

वास्को: खारीवाडा येथील फिशिंग जेटीची वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी पाहणी केली. आगामी मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी जेटीची दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला दिले.
जेटीची दुर्दशा झाल्याने तसेच अद्याप दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याबद्दल गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी नाराजी व्यक्त केली होती. या जेटीच्या दुरुस्तीबाबत सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जात असली, तरी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.
काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली खारीवाडा फिशिंग जेटी सध्या जीर्णावस्थेत असून तिच्या काही भागांची पडझड होत आहे. जेटीची क्षमता कमी असल्याने सुमारे २५० मच्छीमारी बोटी सामावून घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे बोटमालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. जेटीवर उभ्या करण्यात येणाऱ्या लाकडी बोटी अनेकदा एकमेकांवर आपटून त्यांचे नुकसान होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
जेटीची लांबी वाढविण्याची मागणी गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशनने वारंवार केली आहे. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासनेच मिळाल्याचा दावा संघटनेने केला आहे. संबंधित फिशिंग जेटी मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात येत असून, दुरुस्तीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रश्नावर संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांनी अनेकदा भेटी दिल्या असल्या, तरी कायमस्वरूपी तोडगा अद्याप निघालेला नाही.
सध्या मासेमारी बंद असली तरी जेटीच्या विस्तारित भागाचा काही हिस्सा लाटांमुळे कोसळला आहे. याबाबत जुझे फिलिप डिसोझा यांनी सातत्याने आवाज उठवत दुरुस्तीच्या कामातील विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. फिशिंग बोटींची संख्या वाढल्याने जेटीचे नूतनीकरण व विस्तारीकरण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार साळकर यांनी जेटीची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी जुझे फिलिप डिसोझा तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. डिसोझा यांनी जेटीच्या दुर्दशेबाबत साळकर यांना माहिती देत, विस्तारित भाग कोसळल्यामुळे बोटी उभ्या करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.