
माजी मंत्री गोविंद गावडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना बरेच दावे केले. आमच्याच पक्षाचे लोक माझ्या विरोधात होते, असे सांगताना गावडे यांनी एक उदाहरण दिले. ‘कला अकादमी प्रकरण तुमचेच लोक लावून धरण्यास सांगतात’, असे एका संपादकाने आपल्यास सांगितले होते’, असा गावडे यांनी प्रकर्षाने उल्लेख केला. आता भाजपला जवळ असलेला, निकटचा ‘तो’ संपादक कोण, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे नेते ‘त्या’ संपादकाकडून आपली कामे करून घेतात का, असा प्रश्नही लोकांना पडणे साहजिक आहे. आता गोविंद ते नाव कधी जाहीर करतात ते पाहू! ∙∙∙
वास्तविक पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी आणि त्यात उड्या टाकणारे सांजाव ही गोव्यातील मागच्या कित्येक पिढ्यांनी चालवलेली परंपरा. मात्र, काल बाणावलीत जेव्हा सांजावचा उत्सव झाला, त्यावेळी या सांजावनी विहिरीत उड्या मारण्याचे टाळलेच. याचे कारण स्पष्ट करताना, रॉकी फर्नांडिस याने सांगितले की, बाणावलीतील सगळ्या विहिरी प्रदूषणाने दूषित झालेल्या आहेत. त्यामुळे अशा विहिरीत उड्या घेणेही धोक्याचे बनले आहे. आता बाणावलीसारख्या गावात सांजावना उड्या घेण्यासाठी विहिरी उपलब्ध नाहीत, तर शहरी भागाची स्थिती कशी असेल बरे? ∙∙∙
खासदार सदानंद तानावडे हे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होत असतात. असे असले तरी पक्षीय विषयात भाष्य करताना ते अलीकडे सावधगिरी बाळगत असल्याचे दिसते. माजी प्रदेशाध्यक्ष असले, तरी आपण आता केवळ खासदार आहे याचा त्यांना विसर पडत नाही. त्यामुळे आमदार गोविंद गावडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर केलेल्या टीकेवर तानावडे यांनी मंगळवारी सावधपणे बोलणे पसंत केले. आधी प्रदेशाध्यक्षांना बोलू द्या, मग मी प्रतिक्रिया देतो असे सांगून त्यांनी काढता पाय घेतला. ∙∙∙
गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर कला अकादमीत होणाऱ्या गोमंत विभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. कारण एसटी नेतृत्वाच्या वर्चस्ववादातून गावडे हे ज्यांना राजकीय प्रतिस्पर्धी मानत आले आहेत, त्या सभापती तवडकर यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत होते. गावडे, मुख्यमंत्री सावंत आणि तवडकर एकत्र आल्यावर एकमेकांशी बोलतील का, याची अनेकांना उत्सुकता होती. परंतु तवडकर कार्यक्रमाला आलेच नाहीत. कार्यक्रमस्थळी अजित कडकडेंसह मान्यवर रंगमंचाकडे प्रयाण करत असताना अखेर मुख्यमंत्री व गावडे समोरासमोर आलेच. साऱ्यांच्या नजरा द्वयींवर खिळल्या. दोघांनी बळेबळे हस्तांदोलन केले, पण नजरानजर टळली. या पलीकडे आणखी काही झाले नाही. परंतु, ‘त्या’ भेटीचा कॅमेराबद्ध झालेला क्षण ‘फोटो ऑफ द डे’ ठरला, हे मात्र खरे. ∙∙∙
‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ म्हणतात ते खरे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजकीय धाडसाचे मराठा समाजाकडून कौतुक होत आहे. रविवारी मुख्यमंत्री फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीण देवीच्या दर्शनाला आले होते. मुख्यमंत्र्यांनी देवीच्या मंदिरात भक्तिमय होऊन बराच वेळ घालवला. श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवी ही शौर्याची प्रतीक म्हणून राज्यातील मराठे देवीला भजतात. मुख्यमंत्र्यांनी राजकारणात काही धाडसी निर्णय घेतले याची चर्चा आता कुंकळ्ळीत सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून काढले, त्याचा मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार की मुख्यमंत्र्यांना या धाडसाचा फायदा होणार यावर चर्चा रंगली आहे. मोडेन, पण वाकणार नाही ही मराठ्यांची परंपरागत धाडसी वृत्ती मुख्यमंत्र्यांनी राखली. म्हणून देवी शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणीचा आशीर्वाद त्यांना लाभेल अशी भावना व्यक्त व्हायला लागली आहे. ‘भिवपाची गरज ना’ हा मुख्यमंत्र्याचाच नारा आता मराठे मुख्यमंत्र्यांना उद्देशून द्यायला लागले आहेत. ∙∙∙
शिवोलीतील सांजावात आमदार मायकल लोबो यांनी केलेले नृत्य आकर्षण ठरले. त्यांच्या पत्नी दिलायला या शिवोलीच्या आमदार होण्याआधीपासून मायकल शिवोलीच्या सांजावात सहभागी होत आले आहेत. मंत्री असताना त्यांनी राज्यभरातील नेत्यांना शिवोलीत आणले होते. ओडीपी प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानंतर मायकल यांची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न कोणाला पडला असेल, तर त्याचे उत्तर बिनधास्तपणे सांजावसाठी शिवोलीत एकवटलेल्यांत घुसत, त्यांच्यासोबत नृत्य करत मायकल यांनी दिले आहे. ∙∙∙
खांडोळा - माशेल येथे प्रियोळचे आमदार तथा माजी मंत्री गोविंद गावडे यांनी कार्यकर्ते आणि मतदारांना संबोधित करण्यासाठी भव्य सभा घेतली. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे सभेला फक्त गोविंदरावांनी संबोधित केले. एरव्ही सभा म्हटली की दहा पंधरा जणांची भाषणे होतात. मात्र, आयोजकांनी फक्त एकट्या गोविंद गावडे यांचे भाषण ठेवून महत्त्वाचा वेळ वाचवला लोकच म्हणत होते हे..! ∙∙∙
मनोहर पर्रीकर जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा ‘जी-६’ हा मंत्र्यांचा गट भारीच प्रभावी ठरला होता. पर्रीकर आजारी पडल्यावर जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण अशी चर्चा झाली, त्यावेळेला मडकईच्या आमदाराचे नाव पुढे आले, पण मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांना ‘जी-६’ने विरोध दर्शवला म्हणे, त्याला सुदिन ढवळीकर यांनीही आता दुजोरा दिला आहे, पण नंतरच्या काळात ‘जी-६’ गटच नाहीसा झाला. कारण या गटातील तिघांना काढून टाकण्यात आले. त्यामुळे ‘जी-६’ मधील केवळ तीनच बचावले, त्यांनी हातपाय बडवले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.