Goa Politics: खरी कुजबुज; युरी, विजय गप्‍प बसणार?

Khari Kujbuj Political Satire: म्हापशात नुकतेच एका कॉंग्रेस पदाधिकाऱ्याने रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, आणि रस्ते धोकारहित व्हावेत, या मागणीसाठी खड्ड्यात बसून आंदोलन केले.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

युरी, विजय गप्‍प बसणार?

राज्‍यात आयोजित होणऱ्या धीरयोंना ‘मगो’ पक्षाने आतापर्यंत कधीच पाठिंबा दिला नव्‍हता. पण, या अधिवेशनात ‘मगो’चेच आमदार असलेल्‍या जीत आरोलकर यांनी धीरयोला कायदेशीर मान्‍यता देण्‍याची मागणी सरकारकडे लावून धरली. शिवाय आपली भूमिका ही ‘मगो’चीच भूमिका असल्‍याचे सभागृहात स्‍पष्‍ट केले. त्‍यावेळी शांत बसलेल्‍या मंत्री तथा मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी अधिवेशन संपल्‍यानंतर पक्षाची भूमिका तशी नसल्‍याचे सांगितले. एकाच पक्षाच्‍या दोन आमदारांची परस्‍परविरोधी भूमिका झाल्‍याने सुदिन कधी सापडतील, याची वाट प्रामुख्‍याने युरी, विजय बघतच आहेत. त्‍यात उद्या सोमवारीच सुदिन ढवळीकर यांच्‍याकडे असलेल्‍या खात्‍यांच्‍या पुरवणी मागण्‍यांवर चर्चा असल्‍याने सगळ्यांचे लक्ष त्‍याकडे असेल, हे निश्‍चित. ∙∙∙

खड्डे बुजणार का?

म्हापशात नुकतेच एका कॉंग्रेस पदाधिकाऱ्याने रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, आणि रस्ते धोकारहित व्हावेत, या मागणीसाठी खड्ड्यात बसून आंदोलन केले. सातत्याने रस्त्यांबाबत आंदोलने करूनही खड्डे जैसे थे असताना या अनोख्या आंदोलनाची दखल तरी सरकारकडून घेतली जाईल, का हा प्रश्‍नच आहे. ‘खड्डेमुक्त रस्ते देऊ’ ही सरकारची घोषणा तर एखाद्या दुकानावर टांगलेल्या ‘कामगार पाहिजेत’ या पाटीसारखी झाली आहे. कामगार मिळतात, सोडून जातात, खड्डे पडतात, बुजवूनही पुन्हा दिसतातच! नाही का? ∙∙∙

डॉन बॅंकॉक मध्ये

पावसाळी विधानसभा अधिवेशन सध्या सुरू असून, मडगावात काही मटका डॉन या दिवसात परागंदा झाले आहे. एकजण तर या दिवसात बँकॉकमध्ये मौजमजा करीत आहे. तो विदेशात असला तरी त्याचा मटका बिझनेस पूर्वीप्रमाणे जोमदार सुरू आहे. या व्यवहारातून त्याने बरीच माया जमवली आहे. आपल्या मूळ गावी हुबळी येथील बदलापूर भागात त्याने टोलेजंग बंगलाही बांधला आहे. फातोर्ड्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याला तो जवळ आहे. हा डॉन कधी परत येणार याची प्रतीक्षा काही पोलिसांनी ही लागून राहिली आहे. कारण स्पष्ट आहे. महिन्याचा हफ्ता अजूनही हाती पडला नाही. ∙∙∙

बिनसले कुठे?

राज्‍य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्‍याच्‍या पहिल्‍या दिवसापासूनच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव इतके आक्रमक झालेत, की इतके दिवस विरोधी बाकांवरून सभागृह गाजवणार्‍या आमदार विजय सरदेसाई यांच्‍यावरही ते मात करीत आहेत. युरी बोलायला उठले किंवा प्रश्‍नांवर इतर आमदार बोलत असताना त्‍यांनी मध्‍येच तोंड घातले की सरदेसाई यांच्‍या मनात काय चालले आहे, ते त्‍यांच्‍या चेहर्‍यावरून समजून येते. गेल्‍या काही दिवसांत तर युरी काँग्रेस आणि आपच्‍या आमदारांनाही हात दाखवून खाली बसायला लावत असल्‍याचे आणि सर्व किल्ला स्‍वत: लढवत असल्‍याचे दिसून येत आहे. ‘विरोधी पक्षनेत्‍या’च्‍या बैठकीला उपस्‍थिती न लावल्‍याचा राग तर युरी विजयवर काढत नसतील ना? ∙∙∙

‘पीओपी’ मूर्तीला ‘नो एंट्री’?

