Goa Politics: खरी कुजबुज; गोविंद गावडे की नाटकातील पात्र!

Khari Kujbuj Political Satire: गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यामुळे त्यांचे विरोधक मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे म्हणत आहेत.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

गोविंद गावडे की नाटकातील पात्र!

गेले काही दिवस गोव्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे गोविंद गावडे यांचे मंत्रिपद गेल्यानंतरच्या पहिल्या शक्तिप्रदर्शनाची. त्यांना पाहून लोकांनी अक्षरशः भुवया उंचावल्या, पण याचे कारण त्याचे शब्द नाही, तर देहबोलीत आणि एकूणच सादरीकरणात आहे. गावडे साहेबांनी व्यासपीठावर अक्षरशः आपल्या मनातील सर्व गोष्टी बाहेर काढल्या. त्यांचे भाषण इतके भावुक आणि हातवारे करत होते की, अनेकांना ते एखाद्या नाटकातल्या पात्राची भूमिका साकारत असल्यासारखे वाटले. ते गावडे नव्हतेच, ते तर कोणत्यातरी नाटकातील एक ‘पात्र’च होते! अशी चर्चा सभा संपल्यावर होत होती. ∙∙∙

दीपक ढवळीकरांना ‘अच्छे दिन’?

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यामुळे त्यांचे विरोधक मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे म्हणत आहेत. गावडे हे आता मंत्री नसल्यामुळे त्यांचे ‘वजन’ कमी होत चालल्याचे स्पष्टपणे प्रतीत व्हायला लागले आहे आणि याचा प्रत्यय प्रियोळ मतदारसंघातील पंचायतीत यायला लागला आहे. त्यांच्या समर्थक सरपंचावर अविश्वास ठराव दाखल व्हायला लागले असून त्यांच्या काही समर्थक पंचांनी दीपक ढवळीकरांच्या गोटात प्रवेश करायला सुरुवात केली आहे. निवडणुका जरी दीड वर्षे दूर असल्या तरी प्रियोळ मतदारसंघातील वातावरण आत्तापासूनच तापायला सुरुवात झाले असून दीपक ढवळीकरांच्या कळपात आनंदाची लहर उमटताना दिसायला लागली आहे. तशी प्रियोळात चर्चाही सुरू झाली आहे. आता दीपकरावांचे हे ‘अच्छे दिन’ निवडणुकीपर्यंत टिकतात की नाही हे सांगणे कठीण असले तरी ताज्या घडामोडीमुळे त्यांचा अश्वमेध वेगाने धावताना दिसायला लागला आहे एवढे मात्र नक्की. आता भविष्याबाबतीत बोलायचे, तर ‘अल्ला जाने क्या होगा आगे’ असेच म्हणावे लागेल नाही का? ∙∙∙

गावडेंनंतर आता खुर्ची कोणाला?

गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटविल्यानंतर राजकीय गल्लीबोळात एकच चर्चा सुरू आहे; गावडे यांची जागा आता कोण घेणार? लोकांना यात फारसं राजकीय स्वारस्य नसलं तरी, हे सगळं त्यांच्यासाठी एक प्रकारचं मनोरंजन बनलं आहे. अहो, गावडे गेले तर गेले! आपल्याला काय फरक पडणार? असे लोक बोलतात, पण त्यांची खुर्ची आता कोणाला मिळणार, यातच खरी गंमत आहे हे देखील लोक बोलतात. त्यामुळे राजकीय स्वारस्य नसले तरी लोकांमध्ये उत्सुकता आहे हे नक्की. मालिका बघण्याऐवजी हेच बघायला मजा येते. कोण कोणाला पाडतो, कोण वर येतो, सगळं कसं चित्रपटासारखं असे लोक म्हणतात आणि या चित्रपटाच्या क्लायमॅक्सची वाट पाहतात... ∙∙∙

हे खरे आहे काय?

गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला. दामू नाईक यांचा कामत यांना प्रथम मंत्री व नंतर मुख्यमंत्री करण्याचा डाव आहे असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या इशाऱ्याने सर्वांनाच आश्र्चर्याचा धक्का बसला. प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार यांच्याकडूनच मुख्यमंत्र्यांना धोका आहे म्हटल्यावर आता चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री त्यांचा हा इशारा गंभीरपणाने घेतील का? याबद्दलच्या शंका कुशंकांनासुद्धा ऊत आला आहे. ∙∙∙

दामू नाईकांवर पलटवार योग्य?

भारतीय जनता पक्ष कधी कधी एखाद्या उच्च पदस्थ नेत्यावर विरोधकांनी टीका केली, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तो नेता पुढे येत नाही. तर जे कार्यकर्ते किंवा समित्यांचे पदाधिकारी असतात त्यांच्यामार्फत ते टीकेला प्रत्युत्तर देत असतात. असे कित्येकवेळा होताना पाहण्यास मिळते. हीच युक्ती फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी लढवली असावी. दामू नाईक यांनी केलेल्या टीकेला स्वतः उत्तर न देता, नगरसेवकांमार्फत देण्यात आले. याचा अर्थ ते दामू नाईकांच्या टीकेला गंभीरपणे घेत नाहीत किंवा ते भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला किंमत देत नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही का? विजयने जशास तशी पद्धत वापरली याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. यावर दामूनेसुद्धा आज परत एकदा आव्हान दिले. त्याने म्हटले ‘बिबट्यांक मुखार काडून कित्याक उलयता’. हा टोला कोणाला होता? ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; भाजप टीममध्ये सरकारी पगारदार!

गावडेंचा रोख कोणाकडे?

गोविंद गावडे यांनी रविवारच्या सभेत माजी मंत्री विष्णू वाघ यांची आठवण सांगितली. आपले ते गुरू होते, असे सांगत त्यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणी पक्षाकडून त्यांना कशी वागणूक मिळाली हे सांगितले. वाघ यांना वापरून फेकण्यात आले. वापरा आणि फेका अशी नीती कोणाची, हे बहुजन समाजाने ओळखावे, असे गावडे यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावरून गावडे यांचा रोख निश्चित कोणाकडे आहे हे दिसून आले. वाघ यांच्याविषयी ज्या घटना घडल्या, त्या सर्वश्रुत आहेत. गावडे यांनी त्यांचे उदाहरण देण्याचे कारण काय असावे, हे त्यांना निश्चित उमगले असणार आहे. त्यामुळेच त्यांनी वाघ यांचे उदाहरण दिले असावे असे वाटते. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; भाजप टीममध्ये सरकारी पगारदार!

कला अकादमीचा विसर!

माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी आपण सत्य बोललो म्हणून आपल्याला मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला, असे खांडोळ्यातील सभेतील जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. गावडे यांनी अगदी कलाकारांसाठी सुरू केलेल्या योजनेतील निधीत भ्रष्टाचार झाल्यापासून क्रीडा खात्यात काम करताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्याचेही लयबद्धपद्धतीने सांगितले. व्यासपीठावर फक्त गावडे होते आणि समोर हजारोंचा जनसमुदाय. त्यामुळे बोलणाऱ्या वक्त्याच्या वाक्चातुर्यावर उपस्थितही डोळे मिटून विश्वास ठेवतात. गावडे नेहमीच सत्य बोलले असतीलही, पण एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या मतदारांसमोर कला अकादमीच्या विषयाला बगल का दिली, हाही प्रश्न प्रियोळमधील नव्हे, इतर ठिकाणच्या त्यांच्या विरोधकांना पडलेला असणारच. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com