
‘तहान लागल्यावर विहीर खणायला घेणे’, अशा आशयाची एक म्हण आहे. केपेत त्यात थोडा बदल करून पाऊस सुरु झाल्यावर रस्ता खणण्याचे काम असे म्हणावे लागेल. वास्तविक दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १५ मे नंतर कुठेही रस्ता खोदायला बंदी घालण्यात आली होती. पण केपेतील गटार दुरुस्तीसाठी रस्ता फोडण्याचे हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने भर पावसाळा सुरू झाल्यावर केले असून काल ही खोदाई करताना रस्त्याखालून गेलेली जलवाहिनीही फोडल्याने लोकांचे हाल अधिकच वाढले. सध्याचे हे काम पाहून ज्यावेळी उन्हाळा होता, त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे हे सर्व अधिकारी झोपा काढत होते की काय, असा प्रश्न आता लोकांना पडला आहे. त्यावर कुणी खुलासा करू शकेल का? ∙∙∙
‘मी पुन्हा येणार’, असे बाबू कवळेकर यांनी आमदारकीची निवडणूक हरल्यानंतर सांगितले होते. बाबू कवळेकर यांचे भाजपात वजन वाढलेय, हे नवीन कार्यकारिणी पाहिल्यावर सिद्ध होते. पक्षाने बाबूचे प्रदेश उपाध्यक्षपद कायम ठेवलेय. एवढेच नव्हे तर बाबू समर्थक रानीया कार्दोजो या युवा महिलेला पक्षात सचिवपद बहाल केले आहे. तसेच संजना वेळीप, केपेकर व इतर बाबू समर्थकांना कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. याचा अर्थ बाबू भाजपाचा प्रमुख नेता आहे, हे सिद्ध होत नाही का? ∙∙∙
पणजी महापालिकेची एकेक कामे पाहिली तर ती तोंडात बोटे घालायला लावणारीच आहेत, असे आता पणजीतील रहिवासी उघडपणे बोलू लागलेत, पण त्या बाबत संबंधितांना जाब विचारण्याचे वा त्यांना धडा शिकविण्याचे धारिष्ट्र्य मात्र त्यांच्यात नसावे. महापालिकेने मासळी मार्केट जवळील जीर्ण इमारत पाडण्यासाठी मासळी विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यासाठी जो मंडप उभारला त्याचे चार महिन्यासाठी फेडलेले भाडे ऐकून अनेकांचे म्हणे डोळेच पांढरे झाले. सदर मंडपवाला कोण होता, त्याची चर्चा आता पणजीत रंगू लागली आहे. चार महिन्यासाठी पन्नास लाख भाडे चुकते करण्याऐवजी त्या पन्नास लाखांत कायमस्वरुपी शेडच उभी करता आली नसती का, असे प्रश्न आता म्हणे महापालिकेतील सत्ताधारी गटाला जवळ असलेली मंडळीच करू लागलीत. पण तेथील नेत्यांना ते विचारण्याचे धाडस कोणाकडे नाही हे मात्र खरे. ∙∙∙
आतापर्यंत ‘उटा’ संघटनेने सभापती रमेश तवडकर यांचे खच्चीकरण करण्यासाठी वेळोवेळी गोविंद गावडे यांचा वापर केला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार, असा दामू नाईक़ यांनी इशारा दिल्यानंतर ‘उटा’चे सगळे पदाधिकारी गोविंद गावडे यांच्या समर्थनार्थ व्यासपीठावर आले. त्यावेळी अप्रत्यक्षपणे त्यांनी गावडेंना हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही सरकारला दिला. मात्र, तीन दिवसांपूर्वी गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरुन काढून टाकले. पण यासंदर्भात ‘उटा’चा एकही पदाधिकारी थेट बोलण्यास तयार नाही. ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप हे फक्त ‘नो कॉमेट्स’ म्हणून गप्प राहिले. गोविंदांचे मंत्रिपद गेल्यामुळे आता ‘उटा’नेही त्यांना वाऱ्यावर सोडून दिले असे म्हणायचे का?∙∙∙
