

पणजी: राज्यात २०२० मध्ये झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत जिंकलेल्या सात जागा भाजपने यावेळी गमावल्या, पण त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागलेल्या पेन्ह द फ्रान्स आणि लाटंबार्से या दोन जागा मिळवल्या आहेत. दुसरीकडे, त्यावेळी जिंकलेला सांताक्रूज यावेळी गमावत, हरलेल्या सहा जागा काँग्रेसने कमावल्या आहेत.
यावेळची जिल्हा पंचायत निवडणूक भाजपने ‘मगो’शी आणि काँग्रेसने गोवा फॉरवर्डशी युती करून लढवली होती. भाजपने ५० पैकी ४० जागा लढवल्या, ‘मगो’ला तीन जागा बहाल केल्या आणि सात ठिकाणी अपक्षांना पाठिंबा दिला होता. तर, काँग्रेसने ३६ जागा लढवत गोवा फॉरवर्डला नऊ जागा दिल्या आणि पाच ठिकाणी अपक्षांना साथ दिली होती. निवडणुकीत भाजपने ४० पैकी २९, मगोने ३, काँग्रेसने १० आणि गोवा फॉरवर्डने एक जागा जिंकली आहे.
२०२० ची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवलेली होती. त्यावेळी भाजप उमेदवारांनी हळदोणा, शिरसई, सेंट लॉरेन्स, बेतकी–खांडोळा, दवर्ली, गिरदोली आणि खोला या जागा जिंकल्या होत्या. परंतु, यावेळी या सातपैकी पाच जागा काँग्रेसने जिंकल्या, तर आरजीपी आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एका जागा जिंकली आहे. त्यावेळी हरलेले पेन्ह द फ्रान्स आणि लाटंबार्से या मतदारसंघांवर मात्र भाजपने यावेळी कब्जा मिळवला आहे.
काँग्रेसने २०२० मध्ये हळदोणा, नुवे, वेळ्ळी आणि कुडतरी अशा चारच जागा जिंकल्या होत्या. यावेळीही या चार जागा कायम ठेवत काँग्रेसने त्यावेळी हरलेल्या शिरसई, बाणावली, दवर्ली, गिरदोली, नावेली आणि खोला या सहा जागा पदरात पाडून घेतलेल्या आहेत. या निकालामुळे भाजपात आनंदाचे वातावरण असले, तरी गतवेळी जिंकलेल्या आणि यावेळी हरलेल्या जागांबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचारमंथन सुरू आहे. तर, सहा जागा अधिक मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात काहीअंशी समाधानाचे वातावरण असल्याचे पहावयास मिळत आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीत मंत्री, आमदार कशी कामगिरी करतात, याकडे भाजप, काँग्रेसच्या श्रेष्ठींचे लक्ष होते. विरोधी काँग्रेसच्या तिन्ही आमदारांनी आपापल्या मतदारसंघांतील उमेदवारांना विजयी करून दाखवले. पण, भाजपच्या मंत्री बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, गोविंद गावडे, उल्हास तुयेकर आणि अपक्ष परंतु, सत्तेत असलेल्या आलेक्स रेजिनाल्ड यांना काही मतदारसंघांत पराभव पत्करावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.