Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak

Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोमागे स्वार्थ?

Khari Kujbuj Political Satire: अबकारी खात्याचे अधिकारी ज्यांनी मद्य तस्करी रोखण्यासाठी कर्तव्य बजावायचे असते, तेच अधिकारी तस्करीसारख्या गैरकृत्यांत गुंतल्याचे उघड झाले.
Published on

धीरयोमागे स्वार्थ?

विधानसभेत नुकतीच ‘धीरयो’ कायदेशीर करण्याची चर्चा झाली आणि त्यानंतर राज्यभर या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाल्या. काहीजण या निर्णयाचे स्वागत करत आहेत, तर काहीजण यामागे आमदारांचा स्वार्थ असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. ‘धीरयो’ कायदेशीर केल्याने ग्रामीण भागातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना खुश करता येईल, असा आमदारांचा कयास आहे. पण या निर्णयामागे आणखी एक मोठा स्वार्थ दडलेला असल्याचा आरोप काही लोक करत आहेत. तो म्हणजे ‘काळा पैसा’ ‘पांढरा’ करण्याचा. लोकांना खऱ्या अर्थाने ‘धीरयो’ हवे आहेत की आमदारांना फक्त राजकीय फायदा मिळवायचा आहे, हा खरा प्रश्न आहे. आमदारांच्या या भूमिकेमुळे लोकांच्या मनात त्यांच्या हेतूंबद्दल शंका निर्माण झाली आहे, हे मात्र नक्की.

कुंपणच खातेय शेत?

अबकारी खात्याचे अधिकारी ज्यांनी मद्य तस्करी रोखण्यासाठी कर्तव्य बजावायचे असते, तेच अधिकारी तस्करीसारख्या गैरकृत्यांत गुंतल्याचे उघड झाले. पण त्यामुळे कुंपणच शेत खाऊ लागल्याचा प्रत्यय आल्याच्या प्रतिक्रिया कर्नाटकात एका अधिकाऱ्यावर अटकेची कारवाई झाल्याची माहिती समाजमाध्यमात व्हायरल होताच उमटू लागल्या आहेत.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: ‘शॅक’धारकांना सुखद धक्का!

जिल्हा मुख्यालयासाठी सगळे एकत्र !

गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची स्थापना झाल्यास त्याचे मुख्यालय कुडचडे येथेच व्हावे अशी सर्व कुडचडेच्या लोकांची इच्छा आहे तर दुसऱ्या बाजूने हे मुख्यालय केपे येथे व्हावे, अशी केपेच्या लोकांची इच्छा आहे. मात्र दोन्ही ठिकाणाहून मागणी होतेय त्यात एक प्रामुख्याने फरक दिसतो तो असा की सगळे कुडचडेवासीय आपली मागणी पुढे रेटण्यासाठी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आलेत. काल कुडचडेच्या नागरिकांनी ही मागणी करण्यासाठी आमदार नीलेश काब्राल यांच्या बरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यात भाजपचे प्रदीप नाईक, रोहन गावस देसाई, काँग्रेसचे पिंटी होडारकर, मनोहर नाईक, आरजीचे आदित्य देसाई आणि कुडचडे येथील अनेक व्यावसायिक आणि नगरसेवक होते. दुसऱ्या बाजूने केपेत जी मागणी होत आहे, ती प्रत्येकजण वेगळ्या व्यासपीठावरून करत आहे. कुडचडेकडून केपेकर काही तरी शिकतील का?

माजी मंत्र्यांचा डाेईजड सोयरा!

कुठल्‍याही सरकारी कार्यालयात आजी वा माजी मंत्र्यांचा सोयरा कामाला असल्‍यास तो कसा डोईजड होऊ शकताे, याचा प्रत्‍यय सध्‍या केपे येथील पाणी पुरवठा खात्‍याच्‍या कार्यालयाचे सहाय्‍यक अभियंते घेत असतील. या कार्यालयात एका माजी मंत्र्याच्‍या जवळचा सोयरा मीटर रिडर म्‍हणून कामाला आहे. काही दिवसांपूर्वी ताे आजारी असल्‍याने रजेवर होता. मात्र आता तो कामावर रुजू झाला आहे. असे असले तरी आपल्‍या मनाला वाटले तरच तो कामाला येतो. अन्‍यथा बायोमेट्रीक मशिनवर बोट लावून नंतर तो कुठे गायब होतो, हे कुणालाच माहीत नसते. त्‍याच्‍या या मनमानी कारभाराचा आता या विभागातील काही अभियंत्‍यांवरही परिणाम झालेला असून तेही म्‍हणे त्‍याचीच री ओढत आपणही अधून मधून असेच गायब होतात. त्‍यांचेही खरे म्‍हणा, माजी मंत्र्याच्‍या साधा रिडर असलेल्‍या सोयऱ्याला जर अशी ‘व्‍हीआयपी’ वागणूक मिळत असेल तर आम्‍ही अधिकारी असून आम्‍हाला ती का मिळू नये?

शहरांतले खड्डे ‘जैसे थे’

पणजी शहर आणि परिसरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून पावसाने जोर धरला तर खड्ड्यांमध्ये पाणी साचते तेव्हा खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांना आमंत्रण मिळते. गेल्या आठवड्यात दुचाकीस्वारांच्या अपघातांत वाढ झाल्याचे हेही एक कारण म्हणता येईल. वास्तविक पाऊस थांबतो, तेव्हा खड्डे बुजवण्यासाठी हालचाली होणे अपेक्षित असते, पण पाऊस जेव्हा धो-धो कोसळू लागतो, तेव्हा खड्डे बुजवणारे ‘जेट पॅचर’ जणू काही अळंबी उगवल्यासारखे रस्त्यांवर दिसू लागतात, अन् वाहतुकीतही अडथळा आणतात. पण उपयोग काहींच नसतो, कारण खड्डे बुजवण्याचा खटाटोपानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ते दिसू लागतात. कंत्राटदार हे खड्डे कागदावरच बुजवतो,अन् रस्त्यावर ‘जैसे थे’ असे बोलले जात आहे.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: नोकऱ्या कोणाला मिळतात?

