

राजधानी म्हटली की थाटमाट आलाच; पण सरकारी आणि अनुदानित ठिकाणी तरी खायला पोटभर आणि खिशाला परवडेल, अशा दरात पदार्थ मिळावेत, अशी जनतेची साधी अपेक्षा असते. मात्र, कला अकादमीच्या कॅन्टीनमध्ये गेल्यावर काहीजणांना वाटते, आपण चुकून मोठ्या हॉटेलमध्ये तर आलो नाही ना! कारण बाहेर ज्या दरात जेवण मिळते, त्याच पैशांत इथे चहा-नाश्त्याचे बिल हातात येते. त्यामुळे आता लोक कला पाहण्यापेक्षा मेन्यू कार्ड पाहूनच जास्त विचारात पडतात. काही रसिक तर मिश्किलपणे म्हणतात, इथे बिल पाहूनच जास्त धक्का बसतो! तर काहींचे म्हणणे, कला अकादमीत आता ‘संगीत-नाटकांपेक्षा कॅन्टीनचे दर’ हेच मोठे आकर्षण ठरत आहे. आता काल अकादमी या ‘महागड्या कलाकृती’कडे लक्ष देणार, की रसिकांनीच खिशाला सांभाळत कलेचा आस्वाद घ्यायचा? ∙∙∙
कुठलाही विद्यार्थी जेव्हा पदव्युत्तर अभ्यासक्रम करतो त्यावेळी प्राथमिक शिक्षणावेळी तो काय शिकला, हे विचारण्यात कुठलाही अर्थ नाही. मात्र, कित्येकवेळा असे विद्यार्थीही बाळबोधपणा करतात आणि त्यांना मग तुम्ही पहिली, दुसरीत काय शिकला? असे विचारण्याजाेगी वेळ लोकांवर येते. गोव्यातील क्राईम ब्रँच पोलिसांबाबतही असेच म्हणावे लागेल. वास्तविक क्राईम ब्रँच हा कुठल्याही पोलिस सेवेतील तज्ज्ञ असा विभाग. या विभागात अनुभवी आणि हुशार अधिकाऱ्यांचीच नेमणूक केली जाते. मात्र, सध्या न्यायालयात वारंवार क्राईम ब्रँच तोंडघशी पडत आहे, ते पाहिल्यास गोवा पोलिसांचा क्राईम ब्रँचही बाळबोधपणा करू लागला का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. महत्त्वाची प्रकरणे हाताळतानाही हा विभाग प्राथमिक तांत्रिक बाबींकडे कशाप्रमाणे दुर्लक्ष करतो, हे सोहम नाईक प्रकरणातून पुढे आले आहे. त्यामुळे खरेच या विभागात तज्ज्ञ अधिकारी आहेत का, हा प्रश्न जर कुणाला पडला त्यात ते नवल काय? ∙∙∙
आज जो तो उठतो आणि गोंयकारपणावर आपले भाषण झोडतो. आता अशांच्या मांदियाळीत काही महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टीतून राजीनामा देऊन बाहेर पडलेले आणि स्थानिक राजकारणात आपली नाममुद्रा बसविण्याची धडपड करणारे सिद्धेश भगत यांची भर पडली आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत यावेळी आसाम आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये सत्ता मिळवल्यानंतर गोव्यात जल्लोष साजरा करण्यात आला. यासाठी पणजीत भाजपने आनंदोत्सव साजरा करताना जी रॅली काढली त्यावेळी कोकणी गाणी न लावता बंगाली गाणी लावली यावर आक्षेप घेण्यासाठी सिद्धेश भगत यांनी आपला एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात त्यांनी गोव्यात बंगाली गाणी लावताना भाजपला गोंयकारपणाचा विसर पडला की काय, असा सवाल केला आहे. सिद्धेशरावांचा हा सवाल अगदीच बाहेर टाकण्यासारखा नव्हे, हे जरी खरे असले तरी अशी बारीक सारीक खुसपटे काढून हे विरोधक भाजपला गोव्यात रोखू शकणार का? अशा फसव्या गोंयकारपणाच्या कढीला कितीही ऊत आला तरी त्याचा फायदा काय होणार? ∙∙∙
निवडणूक जवळ आली की आमदार-मंत्री आपला वाढदिवस जंगी साजरा करतात. निवडून आल्यावर सतत चार वाढदिवस गोव्याबाहेर साजरे केलेल्या आमदार-मंत्र्यांनी आताचा वाढदिवस मात्र कार्यकर्त्यांबरोबर साजरा केला. माजी उपमुख्यमंत्री व केपेचे आमदार गेल्या अनेक वर्षांपासून आपला वाढदिवस शाकाहारी पद्धतीने साजरा करतात. वाढदिवसाचे औचित्य साधून ते सत्यनारायणाची पूजा बांधतात व कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना वरण-भाताचा महाप्रसाद वाटतात. बाबूंचे प्रतिस्पर्धी एल्टन डिकॉस्टा यांनी आपल्या वाढदिवसाच्या पार्टीला सोळा प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ वाढले होते. यंदा तरी बाबू वाढदिवस नॉनव्हेज पद्धतीने साजरा करणार, अशी कार्यकर्त्यांना आशा होती, ती फोल ठरली.∙∙∙
