LLB Admission Scam बीए एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत घातलेल्या घोळाची चौकशी करण्यासाठी डॉ. सविता केरकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दोन आठवड्यांत ही चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.
या समितीवर विद्यापीठाच्या काही विभाग प्रमुखांची आणि काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांची सदस्य म्हणून निवड केली आहे.
कारे कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा यांनी विद्यापीठाची परवानगी नसताना ही प्रवेश प्रक्रिया बदलल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्यावर या प्रक्रियेची चौकशी करावी, असे आदेश उच्च शिक्षण संचालनालयाने गोवा विद्यापीठाला दिले होते.
आज, गुरुवारी या चौकशीला सुरुवात होणार होती. मात्र, पावसाच्या रेड अलर्टमुळे सर्व शिक्षण संस्थांना सुट्टी दिल्यामुळे आज ही चौकशी सुरू होऊ शकली नाही, अशी माहिती विद्यापीठ सूत्रांनी दिली.
शुक्रवारी ही सुनावणी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सोमवारपासून ही चौकशी पूर्ण जोमाने सुरू होणार असून कारे व साळगावकर या दोन्ही महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि ही पद्धती बदलल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, त्यांच्या जबान्या नोंदवून घेतल्या जाणार आहेत.
या अभ्यासक्रमात प्रवेश देताना बारावीत पडलेल्या गुणांची आणि प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांची सरासरी काढून प्रवेश दिला जाईल, असे दोन्ही महाविद्यालयांच्या प्रॉस्पेक्टसमध्ये साष्टपणे लिहिलेले असतानाही 2017 साली विद्यापीठाने काढलेल्या एका वटहुकुमाचा आधार घेत गुपचूप ही प्रक्रिया बदलून फक्त प्रवेश परीक्षेला मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात आला होता.
कारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिल्वा यांनी आपल्या मुलाला प्रवेश मिळावा, यासाठी ही पद्धती बदलल्याचा आरोप असून आपला मुलगा परीक्षा देतो, ही बाबही त्यांनी सर्वांपासून लपवून ठेवल्याचा दावा केला आहे.
दैनिक ‘गोमन्तक’चे अभिनंदन!
हे कारस्थान उजेडात आणल्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी दै. ‘गोमन्तक’चे अभिनंदन केले आहे. या प्राचार्याने यापूर्वीही हेकेखोर स्वभावामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे भविष्य बरबाद केले असून त्यांच्यावर कडक करवाई करण्याची गरज माजी विद्यार्थी रोहीत बरड यांनी व्यक्त केली. ‘गोमन्तक’ने विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन!, असेही बरड यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.