

सासष्टी: नावेली आणि दवर्ली येथे झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला असला तरी २०२२च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी या पक्षाच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे.
२०२२च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार उल्हास तुयेकर यांनी ५१६८ मते मिळवून विजय संपादन केला होता. त्यावेळी तब्बल सात उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसला होता.
मात्र यंदाच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत दवर्ली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सत्यविजय नाईक यांचा पराभव झाला तरी त्यांना ५५९० मते मिळाली. तर, नावेली मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार लक्ष्मी शेटकर यांना १,३०० मते मिळाली.
दवर्ली हा विधानसभा मतदारसंघातील नावेलीचा भाग असल्याने दोन्ही ठिकाणची मते एकत्र धरल्यास भाजपला एकूण ६८९० मते मिळाली आहेत. ही संख्या आमदार उल्हास तुयेकर यांनी २०२२ मध्ये मिळवलेल्या मतांपेक्षा तब्बल १७२२ ने अधिक आहे. नावेलीत भाजपची पारंपरिक ताकद टिकून असल्याचेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
यासंदर्भात भाजपचा एक प्रमुख कार्यकर्ता व पंचाशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की या वाढलेल्या मताधिक्याचा परिणाम २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे दिसून येईल.
भाजपचा उमेदवार जर स्वतःच्या बळावर आणखी दीड ते दोन हजार मते वाढवू शकला आणि मताधिक्य ८५०० ते ९००० च्या आसपास पोहोचवले, तर नावेली मतदारसंघ पुन्हा भाजपच्या ताब्यात येऊ शकतो. जिल्हा पंचायत निवडणुकीत नावेली मतदारसंघात वेळ्ळीच्या काही भागाचा समावेश होता.
मात्र भाजपकडून या भागात प्रभावी प्रचार करण्यात आला नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. यावेळी एसआयआरच्या भीतीने काही काळ परदेशात गेलेले नागरिक गोव्यात परतल्याने त्यांना मतदान करता आले आणि त्याचा फायदा काँग्रेस उमेदवाराला झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
नावेली मतदारसंघात भाजपचे एकूण मताधिक्य वाढल्यामुळे विद्यमान आमदार उल्हास तुयेकर यांना २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्याची संधी वाढू शकते.
मात्र याचवेळी, वाढलेले मताधिक्य लक्षात घेता उल्हास तुयेकर यांना डावलून अधिक मते वाढवू शकणाऱ्या नवोदित चेहऱ्याला संधी देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ही स्थिती तुयेकर यांच्यासाठी संधी ठरेल की बुमरॅंग, हे आगामी राजकीय घडामोडींवर अवलंबून असेल.
२०२२ विधानसभा निवडणूक : उल्हास तुयेकर यांना ५१६८ मते
२०२५ जिल्हा पंचायत निवडणूक : दवर्ली - सत्यविजय नाईक यांना ५५९० मते, नावेली - लक्ष्मी शेटकर यांना १३०० मते.
एकूण मते : ६८९० वाढ : १७२२ मते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.