माजी खासदार आणि ‘एनआरआय’ कमिशनर नरेंद्र सावईकर हे सध्या सोशल मीडियावर भलतेच आक्रमक झाले आहेत. फोंड्यावर तर त्यांचा जबरदस्त पगडा आहे. सावईकर साहेब अधूनमधून सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करीत असतात; पण त्याचा अर्थ लावणे भल्याभल्यांना जमत नाही. एकापरीने कुणाला चिमटा काढायचे काम सावईकर करतात, हे कळणे मुश्किलीचे झाले आहे. तरीही भाजप विरोधकांना ती एक चपराकच असते, असे काहींचे मत आहे. हा मेसेज बऱ्याचदा एका वाक्याचा असतो; पण वकील असल्याने त्यांच्या पोस्टमध्ये एक गूढ मतितार्थ लपलेला असतो, जो बारकाईने पाहतो त्यालाच तो कळतो. एनी वे...लगे रहो, सावईकर साहेब! ∙∙∙
म्हापशाच्या बाजारात सध्या व्यापारापेक्षा राजकारणाची चर्चाच जास्त जोरात आहे! जितेंद्र फळारी यांच्यावर अविश्वास ठराव काय आला आणि तो ६ विरुद्ध शून्य मतांनी संमत काय झाला, जणूकाही म्हापशाच्या राजकारणातली ही फलश्रुतीच! मुद्दा असा की, फळारी साहेबांना पर्याय दिला होता. दादा, एक तर व्यापारी संघटना सांभाळा नाही तर, टुगेदर फॉर म्हापसाचे उपाध्यक्षपद; दोन-दोन बोटींवर पाय कशाला? पण फळारी साहेबांनी दोन्ही खुर्च्या सोडायला नकार दिला आणि तिथेच माशी शिंकली! आता ते सहकार्य करत नव्हते आणि अकार्यक्षम होते, असे काहीजण सांगत असले तरी, सध्या म्हापशात टुगेदर राहणे अनेकांच्या डोळ्यांत प्रकर्षाने खुपायला लागले, हेच या ठरावावरून स्पष्ट दिसते. गमतीची गोष्ट म्हणजे ६ जणांनी विरोधात हात वर केले; पण ४ जण मात्र तटस्थ राहिले. बहुधा त्यांना ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी भीती वाटली असावी. आता नवीन अध्यक्ष येईपर्यंत अनिश जोशींच्या खांद्यावर पदभार सोपवलाय खरा; पण या अविश्वास ठरावामागचा खरा विश्वास कुणावर होता आणि निशाणा कुणावर, हे प्रत्येक म्हापसेकरांना ठाऊक आहे. बाकी राजकीय सूड की खरोखरच कामे रखडली होती, याचा हिशोब आता म्हापशाची जनताच मांडेल! ∙∙∙
‘‘वेगवेगळ्या मतदारसंघांतील नेते व कार्यकर्ते जे भाजपच्या कार्यशैलीवर नाराज आहेत ते आपल्या संपर्कात आहेत. पण त्या सर्वांना आपली प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे. गोवा फॉरवर्डची कॉंग्रेस व यूपीएतील इतर पक्षांकडे युती आहे. आपण आपल्यापरीने कॉंग्रेस व इतर घटक पक्षांकडे तडजोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जर त्यांना त्यांच्याबरोबर आम्ही नको आहेत तर मग आपल्याला स्वतंत्रपणे वेगळ्या मार्गाने जावे लागेल.’’ हे बोल आहेत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचे. विजयबाबने एक चांगले केले आहे आणि ते म्हणजे निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी ते व्यावसायिक तज्ज्ञ मंडळीकडून प्रत्येक मतदारसंघातील आपल्या पक्षाची मजबुती, कमीपणा तपासून पाहणार आहेत. एक मात्र खरे, निवडणुका कधीही होऊ द्या. काँग्रेसची काहीही भूमिका असुद्यात. गोवा फॉरवर्ड व विजयबाब यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. ∙∙∙
