

वाळपई: स्वप्नवत पर्यटनासाठी मनाली गाठलेली गोव्यातील समर्थ आयुर्वेदिक कंपनीची ४८ जणांची टीम काही क्षणांतच निसर्गाच्या रौद्र रूपासमोर असहाय बनली होती. २० जानेवारी रोजी सहलीसाठी रवाना झालेली ही टीम २१ जानेवारीच्या रात्री मनालीला पोहोचली.
प्रारंभी निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर २३ जानेवारीपासून झालेल्या भीषण बर्फवृष्टीने सगळे चित्रच पालटले. मनालीत अडकलेल्या या सर्वांना अखेर दिल्लीत सुरक्षित आसरा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मदतीमुळे मिळाला. ‘भाऊं’च्या या मदतीमुळे सर्वांना सुखरूपपणे गोव्यात परतता आले.
मनालीत (Manali) जोरदार बर्फवृष्टी झाल्याने काही तासांतच सर्व रस्ते बंद झाले. संपर्क तुटला आणि गोव्यातील ही संपूर्ण टीम तब्बल तीन दिवस हॉटेलमध्ये अडकून पडली. २५ जानेवारीचे परतीचे विमान तिकीट हातात होते; मात्र मनालीहून बाहेर पडण्याचा एकही मार्ग खुला नव्हता. अखेर २४ जानेवारी रोजी जीव धोक्यात घालून मनाली सोडण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. पाच ते सात किलोमीटरचे अंतर कंबरडे मोडणाऱ्या थंडीत, घसरत्या बर्फातून पायी कापावे लागले. काही जण खाली कोसळले, वेदनेने विव्हळले, तरीही एकमेकांचा हात धरून पुढे चालत राहिले. पुढील मार्ग पूर्णपणे बंद असल्याने अखेर सर्वांनी ती भयावह रात्र गाडीतच काढली.
सकाळी पुन्हा प्रयत्न करण्यात आला; मात्र जवळपास २० किलोमीटरचा रस्ता अजूनही बर्फाखाली गडप होता. हळूहळू, टप्प्याटप्प्याने पुढे सरकत अखेर रात्री १० वाजता हा संकटमय प्रवास पार करून बसने दिल्ली गाठण्यात आली. मात्र तोपर्यंत परतीचे विमान चुकले होते. त्यामुळे दिल्लीत ४८ जणांचा मुक्काम कुठे करायचा, हा प्रश्न या गोमंतकीय पर्यटकांपुढे उभा राहिला होता.
याच वेळी टीममधील एकाला श्रीपाद नाईक यांची आठवण झाली. संपर्क साधताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ‘सगळ्यांची मी व्यवस्था करतो,’ असे सांगितले. त्यानंतर दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सर्वांना सुरक्षित आसरा देण्यात आला. या मदतीत समाजकार्यकर्ते संतोष महानंदू नाईक यांनी मोलाची भूमिका बजावली. श्रीपाद नाईक यांचे मनापासून आभार मानत सर्वजण सुखरूपपणे आपापल्या घरी परतले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.