लॉटरीचा घाेटाळा?

सध्‍या गणेशाेत्‍सव ताेंडावर आलेला असताना वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी आपल्‍या लॉटऱ्या खुल्‍या केल्‍या आहेत. काही महिन्‍यांपूर्वी धडे-सावर्डे येथील एका देवस्‍थान समितीने म्‍हणे अशाचप्रकारे १.१० कोटी रुपयांच्‍या लॉटऱ्या बाजारात आणल्‍या होत्‍या. त्‍यातील ३५ लाख रुपये किंमतीच्‍या लॉटऱ्या तशाच पडून राहिल्‍या तर अन्‍य १३ लाखांच्‍या लॉटऱ्या बाहेर विकायला गेल्‍या पण त्‍यांचे पैसे अजून आलेले नाहीत. वास्‍तविक कुठल्‍याही देवस्‍थानाने अशा लॉटऱ्या बाजारात आणायच्‍या असतील त्‍यांना स्‍थानिक मामलेदारांची परवानगी घ्‍यावी लागते. पण या देवस्‍थान समितीने ती घेतली नाही. आणि आता बाहेर विकायला गेलेल्‍या लॉटऱ्यांचे लाखो रुपये आले नाहीत यासाठी या व्‍यवहाराचे ऑडिट केले गेलेले नाही. त्‍यामुळे हा व्‍यवहार म्‍हणजे एकप्रकारचा लॉटरी घाेटाळाच, असा आक्षेप एका महाजनाने घेतला असून सध्‍या हा कथित घोटाळा सावर्डे-कुडचडे भागात एक चर्चेचा विषय बनला आहे.

राजकीय धीरयो

धीरयो अर्थात बैलांच्या वा रेड्यांच्या झुंजींना कायद्याने बंदी आहे. ही आज कालची नाही तर गेल्या अनेक वर्षांची वस्तुस्थिती आहे. तरीपण गोव्यात अनेक भागांत या झुंजी चालू असतात. अनेकदा त्या समाजमाध्यमावरुन व्हायरल झाल्यावर दिखाव्यापोटी पोलिस त्या बंद पाडतात वा ते दाखल होण्यापूर्वीच त्या गुंडाळ्या जातात . त्या नंतर नावापुरत्या कोणावर तरी गुन्हा दाखल केला जातो. त्याचे नंतर काय होते ते कोणालाच कळत नाही. तर अशा या धीरयो कायदेशीर कराव्यात म्हणून गेली अनेक वर्षे राजकीय नेते धडपडत आहेत व आता तर त्यासाठी विधेयक आणण्याचे संकेत मिळत आहेत. पण लोकांचे म्हणणे वेगळेच आहे. गेली काही वर्षे राज्यात निवडून आलेले राजकीय नेते ज्या पध्दतीने कोलांट्या मारत आहेत व नंतर एकमेकांच्या ज्या पध्दतीने उखाळ्या पाखाळ्या काढत आहेत, तो खरे तर चांगला धीरयो आहे. ही उदाहरणे असताना मुक्या जनावरांच्या वेगळ्या धीरयोची गरज आहे का, असा प्रश्नही केला जात आहे.

पर्वरीवासीयांची गत ‘इकडे आड तिकडे विहीर’

पर्वरीत उड्डाणपुलाचे काम गेली कित्येक महिने सुरू आहे. पावसाळा सुरू होताच पर्वरीतील रस्त्यांवरून येजा करणाऱ्यांना चिखलाचा सामना करावा लागत होता. हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला अन् पावसाने नेमकी हिच संधी साधून दडी मारली, इतकी की उन्हाने जमीन तापू लागली अन् चिखल जाऊन रस्त्यावरच्या मातीची धूळ उडू लागली. त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच चिखलाचा सामना करणाऱ्या पर्वरीवासीयांना पुन्हा धुळीने घेरले. एकूण काय तर आगीतून फुफाट्यात म्हणा, किंवा इकडे आड तिकडे विहीर, अशीच काहीशी अवस्था पर्वरीतील रहिवाशांची झाली असून उन्ह असो वा पाऊस त्रास मात्र कायम आहे. ∙∙∙

यंत्रणेबाबत प्रश्‍न

राज्यात पीओपी मूर्ती तयार करणे, आयात करणे किंवा विक्री करण्यावर कायद्याने बंदी आहे. सापडल्यास दंडात्मक कारवाई सोबत तुरूंगातही जावे लागेल,अशी कडक तजवीज असताना देखील दरवर्षी समुद्रकिनाऱ्यांवर, नदीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तरंगताना दिसतात. त्यामुळे दरवर्षी जागृती केली जाते, तपासणी केली जाते तरीदेखील हा प्रकार कसा घडतो असा प्रश्‍न अनेक पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. या मूर्तींच्या माध्यमातून निसर्गाला हानी करतो, म्हणजेच एक प्रकारे अनास्था दाखवतो... हे पटवून देण्यासाठी आणि या प्रकारांवर नियंत्रण आणण्यास यंत्रणा कमी पडतेय, असा प्रश्‍न पडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com