

पणजी: राज्यातील पर्यटनस्थळांचे संरक्षण करण्यासाठी पर्यटन खात्याने कडक पावले उचलली असून, पर्यटनस्थळांवर बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर पाच हजार ते एक लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पर्यटन संचालकांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
राज्यातील पर्यटनस्थळांवर होणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमुळे संबंधित स्थळांचे नुकसान होण्याचा तसेच त्यांचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘गोवा पर्यटन स्थळ संरक्षण आणि देखभाल अधिनियम, २००१’ अंतर्गत यापुढे पर्यटनस्थळांवर बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या व्यक्ती, कंपन्या, संघटना, संस्था किंवा इतर कोणत्याही घटकांवर पाच हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
शिवाय असे घटक ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’च्या कलम २२३ अन्वये शिक्षेसही पात्र ठरतील, असेही आदेशात म्हटले आहे. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गोव्याबाबत गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाद्वारे उलटसुलट चर्चा करण्यात येत आहेत. इतर राज्यांतील काही पर्यटकांकडून गोव्याची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळेच पर्यटन खात्याने पर्यटनस्थळांचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
कोणत्या गोष्टींना मज्जाव?
समुद्र, नदी किंवा बंदराच्या कोणत्याही भागात जहाजे, बोटी, लाकडाचे ओंडके, तराफे किंवा इतर तरंगणाऱ्या वस्तू चालवणे किंवा त्यांची ने-आण करणे. त्यांच्यामुळे तेल गळती होणे.
पर्यटकांना वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यास भाग पाडणे. त्यासाठी त्यांचा पिच्छा पुरवणे किंवा बळजबरी करण्याचा प्रयत्न करणे. मद्यपान करण्यास परवानगी नसलेल्या ठिकाणी मद्यपान करणे किंवा काचेच्या बाटल्या फोडणे.
मोकळ्या जागेत स्वयंपाक करणे तसेच कचरा इतरत्र टाकणे. पर्यटकांना नेण्यासाठी अनधिकृतरित्या बोटिंग किंवा वॉटर स्पोर्ट्स उपक्रम चालवणे. अधिकृत तिकीट काऊंटर्स किंवा कार्यालयांशिवाय इतर कोणत्याही ठिकाणाहून क्रूझ बोटची तिकिटे किंवा पर्यटनाशी संबंधित इतर तिकिटे यांची दलाली किंवा विक्री करणे. पर्यटन स्थळांवर पर्यटकांना त्रास किंवा गैरसोय होईल, अशा पद्धतीने भीक मागणे.
अनधिकृत हातगाड्या, फिरत्या गाड्या किंवा अनधिकृत फेरीवाल्यांमार्फत वस्तूंची विक्री करणे.समुद्रकिनाऱ्यांवर अनधिकृत वाहने चालवणे.गोव्याबाहेर सेवा देण्यासाठी पर्यटकांना वॉटर स्पोर्ट्सची तिकिटे किंवा पॅकेजेसची अनधिकृत विक्री करणे.फेरीवाले, एजंट किंवा सेवा पुरवठादार यांच्याद्वारे पर्यटकांच्या मुक्त हालचालीत अडथळा आणणे किंवा त्यांना कोणत्याही वस्तू, माल किंवा सेवा खरेदी करण्यास भाग पाडणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.