पोलिसांनी एका गाडीला अडवून आत असलेले पीओपी गणपती मूर्ती ताब्यात घेतल्या आणि ‘व्वा रे पोलिस!’ असं म्हणत लोकांनी त्यांचे तोंड भरून कौतुकही केलं. पण खरी गंमत तर यानंतर सुरू झाली. लोकांना आता प्रश्न पडला आहे की, ‘अरे, जे गणपती आधीच राज्यात आलेत आणि दुकानांमध्ये ठाण मांडून बसलेत, त्यांचं काय?’ अशी चर्चा आता सुरू झाली आहे. गाडी अडवून दाखवून दिलं की, ‘आम्ही आमचं काम करतोय’, पण जे गणपती आधीच राज्यात पोहोचले आहेत, त्यांना पोलिस कधी पकडणार? असं लोकांनी विचारायला सुरुवात केली आहे. ‘जोपर्यंत तुम्ही हे आधीच राज्यात आलेले पीओपी गणपती मूर्ती पकडत नाही, तोपर्यंत आम्ही कौतुकाची थाप फक्त अर्धीच देऊ,’ असं लोक आता गंमतीत बोलत आहेत. म्हणजे, कारवाई फक्त एकाच गाडीवर की संपूर्ण राज्यात? हा प्रश्न बाप्पालाही पडला असेल! ∙∙∙

Goa Politics
Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोमागे स्वार्थ?

पंढरीच्या विठ्ठलाला साकडे

आषाढी एकादशी कधीचींच संपली व आता श्रावणातील नारळी पौर्णिना दारांत येऊन ठेपली आहे. पण आषाढी वारीच्या आठवणी काही संपत नाहीत. अनेकांनी या वारींतील सुंदर वर्णने केली आहेत. सध्या चालू असलेल्या गोवा विधानसभा अधिवेशनातही या वारीची वर्णने करण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. त्यांत सत्ताधारी तसेच विरोधी आमदारही होते हे विशेष. पण अनेकजण आपण वारीत व त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विठ्ठलाला घातलेल्या साकड्याची माहितीही खालच्या सुरांत सांगतात. त्यात अनेकजण प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री म्हणून लाभावेत असे गागाणे घालणारे जसे आहेत तसेच येत्या मंत्रिमंडळ पुनर्रचनेत आपली मंत्रीपदी वर्णी लागावी असा नवस करणारेही आहेत. आता

मंत्रीपदावर गेल्या काही महिन्यापासून डोळा ठेवून कोण आहेत ते सगळ्यांनाच माहीत आहे खरे. या सगळ्यांच्या या भक्तीमुळे विठ्ठलमाऊली कोणावर प्रसन्न होते ते पाहुया. ∙∙∙

Goa Politics
Goa Politics: खरी कुजबुज; रवींचा आशयघन विनोद

आयत्या पीठावर रेघोट्या!

सध्या विधानसभा अधिवेशन सुरू आहे. विरोधकांमध्ये एकजूट नाही, हे दिसून आले आहे. कदाचित त्यामुळे पक्षाच्या आमदारांच्या कामगिरीवर बोलण्यासाठी प्रदेशाध्यक्षांना पुढे यावे लागत आहे काय, असा सवाल काँग्रेसकडे पाहिल्यानंतर उपस्थित होतो. कारण काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारकडे मागितलेल्या लेखी उत्तरावर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देण्याचा नवा फंडा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सुरू केला की काय, असा सवाल पक्षातीलच धुरिणांना पडलेला दिसत आहे. विधानसभेच्या कामकाजाचा तिसरा आठवडा उद्यापासून सुरू होत आहे, आत्तापर्यंत झालेल्या मागील दोन आठवड्यात लेखी प्रश्नांवर मिळालेल्या उत्तरावर पाटकर यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन सरकारचा कारभार उघड करण्याचा प्रयत्न केला. परंतु यात प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचे काम प्रवक्त्याचेच वाटत आहे. पक्षाकडे चांगले प्रवक्ते आहेत, त्यांनी तो विषय मांडला असता तर भाग वेगळा परंतु प्रदेशाध्यक्षांवर आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याची वेळ यावी, हे पक्षातील कित्येकजणांना निश्चित रुचलेले नसणार आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com