कॅसिनो प्रकरणात न्यायालयाने प्रत्येक प्रक्रियेसाठी परवानगी आवश्यक असल्याचे स्पष्ट करताच सामाजिक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अक्षरशः ओसंडून वाहू लागल्याची चर्चा आहे. आता आदेशापेक्षा त्या आनंदाचेच शहरात जास्त विश्लेषण सुरू झाले आहे. काहीजण म्हणतात, ‘सरकार काहीही करो, शेवटी कोर्ट आहे ना!’ तर काही विचारतात, ‘खुश नेमके कशासाठी... कॅसिनो थांबणार म्हणून, की आता कॅसिनोवाल्यांनाही कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार म्हणून?’ काही कार्यकर्ते तर इतके उत्साहात आहेत की आदेशाचा तपशील बाजूला ठेवून ‘आमचीच भूमिका खरी ठरली’ याचाच जल्लोष सुरू आहे. पण दुसरीकडे काही लोक आठवण करून देतात की, प्रकरण अजून न्यायालयातच आहे, निकाल लागलेला नाही. त्यामुळे सध्या पणजीत ‘कॅसिनो येणार का?’ यापेक्षा ‘खुश कशासाठी?’ हाच प्रश्न अधिक रंगतदार चर्चेचा विषय बनला आहे. ∙∙∙
तार नदी परिसरातील कामाच्या पाहणीनिमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंगळवारी म्हापशात होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार म्हापशातील सारे प्रश्न पावसाळ्यापूर्वी सुटतील का, अशी चर्चा म्हापशात आहे. ‘टुगेदर फॉर म्हापसा’ नावाने काही नेते एकत्र आले आहेत. ते या समस्या सोडवतील की सत्ताधारी मंडळच समस्या सोडवेल, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यावरून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये चर्चाही झडू लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या एका दौऱ्याने निदान समस्यांविषयी चर्चा तरी सुरू झाली आहे. ∙∙∙
कला संस्कृती संचालनालयाने वार्षिक पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. काही कलाकार रांगेत राहून अर्ज करत नाहीत. त्या अर्जाला इतर कामगिरीची कात्रणे यांची गलेलठ्ठ फाईल वगैरे लावण्याची गरज असते. म्हणजे आपल्या कलाकौशल्याची सिध्दता, योग्यता, पात्रता दाखवायला. असो. गेल्या वर्षीचे पुरस्कार अजूनही घोषित केले नाहीत वा दिले गेले नाहीत. किती वर्षांचे बरोबरच दिले जातात ते बघायला लोक, कलाकार उत्सुक आहेत. छोट्याशा वहीसारख्या सुमार दर्जाच्या पुस्तकाला (पुस्तिकेला) साहित्याचा राज्य पुरस्कार दिला गेला आहे. लोकमान्यता, लोकप्रियता, ओळख तरी असावी वाचकांना. कथित कलाकाराने आपल्याच घरात औरंगजेबाचे संवाद फेकत येरझाऱ्या घालत भूमिका केली तर त्याला पुरस्कार द्यावा? गोव्यात कलेच्या क्षेत्रात बजबजपुरी आहे. योग्यतेला पुरस्कार दिला नाही तर लोकांचा तिरस्कार वाढत जाईल, ही खंत वाटते.
ज्या सरकारी अधिकाऱ्याच्या पाठीवर आमदार-मंत्र्याचा आशीर्वाद, त्याचे कोण काय वाकडे करू शकतो? वेतन तक्त्यावर केवळ लेवल तीनवर असलेले अनेक गब्बर पंचायत सेक्रेटरी आपण पाहिलेच अाहेत. आता वीस-बावीस हजार वेतन घेणारा छोटा अधिकारी मोठ्या आलिशान गाड्यांतून कसा फिरतो? हायफाय लाईफ स्टाईल कशी मेन्टेन करतो? याचे उत्तर कोण देणार? धारबांदोडा तालुक्यातील पर्यटन क्षेत्र असलेल्या पंचायतीत असाच एक अधिकारी आपल्या कारनाम्यांमुळे गाजत आहे. गणेशाच्या कृपेने व पंचायतमंत्र्याकडे असलेल्या भावोजीच्या आशीर्वादाने हा अधिकारी पुन्हा त्याच धाराबांदोड्यातील दूधसागराची महती सांगणाऱ्या पंचायतीत परतला आहे. बदली करून पाठविलेला हा पंचायत अधिकारी पुन्हा त्याच पंचायतीत येण्याचे कारण काय? दुधाची सोय की दुधाचा सागर? असा प्रश्न स्थानिक विचारायला लागले आहेत. ∙∙∙
नुवेचे माजी आमदार विल्फ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान हे पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात सक्रिय झालेले दिसून येत आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपले नशीब अजमाविण्याच्या प्रयत्नांत ते आहेत. हल्लीच गौतम खट्टर याने गोंयच्या सायबाविरोधात टिप्पणी केल्यानंतर मडगावात नुवे मतदारसंघातील सर्व पंचायतींच्या सरपंच व अन्य पंचसदस्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यासाठी बाबाशान यांचीच पुढाकार घेतला होता. नुवे मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर ते भाजपवासी झाले होते. नंतर पुढच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागेल होते. आता ते ‘आप’ला जवळ गेले आहे. कॉंग्रेस पक्षाकडेही संधान साधून आहेत, अशी चर्चा आहे. कुठल्याही स्थितीत विधानसभा निवडणूक लढविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. आपल्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. बघूया पुढे काय घडते ते. ∙∙∙
