
वास्को: मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणाऱ्यांकडून हफ्ते गोळा करणारा मुरगावचा लोकप्रतिनिधी आहे. बंदरातून कोळशाची निर्यात करणाऱ्या ट्रक व्यवसायिकांकडून हप्ता मागणारा स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. कोळशातून मिळणाऱ्या हप्त्यातून जनता दरबारात नागरिकांना पैसे वाटणारा दलाल मुरगावचा आमदार आहे, असा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.
माझ्यावर कोळसा हाताळणाऱ्या आस्थापनांकडून पैसे घेतल्याचा आरोप करणारा स्वत:च त्यांच्याकडून दर महिन्याला हफ्ते गोळा करीत असल्याचा दावा खासदार कॅ. फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत आज केला.
मुरगावचे आमदार वैफल्यग्रस्त होऊन माझ्यावर नको ते आरोप करून स्वतःची लाज काढत आहेत. मुरगाव बंदरातील कोळशाची वाहतूक करणाऱ्यांकडून हफ्ता गोळा करणे तसेच कोळसा व्यवस्थापनाकडून दर महिन्याला करोडो रुपये घेणारा माझ्यावर आरोप करून मला देव दामोदराच्या मंदिरात बोलावणाऱ्याला देवाचे नाव घेणे शोभत नाही.
ज्याने काँग्रेसमध्ये असताना देवाचा विश्वासघात केला, त्याने देवाचे नाव घेणे लज्जास्पद आहे. मी कुठल्याही मंदिरात यायला तयार आहे, फक्त मुरगावच्या आमदारांनी तारीख व वेळ सांगावी. मी तेथे हजर राहणार असल्याचे प्रत्युत्तर खासदार कॅ. फर्नांडिस यांनी दिले.
येथे कोळसा प्रदूषणाविरोधात आवाज उठविणारे दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे दिल्लीत संबंधितांकडे बॅगांचे सेटिंग करतात. पूर्वी ते अदानी, ‘जेएसडब्ल्यू’शी संबंधितांसमवेत चहा पित होते. आता डिनर होऊ लागले. मांजराला वाटते डोळे मिटून दूध प्याले, तर इतरांना कळणार नाही असेच कॅप्टनना वाटते, कल्प आमोणकर यांनी एका कार्यक्रमात केला.
विरियातो सेटिंग करतात की नाही, हे त्यांनी दामोदर देवासमोर येऊन सांगावे, असे आव्हान आमोणकर यांनी दिले. हेडलॅण्ड-सडा येथील रोझ सर्कल मैदान विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी आमोणकर म्हणाले, फर्नांडिस यांनी या मैदानाच्या विकासकामांचा प्रश्न हाती घेण्यापूर्वी सर्व चौकशी करण्याची गरज होती. त्यांना क्रीडा खात्याने मैदानाचा विकास करण्यासाठी ना हरकत दाखला दिला होता. त्यांनी या मैदानासाठी खासदार निधीचा वापर करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते.
तथापि माझ्याकडे त्या मैदानाचा विकास करण्यासाठी कामाचा आदेश आहे. फर्नांडिस यांनी विकासकामासंबंधी देखावा करण्याची गरज नव्हती. त्या कामासंबंधी फर्नांडिस यांनी प्रस्ताव दिला नव्हता.
आम्ही आमच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यास सक्षम आहोत, असे आमोणकर म्हणाले. कॅप्टन फर्नांडिस हे कोळसा प्रदूषण, धूळ प्रदूषणावर बोलतात. यासंबंधी आम्ही त्यांच्यासमवेत आहोत. त्यांच्यात हिंमत असेल तर रस्त्यावर यावे आणि कोळसा प्रदूषण बंद करावे; पण मी बॅगा घेतो, असा नाहक आरोप करू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.