Goa Politics: धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावरील जंक्शनवर अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तेथे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे ते धारगळ येथे आले असता केली होती. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून उड्डाणपूल उभारण्याचे दिलेले आश्वासन आज एक वर्षानंतरही पूर्ण झालेले नाही.
त्यामुळे संतप्त बनलेल्या धारगळ पंचायत क्षेत्रातील लोकांनी, परिसरातील नागरिकांनी व वाहनचालकांनी आज बुधवारी संध्याकाळी दोन खांब-धारगळ येथे एकत्र येऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या व निषेध केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने उड्डाणपूल उभारण्यासाठी पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच भाजपच्या उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावू, असा इशाराही त्यांनी दिला.
सरपंच अर्जुन कानोळकर म्हणाले की, बरोबर एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धारगळला भेट दिली होती. जंक्शनवर उड्डाणपूल नसल्याने कशा प्रकारे अपघात होऊन एखादी दुर्घटना घडू शकते हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांनी पाहणी करून याबाबत पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते.
तर, धारगळ ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या ‘लोक अदालत’ कार्यक्रमात वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, तसेच नंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्या लक्षात ही बाब आणून दिली होती. त्यांनीही उड्डाणपूल उभारण्याचे आश्वासन दिले होते. पण नंतर या सर्वांना त्या गोष्टीचा विसर पडला.
‘मिशन फॉर पेडणे’चे निमंत्रक राजन कोरगावकर यांनी सांगितले की, धारगळ येथून जवळच पेडण्याच्या आमदाराचे घर आहे. रोज ते या रस्त्याने येजा करतात, पण तरीही ते गप्पच आहेत. तर, माधुरी गाडगीळ म्हणाल्या, शाळेत जाणाऱ्या मुलांना तसेच येथून वाहतूक करणाऱ्या प्रत्येकाला जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. सरकारने उड्डाणपूल उभारण्यास दिरंगाई केली तर आम्ही महिला शक्ती काय असते हे सरकारला दाखवून देऊ.
‘ओव्हर फ्लाय आमका जाय’
आंदोलकांनी हातात फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘आमका जाय, आमका जाय, ओव्हर फ्लाय आमका जाय’ या घोषणेने त्यांनी आसमंत दणाणून सोडला. यावेळी धारगळ पंचसदस्य दाजी शिरोडकर, सतीश धुमाळ, दिलीप वीर, अमिता हरमलकर, प्रसाद खानोलकर, रुपेश कंब्रलकर, भरत बागकर, संदेश राऊळ, नारायण साळगावकर, साईश नाईक, रोहिदास हरमलकर, जुझे लोबो, शुभांगी कवठणकर, जानकी कवठणकर, नीता कोरगावकर, अँथनी नोरोन्हा, मिलिंद वंसकर, आश्वेक नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
धारगळ येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 66 च्या आराखड्यात येथे उड्डाणपूल होता व तो या महामार्गाचे काम सुरू असतानाच होऊनही गेला असता. पण धारगळ येथील लोकांनीच तेव्हा हा उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी केली होती, त्यामुळे तो रद्द करण्यात आला. आता परत लोकांच्या मागणीनुसार केंद्रीय महामार्ग खात्याला धारगळ येथे उड्डाणपुलाचा प्रस्ताव पाठवला आहे. त्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू होईल.
- उत्तम पार्सेकर, प्रधान मुख्य अभियंता (साबांखा)
धारगळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील जंक्शन मृत्यूचा सापळा बनले आहे. या ठिकाणी रोज अनेक अपघात घडतात. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. काही महिन्यांपूर्वी माझ्या पतीलाही या ठिकाणी अपघात झाला होता. अजूनही ते जायबंदी आहेत. सरकारने तातडीने उड्डाणपूल उभारण्यासाठी पावले उचलावीत.
- शिवानी परब, धारगळ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.