कला संस्कृती खात्याच्या अखत्यारित असलेल्या फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरची समिती गेली साडेतीन वर्षे अजून अस्तित्वात आलेली नाही. समितीविनाच सध्या कलामंदिरचा व्यवहार चालला आहे. आता ही समिती निवडण्यात एवढा काळ का बरे लागला, याचे गणित काही फोंडेकरांना उमगलेले नाही, मात्र गोविंद गावडे यांची गच्छंती झाल्यामुळे निदान यावेळेला तरी नवीन कला संस्कृती मंत्री फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरची समिती निवडेल, असा विश्वास फोंडेकरांकडून व्यक्त होत आहे. ∙∙∙
‘एसजीपीडीए’च्या नव्या घाऊक मासळी मार्केटचे काम पूर्ण झालेले असले तरी त्याच्या उद्घाटनाला अजून मुहूर्त लाभत नाही, त्या मागील नेमके कारण काय तेही कोणाला माहीत नाही. पण मुद्दा तो नाही, तर आता म्हणे ‘एसजीपीडीए’ किरकोळ मासळी व फळभाजी मार्केटचे नूतनीकरण करण्याच्या विचारांत आहे. खरे तर किरकोळ मासळी मार्केटचे लंडन मधील मार्केटच्या धर्तीवर नूतनीकरण केल्यास पाच वर्षेच झालेली आहेत. मग इतक्यात नूतनीकरण कशासाठी, हा मुद्दा आहेच. पण कितीही नूतनीकरण केले तरी विक्रेते त्यांना आखून दिलेल्या जागेत बसून विक्री करणार का, हा प्रश्न आहे. भाजी मार्केटचेही तेच आहे. दिलेल्या जागेत गोदाम करावयाचा व पॅसेजमध्ये बसून विक्री करायची, ही त्यांची सवय आहे. नूतीकरणानंतरही जर हेच चालू रहाणार असेल तर मग कोट्यवधी रुपये खर्चून ते कशासाठी करावयाचे त्याऐवजी तेथील लॅाफ्ट काढून टाकून ते सपाट करा, म्हणजे लोकांना तरी व्यवस्थित फिरता येईल, असे लोकांचे म्हणणे आहे. ∙∙∙
‘जे का रंजले गांजले , त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा!’ तुकाराम महाराजांचा हा अभंग प्रत्येकाने अंमलात आणला तर आपल्या देशात सुख आणि समाधान यायला वेळ लागणार नाही. विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी गोव्यातील. मोटर सायकल पायलटांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करून राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटकात मोटर सायकल टॅक्सी वर बंदी टाकण्याचा आदेश दिला आहे. याचा परिणाम पोर्तुगीज काळापासून गोव्यात अस्तित्वात असलेल्या मोटर सायकल पायलटांवर होण्याचा धोका आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश राज्यातील मोटर सायकल पायलट पद्धतीचा कर्दनकाळ बनू शकतो. सरकारने त्या आदेशाचा परिणाम गोव्यावर होणार नाही, याची खबरदारी घ्यावी,असा सल्ला युरीने सरकारला दिला आहे. काही का असेना युरीला काळजी आहे! ∙∙∙
‘पाद्री शेरमाव व्हनयेक न्हय’, अशी कोकणीत एक म्हण आहे. सरकारी नोकरदारांनी व खास करून खासगी अनुदानित शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये. सरकारी पगारदारांनी राजकारणात भाग घेतल्यास असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी अनेकदा दिला आहे. मात्र, काल जाहीर झालेल्या भाजप राज्य कार्यकारिणीवर नजर मारल्यास त्यात अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याचे दिसून येते. काणकोण महाविद्यालयाची कर्मचारी, मडगावच्या एका उच्च माध्यमिक विद्यालयाचा शिक्षक व आणखी काही शिक्षक भाजपाच्या राज्य कार्यकारिणीवर निवडले गेले आहेत. डॉ. प्रमोद सावंत साहेब आपल्या पक्षाला आपला आदेश लागत नाही का? मुख्यमंत्री साहेब ‘चॅरिटी बिगीन्स फ्रॉम होम’, म्हणतात ते लक्षात असू द्या! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.