
सांग्याचे आमदार आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांचे नाव अधूनमधून सभापतिपदासाठी घेतले जाते. दक्षिण गोव्यात मागील निवडणुकीत भाजपचा किल्ला एकहाती लढवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे काब्राल, गावडेंनंतर फळदेसाई यांनाही मंत्रिमंडळातून हटवण्यासाठी काहींच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सत्ताधारी वर्तुळात आहे. असे असले तरी सभापतिपद हे शोभेचे पद आहे आणि त्या पदावर असताना पक्षाचे काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सभापतिपद मिळाले, तर तो भाजपचाच तोटा असेल असे फळदेसाई यांना वाटते. आपल्याला कमी महत्त्वाची खाती दिली गेली तरी त्यातही आपण काम करून दाखवल्याकडे अंगुलिनिर्देश करत ते आपल्या म्हणण्याचे समर्थन करत आहेत. ∙∙∙
सध्या मुंबई दौऱ्यावर असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक येतील व आमदार गोविंद गावडे यांना जाब विचारतील असे भाजपच्या नेत्यांना वाटते. गावडे यांनी दामू यांचे नाव न घेता पण सूचकपणे दामूंवर जाहीर सभेत टीका केली आहे. शिस्तबद्ध पक्ष म्हणवणाऱ्या भाजपच्याच आमदाराने प्रदेशाध्यक्षांवर दिवसाढवळ्या शरसंधान साधणे भाजपमधील अनेकांना पटलेले नाही. मंत्रिपद काढून घेतल्यानंतर तरी गावडे तोंडाला आवर घालतील असा भाजपचा होरा होता. मात्र, गावडे यांनी दंड थोपटून आव्हान दिल्यानंतर आता दामू पक्षशिस्तीचा काय डोस देतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙
राजकारणात भडकाविण्याचे काम काही नेते इतक्या उत्कृष्टपणे करतात की, सध्याच्या ‘टीआरपी’च्या जमान्यात त्यांना थेट ब्रेकिंग न्यूज चॅनललाच पाठवायला पाहिजे! गेल्या काही दिवसांपासून तर गोव्याच्या राजकारणात हा धडकाधडकीचा खेळ चांगलाच रंगलाय. मंत्रिपदावरून गोविंद गावडे यांना हटवल्यावर त्यांनी भर जाहीर सभेत आपल्या मनातील ‘खदखद’ अशी काही बाहेर काढली की, त्याचे पडसाद थेट मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचले. बोलता बोलता त्यांनी अप्रत्यक्षपणे बाणही मारले. मग लगेचच विजय सरदेसाईंनी आपल्या खास शैलीत ‘गोविंद गावडेवर पक्ष कारवाई करू शकत नाही, कारण पक्ष गावडेंना घाबरतो’ असा टोमणा मारून आगीत तेल ओतले. अशावेळी जेव्हा ‘गावडेंना बहुतेक पक्ष घाबरत असतील’ अशी चर्चा असताना गावडेंवर कारवाई होईल असे कार्यकर्त्यांनी बोलायला सुरवात केली आहे. ∙∙∙
कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना आम्ही वठणीवर आणणार अशा वल्गना त्या त्या खात्याच्या मंत्र्यांकडून वेळोवेळी केल्या जात असल्या, तरी कुठलेही खाते असो तिथे वेळेवर कर्मचारी अभावानेच कार्यालयात आलेले दिसतात. सोमवारी याचाच प्रत्यय मडगावच्या वीज कार्यालयाच्या विभाग ४ मधील कार्यालयात आला. हे कार्यालय सकाळी ९.३० वाजता सुरू होते आणि या विभागात सुमारे ३५ कर्मचारी आहेत. मात्र, काल सोमवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी ‘गोमन्तक टीव्ही’च्या वार्ताहराने भेट दिली असता अवघे चार पाचच कर्मचारी त्यावेळी कार्यालयात होते असे दिसून आले. कार्यालय सुरू होऊन ४० मिनिटे उलटूनही सुमारे ७० टक्के कर्मवारी वेळेवर कामावर हजर झालेच नव्हते. असेच प्रकार आराेग्य खात्यात चालू असल्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी मध्यंतरी त्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू केली हाेती. वीजमंत्रीही आता तेच करतील का? की ही मनमानी अशीच चालू राहील? ∙∙∙
