राज्यात निघू शकतील. ∙∙∙
कांदोळीतील एका दुकानांत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, त्यामुळे खरे तर संबंधित यंत्रणांचे डोळे उघडायला हवेत व त्यांनी असे प्रकारांना आळाबंद करण्यासाठी पावले उचलायला हवीत, पण तसे होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे बोलले जात आहे. कारण संबंधितांना हाताशी धरूनच म्हणे हा वापर होतो. राज्याच्या बहुतेक भागांत रस्त्याच्या कडेला व लोकांची गर्दी असते अशा ठिकाणी खाद्य वस्तू तयार करून देण्याचा व्यवसाय तेजीत असल्याचे आढळून येते. त्या ठिकाणी हे पदार्थ तयार करून वा तळून देण्यासाठी ज्या सिलिंडरचा वापर होतो ते गॅस सिलिंडर घरगुती वापराचेच असतात, पण ते कोणाला दिसू नये म्हणून त्यावर कपडा टाकलेला वा गुंडाळलेला असतो. पण ते संबंधित यंत्रणेला सांगणार कोण? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.