मानकुराद आंबा बराच खाली उतरलाय. तीनशे रुपये डझन मिळतो. परंतु गोव्यात येणाऱ्या व्यावसायिक नाटकांचे भाव बरेच वधारलेत. एका नाटकाच्या पुढच्या रांगेचे तिकीट दर १२०० रुपये, हे सांगितले तर खरे वाटेल का? आता लोक जातात, त्यांना आवडते म्हणून ठीक आहे. स्थानिक लोक स्थानिक नाटकाला तिकीट काढून येत नाहीत, स्थानिकांना उत्तेजन देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. काही थिएटरमधील शौचालये बघितल्यास तिकीट इतके महाग का आकारतात, असा प्रश्न पडतो. महिलांना जबर त्रास होतो. गलिच्छ, अस्वच्छ, नळांना धड पाणी नाही, अशी स्थिती. थोडी माणुसकी अंगीकारावी. नंतर विमानाचे तिकीट आकारले तर हरकत नाही, असे काही महिलांचे म्हणणे आहे. ∙∙∙
किती युवा साहित्यिकांनी मागच्या दोन वर्षांत पुस्तके लिहिली आहेत. पुरस्कार मिळाल्याबरोबर लेखन बंद होते. तीन मासिके आहेत. किती लोक कथा, कादंबऱ्या सातत्याने, नियमितपणे लिहितात ते दिसते. नाटकाचे नाव नको. ‘कॉपी मारून’ही विचारल्यावर माफ करा, असे न म्हणणारे लोक. चित्रपटाचीही गोष्ट न काढलेली बरी. किती चित्रपट येतात, किती लोक थिएटरमध्ये येऊन बघतात, किती चित्रपट लोकप्रिय होऊन गाजतात, तेही विचारायची गरज नाही. ‘हातच्या कांकणाक हारसो कित्याक?’ अशी कोकणी म्हण आहे. देशातील सर्व भाषांत चित्रपट निर्मितीच्या बाबतीत कोकणी खालून पहिली असावी. तथापि मराठीची असुया का, हा गूढ प्रश्न आहे. ∙∙∙
गोव्याचे सुपुत्र राजेंद्र आर्लेकर सध्या केरळमचे राज्यपाल असून त्यांच्याकडे तमिळनाडूच्या राज्यपालपदाचाही ताबा आहे. ही दुहेरी जबाबदारी त्यांच्यासाठी यावेळी आगळी ठरणार आहे. केरळम व तमिळनाडू या दक्षिणेकडील दोन्ही राज्यांची विधानसभा निवडणूक एकाचवेळी झाली. त्यामुळे दोन्ही ठिकाणाच्या भावी मुख्यमंत्र्यांना पदाची शपथ राज्यपाल या नात्याने आर्लेकर हेच देणार आहेत. हा एक अनोखा योगायोग भारतीय राजकारणात पाहायला मिळेल. आर्लेकर यांच्या कारकिर्दीतही त्याची खास नोंद होईल आणि गोव्यासाठीही हा एकप्रकारे बहुमानच असेल. बुधवारी तमिळनाडूत सर्वाधिक जागा जिंकलेल्या टीव्हीके पक्षाचे प्रमुख व तेथील लोकप्रिय अभिनेते जोसेफ विजय यांनी राज्यपाल आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. आता बाकी सोपस्कार पार पाडल्यानंतर आर्लेकर लवकरच विजय यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देतील आणि त्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांचा क्रम असेल...! ∙∙∙
तमिळनाडूतील सिनेअभिनेते विजय यांना सर्वाधिक जागा मिळाल्याचा निकाल हा गोव्यातील राजकारण्यांनादेखील अनपेक्षित वाटत आहे. अशाप्रकारचा अनपेक्षित निकाल हा तरुणाई आणि खासकरून ‘जेन झी’मुळे लागल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. येत्या काही महिन्यांत गोव्यातही विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे युवा पिढीचे मत कुणाला पडते त्यावर भवितव्य अवलंबून असणार आहे. राज्यातील अनेक बड्या राजकारण्यांनादेखील आता युवकांशी संपर्क वाढवला पाहिजे अन्यथा ‘जेन झी’ काय करेल सांगता येत नाही, अशी धास्ती वाटू लागल्याची चर्चा आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.