फातोर्डा मतदारसंघ हा माझ्या मालकीचा नाही आणि या मतदारसंघाच्या एक चौदाच्या उताऱ्यावर माझे नाव लिहिलेले नाही असे वक्तव्य मागच्या शनिवारी झालेल्या फातोर्डा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बनलेले दामू नाईक यांनी केले होते. त्यामुळे यावेळी दामू नाईक उमेदवारीच्या शर्यतीत नाहीत की काय असा कित्येकांना प्रश्न पडला आणि त्यामुळे कित्येकांना फाताेर्ड्यातील भाजप उमेदवारी आपल्यालाच अशी स्वप्नेही पडू लागली होती, पण त्या मेळाव्यात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी दामू नाईक यांच्या कार्याची स्तुती ज्यातर्हेने केली ते पाहिल्यास दामू नाईक यांनाच यावेळीही फातोर्ड्यातून भाजपची उमेदवारी मिळणार असे सूचित करणारी ती स्तुती होती. भाजपची उमेदवारी फातोर्ड्यातून आपल्याला मिळावी अशी स्वप्ने कित्येकांना पडत असावीत, पण फातोर्ड्यातील सध्याची स्थिती पाहिली, तर दामूशिवाय पर्याय नाही अशी एकंदर परिस्थिती आहे. त्यामुळे परत एकदा उमेदवारीची माळ दामूच्याच गळ्यात तर पडणार नाही ना? अशी चर्चा सध्या फातोर्ड्यात सुरू आहे. ∙∙∙
सांजाव हा गोव्यातील एक सर्वांना एकत्र घेऊन जाणारा उत्सव. आज हा उत्सव साजरा होत असून सासष्टीत या उत्सवाच्या निमित्ताने सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते. सासष्टी हा खुल्या दिलाच्या माणसांनी भरलेला तालुका असून एकेकाळी या तालुक्याच्या प्रेमात गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेही पडले होते. सासष्टी भाजपच्या बाजूने वळविण्यासाठी त्यांनी खास ‘मिशन सालसेत’ ही मोहीम राबवली होती. त्यामुळे ते सासष्टीत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये स्वतः हिरिरीने सहभागी व्हायचे. पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले आवेर्तान फुर्तादो यांच्या आमंत्रणावरून ते सांजाव साजरा करण्यासाठी आले होते. त्यावेळचा तो फोटो सध्या समाज माध्यमावर फिरत आहे. आताचे भाजप नेते पर्रीकरांचा हा धडा गिरवतील का?. ∙∙∙
फातोर्डा व मडगावात सध्या झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. त्यासाठी काहीजण थेट दावे करतात, तर काहींनी आपल्या समर्थकांना पुढे काढले आहे. आता खरेच विकासकामे झाली की केवळ दावे प्रतिदावे केले जात आहेत त्याचा निवाडा लोकांनाच करावा लागेल, पण या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे लोकांची मात्र चांगलीच करमणूक होत असून ती नगरपालिका निवडणुकीपर्यंत चालेल असे दिसते. अनेकांनी या प्रकरणात काही मुद्देही उपस्थित केले असून त्यांनी संबंधितांना काही प्रश्नही केले आहेत. पणजीनंतर मडगाव हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर असताना येथील बसस्थानक इतकी वर्षे का होऊ शकलेला नाही अशी विचारणा केली जाऊ लागली आहे. विकासाचे श्रेय घेणाऱ्यांनी त्याचे उत्तर द्यावे. कारण २०१२ मध्ये नव्या सुसज्ज बसस्थानकाचा शिलान्यास झाला होता, पण अजून घोडे पुढे का सरकले नाही ते उत्तर लोकांना हवे आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.