

मडगाव: कुडचडे येथे भर बाजारात ज्येष्ठ वकिलांचे वाहन अडवून शिवीगाळ आणि हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांचे पुत्र राहुल फळदेसाई यांच्यावर करण्यात आला आहे.
याप्रकरणी कुडचडे येथील ज्येष्ठ वकील ॲड. शांताराम (वल्लभ) कुडचडकर यांनी सोमवारी कुडचडे पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, या तक्रारीवर अद्याप ‘एफआयआर’ दाखल करण्यात आलेला नाही. घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
कुडचडेचे पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांना विचारले असता, ‘आमची प्राथमिक चौकशी सुरू आहे. पण अजून एफआयआर नोंद झालेली नाही,’ असे त्यांनी सांगितले. एकूणच, पोलिस एफआयआर नोंदविण्यास टाळाटाळ करत असल्याची भावना लोकांमध्ये तयार झाली असून, पोलिसांच्या या भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास कुडचडे येथे घडली.
ॲड. कुडचडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते सुनेसह कारमधून जात असताना शिवाजी चौकाजवळ आमदारपुत्र राहुल चालवित असलेली जीए-०७-पी-४४९९ क्रमांकाची एसयूव्ही रस्त्यात उभी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कारसह अन्य वाहनेही अडकली. त्यांच्या सुनेने हॉर्न वाजविल्यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ॲड. कुडचडकर स्वतः वाहनाबाहेर येऊन रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. त्यावेळी संबंधित व्यक्तीने हातवारे करत वाहन पुढे नेले. मात्र, त्यानंतर त्याने पुन्हा त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. त्याच्या हातात सळीसारखी वस्तूही होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आंबेडकर सर्कलजवळ ॲड. कुडचडकर यांनी वाहन थांबविल्यानंतर संबंधित व्यक्तीने वाहनाबाहेर येऊन त्यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी कारमध्ये लहान मुलेही होती. त्यामुळे हा प्रकार आपल्यासाठी अत्यंत भीतीदायक होता, असे ॲड. कुडचडकर यांनी सांगितले.
पोलिसांकडून चौकशी सुरू
या प्रकरणी कुडचडे पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्याशी संपर्क साधला असता, तक्रार प्राप्त झाली असून त्यावर चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तीन दिवस उलटूनही कारवाई का नाही; काँग्रेस नेत्यांचा सवाल
केपे (प्रतिनिधी) : कुडचडेतील घटना घडून तीन दिवस उलटले असतानाही आमदारपुत्रावर कारवाई का झालेली नाही, असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी सोमवारी कुडचडेचे पोलिस निरीक्षक मेलसन कुलासो यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संबंधित व्यक्ती भाजपच्या आमदाराचा पुत्र असल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप होडरकर यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले असतानाही पोलिसांकडून अद्याप ठोस हालचाल झालेली नाही, असा दावाही त्यांनी केला.
राहुल सराईत गुन्हेगार, वैद्यकीय चाचणी करा
कुडचडे रोड-रेज प्रकरणातील संशयित आमदार राजेश फळदेसाई यांचा मुलगा राहुल हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही तो अशाच प्रकारच्या घटनांमध्ये सामील होता. त्याने हा गुन्हा कुठल्या अमलाखाली केला आहे का, याची खात्री करून घेण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज आहे, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.
फक्त मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा : कुडचडे येथे घडलेल्या रोडरेजच्या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमागे गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार आहे का, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत आयुष यांनी दिली.
व्हिडिओ चर्चेत
शनिवारी रात्री घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ काँग्रेस नेते ॲड. अमित पालेकर यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यानंतर घटना चर्चेत आली. त्यावेळी त्यांनी संबंधित व्यक्तीचे नाव जाहीर न करता ‘तिसवाडीच्या आमदाराचा पुत्र’ असा उल्लेख केला होता. सोमवारी सकाळी ॲड. कुडचडकर यांनी पोलिसांत रीतसर तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाला अधिकृत स्वरूप आले. या घटनेमुळे कुडचडे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
प्रमुख आरोप
रस्त्याच्या मध्ये वाहन उभे करून वाहतूक अडविली.
हॉर्न वाजवल्याने शिवीगाळ केल्याचा आरोप.
वाहनाचा पाठलाग केल्याचे तक्रारीत नमूद.
हातात सळीसारखी वस्तू असल्याचा दावा.
वाहनाला धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप.
आंबेडकर सर्कलजवळ वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणात तक्रार मिळाल्यानंतर आता पोलिस सखोल चौकशी करतील. आवश्यकतेनुसार योग्य ती कारवाईही केली जाणार आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.” - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.